‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ ‘परमेश्वरावर नितांत श्रद्धा, त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन, ईश्वराला संपूर्ण शरणागती’ हा होय. परंतु प्रत्येक आस्तिक व्यक्ती मुसलमान असू शकत नाही. ईश्वरासंबंधीची आणि त्याच्या मार्गदर्शनासंबंधीची इस्लामची विशिष्ट कल्पना मान्य असणारेच मुसलमान होऊ शकतात.विश्वामध्ये फक्त एकच ईश्वर आहे. सारे विश्वच त्याने निर्माण केले आहे. ईश्वराने विश्वनिर्मितीच्या वेळी देवदूत आणि ‘जिन’ (भूत, पिशाच) निर्माण केले. त्यानंतर मानव आणि इतर प्राणिमात्र. प्राणिमात्रांत लिंगभेद असतो. देवदूतांमध्ये लिंगभेद नाही. जिन या दोहोंमधलेच असतात. मानवाची निर्मिती करण्याअगोदर ईश्वराला देवदूतांपेक्षाही एक श्रेष्ठ कृती तयार करण्याची इच्छा झाली. त्या इच्छेचा परिणाम म्हणूनच आदिमानव आदम आणि ईव्ह यांना त्याने निर्माण केले. त्यानंतर परमेश्वराने सर्व देवदूतांना आदमला अभिवादन करण्याची आज्ञा केली. ही आज्ञा सर्वांनी पाळली; इब्लिस किंवा सैतान या देवदूताचाच फक्त एक अपवाद निघाला. त्याने असूयेमुळे अभिवादन करण्याचे नाकारले. त्यामुळे रागावून परमेश्वराने आदमबरोबर सैतानालाही पृथ्वीवर पाठविले. आदम आणि त्याच्या वंशजांना ज्ञान देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी एका संरक्षित पट्टिकेवर कुराण निर्मिले होते. ईश्वराने आदमला कुराण सांगितले व त्याप्रमाणे वागण्याची आज्ञा केली तसेच सैतान ईश्वरी संदेशापासून त्याला च्युत करण्याचा प्रयत्न करील, तरी सावध रहा, असेही सांगितले. कुराण ही परमेश्वराची मानवजातीवर कृपाच आहे. सैतानाच्या प्रभावामुळे किंवा दुरभिमानामुळे मानव ईश्वरी मार्गदर्शनापासून अधूनमधून च्युत होतो. काही वेळा ईश्वरी संदेशाचा विसर पडून किंवा ईश्वरी संदेशात इतर संदेश मिसळून त्याला विकृत केले जाते. मोठ्या प्रमाणावर ईश्वरी आज्ञांचे उल्लंघन होते, तेव्हा परमेश्वर अधूनमधून पृथ्वीवरच मानवांना कडक शिक्षा करतो. ठिकठिकाणी जीर्ण-भग्न अवशेष सापडतात ते या शिक्षेची साक्ष देतात. तथापि ईश्वर मुख्यत: क्षमाशील आणि कृपावंत असल्यामुळे त्याने आदमच्या पहिल्या चुकीला जशी क्षमा केली आणि त्याच्यावर पुन्हा अनुग्रह केला, त्याचप्रमाणे वेळोवेळी ठिकठिकाणी त्याने आपले पैगंबर किंवा प्रेषितही धाडले. हे पैगंबर मानवच होते. देवदूत किंवा जिन नव्हते. या पैगंबरांकरवी ईश्वराने पुन्हापुन्हा लोकांना कुराणाच्या मार्गदर्शनाचा लाभ दिला. प्रत्येक पैगंबराने कुराणाच्या मूळ स्वर्गीय मार्गदर्शनाप्रमाणे स्वत:ची वागणूक ठेवली आणि लोकांना उपदेश केला. प्रत्येक पैगंबराने आपल्या बांधवांना सांगितले, की परमेश्वर एकच आहे. त्याला कोणी भागीदार अथवा प्रतिस्पर्धी आहे, ही कल्पनाच