इस्लामी नागरी कायदा अजून अनेक देशांत अस्तित्वात आहे. आधुनिक युगातील मानवी हक्क आणि स्त्रीपुरुषसमानता या तत्वांनुसार कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न तुर्कस्तान आणि काही पश्चिम आशियाई देशांतून चालू शतकाच्या आरंभापासून सुरू आहेत. सौदी अरेबिया आणि भारत हेच त्याला अपवादभूत देश आहेत. स्त्रियांनी गोषा वापरावा आणि डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकून घ्यावे, असे धर्मशास्त्रात विहित नाही. तथापि गोषापद्धती भारत, पाकिस्तान आदी भागांत शतकानुशतके अस्तित्वात आहे. गेल्या तीस-चाळीस वर्षांत गोषापद्धती कमी होत चालली आहे. इस्लामी नागरी कायद्यामुळे मुस्लिम स्त्रिया समान हक्कांपासून वंचित झाल्या आहेत. बालविवाहाविरुद्धचा सारडा कायदा मुसलमानांना लागू नसल्यामुळे, अजूनही कोठेकोठे त्यांच्यात बालविवाह होतात. बहुपत्निकत्वाची चाल अद्यापि अस्तित्वात आहे. बहुसंख्य मुस्लिम राष्ट्रांतून बालविवाह आणि बहुपत्निकत्वाची पद्धती नाहीशी करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत. परंतु स्त्रियांच्या दृष्टीने सर्वांत अन्यायमूलक पद्धती म्हणजे, इस्लामी धर्मशास्त्रात विहित असलेला पुरुषांचा एकतर्फी घटस्फोटाचा (तलाक) हक्क. त्यामुळे नवरे मन मानेल तेव्हा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणून बायकांना घटस्फोट देतात. घटस्फोटित स्त्रियांना विवाहाच्या वेळी ‘मेहेर’ म्हणून निश्चित केलेल्या रकमेखेरीज काहीही मिळू शकत नाही. श्रीमंत कुटुंबांत मेहेरची रक्कम बरी असते; परंतु गरीब मुसलमान कुटुंबातील स्त्रियांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळू शकत नाही. पस्तीस वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रियांवर घटस्फोटाचा प्रसंग आला, तर त्यांची स्थिती अत्यंत शोचनीय होते. पश्चिम आशियाई देशांतून एकतर्फी घटस्फोट देण्याच्या नवर्यांच्या हक्कावर अलीकडे बऱ्याच मर्यादा घालण्यात आल्या आहेत.परमेश्वराचे मार्गदर्शन स्थलकालभेदातीत आहे. जगाच्या अंतापर्यंत ते लागू होणारे आहे. इस्लामचे रीतिरिवाज आणि कायदे परिपूर्ण आहेत; त्यांत काडीमात्रसुद्धा फरक करण्याची आवश्यकता नाही, या सनातन इस्लामच्या आग्रहामुळे मुसलमानांसमोर फार मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. इस्लामी धर्मशास्त्राची उभारणी ‘मन्सूख’वर म्हणजे नंतरच्या मार्गदर्शनाने अगोदरचे मार्गदर्शन रद्द होते, या तत्वावर झाली होती. कुराणातील मक्केच्या आयतांतून धार्मिक बाबतींत उदार स्वरूपाची मते सांगितली आहेत. उलट मदीनेच्या शेवटच्या आयतांतून मक्केच्या मूर्तिपूजकांविरुद्ध, ज्यूंविरुद्ध व ख्रिश्चनांविरुद्ध कठोर टीका आहे आणि धर्मयुद्ध करून सारी मानवजात इस्लामच्या झेंड्याखाली आणली पाहिजे, असा आदेश आहे. का अल् उम्म या ग्रंथाच्या चौथ्या भागात शाफी या प्राचीन धर्मपंडिताने अगोदरचे औदार्ययुक्त मार्गदर्शन रद्द झाले आहे, असे प्रतिपादिले. या मताला इतर पंडितांचीही पुष्टी मिळाली. त्यामुळे सर्व जगावर इस्लामी राज्य स्थापण्यासाठी ‘जिहाद’ केला पाहिजे, या मताला धार्मिक मान्यता मिळाली. मजीद कादरी या अर्वाचीन पंडिताने शरीयतप्रणीत शांतता आणि युद्धासंबंधीचे कायदे, अशा अर्थाचे शीर्षक असलेल्या आपल्या ग्रंथातही ‘इस्लामी शरीयतची अशी आज्ञा आहे, की सर्व जग इस्लामी स्वामित्वाखाली आणले पाहिजे’ असे ठासून सांगितले. आधुनिक युगात निरनिराळी स्वतंत्र राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांची प्रभुसत्ता आहे. मुसलमान आणि बिगरमुसलमान यांना दररोज जगात अनेक व्यवहारांत सहकार्य करणे भाग पडले आहे. शरीयतमध्ये मुसलमानांनी आपापसांत कसे वागावे आणि इतरांशी कसे संबंध ठेवावेत यांबाबत भिन्न आदेश आहेत. सर्व मानवांची समानता, स्त्री पुरुष समानता, राष्ट्रीय स्वातंत्र्य, धर्मातीत शासन इ. तत्वांचा आजच्या युगात फार मोठा प्रभाव आहे आणि हा प्रभाव वाढतच जाईल हे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी मनावर बिंबलेल्या परंपरागत कल्पना आणि आधुनिक युगातील वस्तुस्थिती यांतील तफावत दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. अर्थांतच ही कोंडी फोडण्यासाठी पाश्चिमात्य शिक्षण घेतलेले विचारवंत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. निरनिराळ्या इस्लामी देशांत मंजूर झालेले प्रागतिक कायदे या विचारवंतांच्या यशाचेच द्योतक आहेत.इस्लामी धर्मशास्त्राची छाननी पुन्हा सुरू झाली आहे आणि इस्लामस्थापनेपासूनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकांत निर्माण झालेल्या प्रश्नांचा आणि त्यावेळी उपस्थित केलेल्या मुद्यांचा पुन्हा अभ्यास चालू आहे. मन्सूख-तत्त्वाचे प्रत्यक्ष व्यवहारात उच्चाटन होत आहे. इस्लामच्या तिसऱ्या शतकात ‘मुताझिला’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या तत्त्ववेत्त्यांनी मन्सूख-तत्त्वाला विरोध केला होता आणि प्रागतिक व उदार मते मांडली होती. त्यावेळी त्यांची सपशेल हार झाली; परंतु आज हजार वर्षानंतर त्यांचेच विचार प्रभावी ठरू पाहत आहेत.