मुहंमदांनी अरबस्तानचे एक नवे राष्ट्र निर्माण केले. एक धर्म, एक भाषा आणि केंद्रीय राज्यकारभार यांनी एकसंध झालेले हे जगातील पहिलेच राष्ट्र होते. सर्व जग इस्लाममय करण्याच्या तीव्र आकांक्षेने नवोदित अरब राष्ट्राने एकामागून एक देश जिंकले. मुहंमदांच्या मृत्यूनंतर १०० वर्षांच्या आतच स्पेनपासून अफगाणिस्तानपर्यंतचा मुलूख काही अपवाद वगळता इस्लामी साम्राज्याखाली आला. यूरोपमध्ये सनातन ख्रिस्तवादाच्या प्रभावाने नवीन ज्ञान संपादन करणे तर दूरच राहो; पण आपल्याजवळ असलेल्या अमोल ठेव्याचे जतन करण्याचेही भान त्यांना उरले नव्हते. रोमन आणि पर्शियन साम्राज्ये मोडकळीस आल्यानंतर इस्लामचा उदय झाला आणि वायुवेगाने साम्राज्यवाढ करणे अरबी खलीफांना आणि त्यांच्या सैन्याला शक्य झाले. त्यानंतरच्या काळात ‘शिका, अधिक शिका; जमले तर चीनपासूनही शिका’, अशा अर्थाच्या मुहंमदांच्या उक्तीला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप देऊन ज्ञानपिपासू अरबांनी एक उच्चतर संस्कृती उभारली. इतर सर्व देश त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरले.बाराव्या शतकाच्या अखेरीस इस्लामची घोडदौड दुसऱ्यांदा भारतावर चालून आली. त्या आधी आठव्या शतकात सिंध, पश्चिम पंजाब आणि अफगाणिस्तान अरबांनी जिंकलेले होतेच. पृथ्वीराज चौहानाच्या काळात भारतात छोटी छोटी अगणित राज्ये होती. एकदा पृथ्वीराजावर विजय मिळविल्यानंतर छोटी छोटी निर्बल राज्ये पादाक्रांत करण्यास त्यांना मुळीसुद्धा अवधी लागला नाही. तुर्की सुलतानां अगोदरच चिस्तीसारख्या सूफी संतांनी ठिकठिकाणी ठाण मांडले होते. साम्राज्य निर्माण झाल्यावर या सूफी संतांनी देशभर आपले जाळे पसरविले आणि स्थानिक जनतेच्या मनावर आपला पगडा बसविला. युद्धात पराभव झालेल्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून आपले जीव वाचविले. पण सूफी संतांच्या प्रभावाने त्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात स्वखुषीने धर्मांतर झाले.
संदर्भ:
1. Arberry, A. J. Sufism: An Account of the Mystics of Islam, London, 1950.
2. Coulson, N. J. A History of Islamic Law, Edinburgh, 1964.
3. Daniel, N. A. Islam, Europe and Empire, Edinburgh, 1966.
4. Gibb, H. A. R. Modern Trends in Islam, Chicago, 1947