परमेश्वर सहन करू शकत नाही. परमेश्वराने मानवाला निर्माण केले आहे आणि त्याच्यावर मार्गदर्शनाची कृपाही केली आहे. जर कोणी ईश्वरी मार्गदर्शनाप्रमाणे आचरण केले नाही, तर परमेश्वरी कोपामुळे त्याला अपार नरकयातना भोगाव्या लागतील. पैशाच्या लोभाने व इतर प्रलोभनांमुळे लोक सैतानाच्या आहारी जातात आणि त्यांना परमेश्वराचा व ईश्वरी संदेशाचा विसर पडतो. परंतु प्रत्येकाने कियामतीच्या दिवसाची आठवण ठेवली पाहिजे. त्या दिवशी सर्व मृतात्मे जागृत होतील. देवदूतांच्या मेळाव्यात सिंहासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर देवदूत आपल्या वह्या उघडून प्रत्येकाच्या सत्कृत्यांचा आणि दुष्कृत्यांचा पाढा वाचतील आणि तराजूच्या पारड्यात दोहोंचे वजन केले जाईल. सत्कृत्यांचे पारडे जड झाले, तर प्रत्येक जीवात्म्याला स्वर्गात प्रवेश मिळेल. उलट ईश्वराला विसरणाऱ्याना, ईश्वर अनेक आहेत असे मानणाऱ्यांना, मूर्तिपूजकांना आणि ज्यांची दुष्कृत्ये अधिक आहेत, पण परमेश्वराने ज्यांना क्षमा केली नाही त्यांना तर कायम नरकयातना भोगाव्या लागतील. हा ईश्वरी संदेश आदम, अब्राहम, नूह, इसाक, मोझेझ, झकारिया, युसुफ, येशू यांसारख्या हजारो पैगंबरांनी आपल्या बांधवांना दिला. शेवटी परमेश्वराने मुहंमदांना प्रेषित म्हणून अरबस्तानात धाडले आणि स्वर्गीय कुराण त्यांच्या मुखातून अरबी भाषेत वदविले. इतर प्रेषितांप्रमाणे मुहंमदांनीही आदमपासून चालत आलेला खरा धर्म मानवांना शिकविला आणि ईश्वरी संदेशाप्रमाणे कसे वागावे, याचा आदर्श आपल्या स्वत:च्या आचरणाने लोकांसमोर ठेवला.मुहंमद हे परमेश्वराचे अखेरचे प्रेषित होते. त्यांच्यानंतर दुसरा कोणी प्रेषित येणार नाही आणि पुन्हा तोच संदेश सांगणार नाही. मुहंमदांमार्फत आलेला ईश्वरी संदेश अधिकृतपणे लिहून ठेवलेला आहे. त्यात गेल्या तेराशे वर्षांत कानामात्रेचाही फरक झालेला नाही. तसेच त्यांच्या अधिकृत आठवणी, आख्यायिकाही अधिकृतपणे तयार केल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांची शिकवण, उक्ती आणि कृती आजही स्पष्टपणे लोकांना उपलब्ध आहेत. यापूर्वीच्या प्रेषितांचे संदेश अपुरे आणि त्यांत भेसळ झाल्यामुळे अनधिकृत स्वरूपात उपलब्ध आहेत, ते रद्द समजले पाहिजेत. त्यामुळे ज्यूंचा ईश्वरी धर्मग्रंथ तौरात (जुना करार) किंवा ख्रिश्चनांचेगॉस्पेल रद्दबातल झाले आहे.परमेश्वर सगुण आहे. परमेश्वराचे गुण दर्शविणारी नव्याण्णव विशेषणे कुराणात दिली आहेत. उदा., विश्वनिर्माता (खालिक), अनादी आणि अनंत (समद), कृपाळू (रहीम), पालनकर्ता (हाफिझ), क्षमाशील (गफूर), सर्वशक्तिमान (अझीझ), रक्षणकर्ता (मुहायमिन), श्रेष्ठतम (वली), मार्गदर्शक (हादी), कियामतदिनीचा न्यायाधीश (हाकिम), विश्वाचा मालक (मालिक), इत्यादी. हा परमेश्वर एकमेवाद्वितीय आहे. ‘अल्ला शिवाय दुसरा ईश्वर नाही आणि मुहंमद त्याचा पैगंबर आहे’. (लाइलह इल्ल ‘ल्लह मुहमंद-उर्-रसूल’ ल्लह), हे इस्लामचे ब्रीदवाक्य (कलमा) आहे. चारचौघांसमक्ष या ब्रीदवाक्याचा मोठ्याने उच्चार करणाराच मुसलमान होऊ शकतो. कारण कलमा म्हटल्याने तो आपली ईश्वरावरील श्रद्धा जाहीर करतो, ईश्वराला कोणी भागीदार किंवा प्रतिस्पर्धी नाही हे मान्य करतो, मुहंमद ईश्वराचे प्रेषित आहेत हे कबूल करून मुहंमदांमार्फत आलेल्या ईश्वरी मार्गदर्शनाचे पालन करण्याचा निर्धार करतो.विशुद्ध एकेश्वरवाद हा इस्लामचा पाया आहे. अद्वैत तत्वज्ञान, मूर्तिपूजा आणि अवतारकल्पना इस्लामला मान्य नाहीत. येशू परमेश्वराचा पुत्र नसून मानवी प्रेषित होता, असा कुराणाचा दावा आहे. प्रत्येक व्यक्ती एकदाच जन्म घेते आणि अखेरच्या न्यायदिनी पुन्हा सजीव होऊन स्वर्गात किंवा नरकात जाते. या एका जन्मातील सत्कृत्ये आणि दुष्कृत्ये तिचे कियामतीच्या दिवशीचे भवितव्य ठरवितात. त्यामुळे पुनर्जन्माची कल्पना इस्लाम मानीत नाही. ख्रिस्ती धर्मातील मूळ पापाची कल्पनाही इस्लामशी विसंगत आहे. कारण कोणीही व्यक्ती दुसऱ्याच्या पापात किंवा पुण्यात सहभागी होऊ शकत नाही. जो तो स्वत:ला जबाबदार आहे.ईश्वर क्षमाशील असला, तरी दंडाधिकारीही आहे. वेळीच पश्चात्ताप झाला, तर तो क्षमा करीलही. परंतु प्रत्येक व्यक्तीने ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याची क्षमा आणि कृपा याचिली पाहिजे. ‘ईश्वरावर प्रेम करा’, ही ख्रिश्चन शिकवणूक याहून अगदी वेगळी आहे हे उघडच आहे. देवाची भीती बाळगून त्याच्या आज्ञेप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करणे, म्हणजेच नैतिक जीवन जगणे, असे इस्लाम धर्म सांगतो. कुराणात काय करावे आणि काय करू नये ते सांगितले आहे; याचे अधिक तपशीलवार विवेचन मुहंमदांच्या परंपरा, उक्ती आणि कृती वर्णन करणाऱ्या हदीसमध्ये (इस्लामी स्मृतिग्रंथ) दिले आहे. त्यानुसार वर्तन करणे म्हणजेच धर्माचरण किंवा नैतिक जीवन.परमेश्वराला संपूर्ण शरणागती हा इस्लामचा अर्थ असला, तरी हा धर्म निवृत्तिवादी नसून प्रवृत्तिवादी आहे. त्यात संन्यासाला किंवा ब्रह्मचर्याला स्थान नाही;संसाराला आहे. स्त्रीपुरुषसंबंध, कुटुंबसंस्था, स्थावर-जंगम मिळकतीची वाटणी, स्त्रीचे आणि पुरुषाचे वैयक्तिक हक्क, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कर्तव्य इ. जीवनाच्या विविध अंगोपांगांसंबंधी इस्लामनेएक विशिष्ट शिस्त घालून दिली आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक नीतिकर्तव्यांच्या बाबतीत ईश्वरी किंवा धार्मिक मार्गदर्शन असल्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या इस्लामने एका विशिष्ट शिस्तीने एकत्र गुंफल्या आहेत.