१९२१

जेणें जेणें आमुच्या मना समाधान । तें तें करुं ध्यान तुमचें देवा ॥१॥

करुनाकर तुम्हीं पतितपावना । अहो नारायणा वेदवंद्या ॥२॥

भाकितसों कीव होऊनि उदास । आता निराश नका करुं ॥३॥

एका जनार्दनीं नका दुजें आतां । अहो रुक्मादेवीकांता पाडुरंगा ॥४॥

१९२२

शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा । जाणतसे खुणा अंतरीच्या ॥१॥

तिहीं त्रिभुवनी चाले एक सत्ता । म्हणोनि तत्त्वतां कींव भाकी ॥२॥

करुणाकर तुम्ही भक्तांची जीवन । हें आम्हां वचन श्रुतिवाक्य ॥३॥

एका जनार्दनीं आलोंसें शरण । काया वाचा मन जडलें पायीं ॥४॥

१९२३

साचपणें माझें करावें धांवणें । काया वाचा मनें शरण तुम्हां ॥१॥

अहो पंढरीया नका आतां दुजें । विश्रांती सहज तवचरणीं ॥२॥

एका जनार्दनीं माझा अभिमान । वाढविलें आपण म्हणोनियां ॥३॥

१९२४

बहु उतावीळ । पाडुरंग तु दयाळ ॥१॥

मागेंतरिलें बहुतां । माझी असो द्यावी चिंता ॥२॥

दयाळ तूं पाडुरंगा । मज धरावें वोसंगा ॥३॥

सेवा तुम्हीं देवा । केली दुर्बळाची केशवा ॥४॥

उचिताउचित । एका जर्नादनीं मात ॥५॥

१९२५

भजन नाही मी अकार्मी वायां । अभिनव अवगति जाली देवराया ॥१॥

नीचानीच मीच एकु । मजवरी उपवरी वर्ते सकळ लोकु ॥२॥

अंधाअध अधोगत पाही । मजहुनी अंधाअंध कोनी नाहीं ॥३॥

एका जानर्दनीं नीच हा नेला । मुंगेयाचे पाई सगळा सामावला ॥४॥

१९२६

पंचाननें मज घेतलें वेढुन । नेताती काढुन प्राण माझें ॥१॥

गजेंद्राकारणें त्वांघातलीं उडी । तैसा लडसवडीं धांवे देवा ॥२॥

तुजवांचून मजनाहीं आधार । एका जानर्दनीं पार उतरीं देवा ॥३॥

१९२७

अहो नारायणा । सांभाळावें आम्हां दीना ॥१॥

आमुची राखावी ती लाज । परंपरा हेंचि काज ॥२॥

सांभाळावे ब्रीदावळी । करुणाकल्लोळीं दयाळ ॥३॥

एका जनार्दनीं शरण । करुणाकर पतितपावन ॥४॥

१९२८

थोर अन्यायी दयघना । सांभाळीं दीना आपुल्या ॥१॥

वारंवार क्षणक्षणीं । मस्तक चरणीं तुमच्या ॥२॥

कुर्वडीन आपुली काया । तुमचे पायांवरुनी ॥३॥

एका जनार्दनीं तुमचा दास । न करी उदास तयासी ॥४॥

१९२९

तुम्हीं कृपांवतं देव । माझा हेवा चुकवावा ॥१॥

सांपडलो काळाहातीं । उगवा गुंती तेवढी ॥२॥

माझें मन तुमचे चरणें । राहो चक्रपाणी सर्वदा ॥३॥

शरण एका जानर्दनीं । तुम्हीं धनी ब्रह्मांडीं ॥४॥

१९३०

आम्हां तुमचा भरंवसा । सांभाळावें जगदीशा ॥१॥

आपुली आपण जतन करा । ब्रीदावली हे दातारा ॥२॥

आम्हीं पतितांनी कोडें । तुम्हां घातलें सांकडें ॥३॥

शरण एका जानर्दनीं । मोक्ष मुक्ति तुमचें चरणीं ॥४॥

१९३१

वायां बोभाट अनंता । शरणगता उपेक्षिलिया ॥१॥

अपमानाचें भातुकें । तुम्हां सुखे देतील ॥२॥

एका परीस एक थोर । तुमचा बडिवार चालुं नदेती ॥३॥

विनती जनर्दनाचा एका । देवा लौकिका सांभाळा ॥४॥

१९३२

तुम्ही बहुतांचे केलेंसे धांवणें । आतां नारयणें कठेण केलें ॥१॥

हो उनी उदास अवलोकितो दिशा । पुरवा माझी इच्छामायाबापा ॥२॥

एका जानर्दनीं त्रैलोकीं नाम । तुम्हीं तो निष्काम देवा बहु ॥३॥

१९३३

धांवण्या धांवतां न लावा उशीर । हा श्रेष्ठाचार मागें आला ॥१॥

गुणदोष नाहीं पाहिले कवणाचे । केलें बहुतांचे धांवणें देवा ॥२॥

एका जनार्दनीं पतितपावन । हें तों तुम्हां वचन साजतसे ॥३॥

१९३४

जाणा पाळूं कळा । कृपाळुवा जी दयाळा ॥१॥

कां हो आतां उपेक्षिलें । मज दीनासी ये वेळें ॥२॥

पाहतं वास देऊनी धीर । कां हो पडियेला विसर ॥३॥

चित्त सर्व तुमचें पायीं । कृपावंत भेटी देईं ॥४॥

एका जनार्दनीं एकपणें । तया नाहीं दुजें पेणें ॥५॥

१९३५

तुम्हीं कूपाळु कृपाळु । विश्वजन प्रतिपाळ ॥१॥

म्हणोनि येतों काकुलती । कूपाळुवा श्रीपती ॥२॥

एका जनार्दनीं देवा । सर्व सारुनि पायीं ठेवा ॥३॥

१९३६

अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । म्हणवोनि सांभाळ करीं माझा ॥१॥

तुज ऐसा देव नाहीं त्रिभुवनीं । म्हणोवोनि चरणीं विनटलों ॥२॥

बापा जनार्दनीं कृपा करीं दान । सांभाळीं वचन आपुलें तें ॥३॥

एका जनार्दनीं भेटी देई देवा । संतपायीं भावा मिठी पडी ॥४॥

१९३७

आनदाचा भोग घालीन आसनीं । वैकुंठनिवासनी तुझेंनावें ॥१॥

येई वो विठ्ठले अनाथाचे नाथे । पंढरी दैवते कुळदेवी ॥२॥

आपुलें म्हणावें सनाथ करावें । एका जानर्दना वंदावें संतजना ॥३॥

१९३८

कैं तयामागें चरण चालती । ऐशी वाटे खंती दिनराती ॥१॥

कैं या मनाची पुरेल वासना । कैं मिठी चरणा देईन जीवें ॥२॥

कैं हें भाळ ठेवीन चरणीं । कैं पायवनी घेईन सुखें ॥३॥

एका जनार्दनीं कैं होईल कृपादान । कैं नारायण प्रेमें भेटे ॥४॥

१९३९

वारंवार देही हेचिं पैं वासना । अखंड चरणा घालीन मिठी ॥१॥

हा माझा नवस आठवीन पाय । आणिक तें कांहीं नेणें दुजें ॥२॥

संअल्पासी कैं येईल । कैं धीरा धीर होईल मन ॥३॥

एक जनार्दनीं अखंड वासना । पुरवा नारायणा देउनी भेटी ॥४॥

१९४०

कृपाळु माउली उभी भीमातटीं । लागलीसे आशा जीवासी मोठी ॥१॥

कई भेटेल माझा मायबाप । उजळोनी दीप ओवाळीन श्रीमुख ॥२॥

शुन्य स्थावर व्यापुनी वेगाळा राहे । एका जानार्दनीं वंदीन त्याचे पय ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel