२३४१

प्रपंचाचें भान । आहे मृगजळासमान ॥१॥

नाथिलेंचि सत्य दिसे । सत्य आहे तें आभासे ॥२॥

मृगजळीम उप्तत्ति नाहीं । पाहतां अवघे मिथ्या पाहीं ॥३॥

एका जनार्दनीं शरण । मिथ्या अवघे देह जाण ॥४॥

२३४२

सागरींची लहरी । मी एक म्हणे सागरीं । तैसा तुझा तुंचि तुजवरी । एकदशीं ॥१॥

शुद्ध आणि शबल । तुंचि एक सकळ । औटहात केवळ । ते तंव कल्पना तुझी ॥२॥

डोळे झाकून किती । पहासी आतौतें । बाहेर न करी ते वोस पाडुं ॥३॥

सबाह्म संमतु असतां वाडेंकोडें । एक देशीं थोडें कल्पनेसाठीं ॥४॥

लेंकुराचें खेळणीं । दिवस म्हणती जाली रजनी । उठती लटिके निजोनी । आतां उदयो जाला ॥५॥

तेथे अखंड प्रकाश पाहो । उदयो अस्त दोन्हीं वावो । तैसा भावो आणि अभावो । एका जनार्दन चरणीं ॥६॥

२३४३

स्वप्नें दिसे स्वयेंचि नासे । तैसें काल्पनिक जग भासे ॥१॥

मुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजीं नसे शीतळ जळ ॥२॥

पिंपळावरुनी मार्गु आहे । ऐकोनी वृक्षा वेघों जाये ॥३॥

ऐसेंक अभागीं पामर । नकळे तयांसी विचार ॥४॥

म्हनॊनि शरण जनार्दनी । एका जनार्दनीं एकपणीं ॥५॥

२३४४

मृगजळाचें दोहीं निःशेष जळ नाहीं । यापरी माया समूळ मिथ्या पाहीं ॥१॥

माया नाहीं माया नाहीं । जगचि ब्रह्मारुप पाहीं ॥२॥

दोराचें सर्पत्व जिताचि मेलें । मायोची बद्धता तुजचि तुझेनि बोले ॥३॥

एका जनार्दनीं पाहतां चैतन्यघन । बद्धता मुक्तता समुळ मिथ्या जाण ॥४॥

२३४५

मृगजळ जेथें नसे । तेथें वसे कोरडें ॥१॥

ऐसा घ्यावा अनुभव । पदोपदीं भाव जीवासी ॥२॥

जे दिसें ते नासे । ऐसें असे सर्वत्र ॥३॥

यापरी जाणावें मिथ्यापण । शरण एका जनार्दन ॥४॥

२३४६

मृगजळीं पहातां दिसतसे जळ । परी तें कोरडेंचि केवळ ॥१॥

तेवीं दिसे जगदाभास । अवघा मिथ्या साभिलाष ॥२॥

जेथें मिथ्या द्वैत भाविक । पहातां जनार्दनचि एक ॥३॥

तरंग हरपलें पाणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥

२३४७

दोरा अंगीं जैसा नसतां सर्प दिसे । मिथ्या देह तैसा वस्तूवरी आभासे ॥१॥

देह मी नव्हे देह मी नव्हे । देह मी नव्हे माझेनी अनुभवें ॥२॥

घटीं वर्तूळ आकाश परि तें महदाकाश । विकारवंत देह चैतन्य विलास ॥३॥

एका जनार्दनीं दो नांवीं एक । देह झाला मेला समूळ मिथ्या देखा ॥४॥

२३४८

आकाशापासोनी वायु झाला । तो गगनावेगळा नाहीं गेला ॥१॥

अग्नीपासुनी जळाचा अंशु । जळापासुनी पृथ्वीप्रकाशु ॥२॥

तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण ॥३॥

जेवीं तंतु आणि पटु । दोन्हीं दिसती एकवटु ॥४॥

साखरेचे नारळ केले । परि साखरत्व नाहीं मुकले ॥५॥

जेवीं कां पृथ्वीमृत्तिका । मृत्तिकेंचें भांडें देखा ॥६॥

ऐसें कार्यकारण विशेष । एका जनार्दनीं निज दास ॥७॥

२३४९

वांझचिया बाळा बागुलें ग्रासिलें । तैसे मिथ्या देह कळिकाळें ग्रासिलें ॥१॥

नेणा नवलावो जाणा ब्रह्माभावो । देहींचा संभव समूळ मिथ्या ॥२॥

जळगार पाषाण तें जैसें जीवन । साकार देह तैसा ब्रह्मार्पण ॥३॥

एका जनार्दन एकत्व पाहीं । देहविदेह समुळ तेथे नाहीं ॥४॥

२३५०

अष्टही दिशा पुर्ण भरला देव । मा पुर्व पश्चिम भाव तेथें कैंचा ॥१॥

पाहे तिकदे देव व्यापुनी भरला । रिता ठाव ठरला कोठें नाहीं ॥२॥

समाधी समाधान मनाचें उन्मन । मा देवा भिन्नपण नाहीं नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं एकपणासाठीं । देव पाठीपोटीं भक्तामागें ॥४॥

२३५१

अष्टदिशी व्यापक नारायण । तेथें नाहीं पूर्व पश्चिमेंचें भान ॥१॥

पहा कर्माची राहाटी । सर्व व्यापक संकल्प म्हणती उठाउठी ॥२॥

नको विष्णु म्हणतां भेद उरला नाहीं । भेदभावें पाहाती सर्वाठायीं ॥३॥

भेदाभेद टाकुनी देई वेगें । एका जनार्दनीं शरण रिघे ॥४॥

२३५२

साकर दिसे परि गोडी न दिसे । तें काय त्यावेगळी असे ॥१॥

तैसा जनीं आहे जनार्दन । तयांचें पहावया सांडीं अभिमान ॥२॥

कापुराअंगीं परिमळु गाढा । पाहतां उघडा केविं दिसे ॥३॥

पाठपोट जैसें नाहींच सुवर्णा । एका जनार्दन यापरी जाणा ॥४॥

२३५३

भजतां भजन एका जनार्दन । ब्रह्मा परिपुर्ण सर्व एका ॥१॥

सांडुनी वासना भजतां भजन । ब्रह्मा परिपुर्ण सर्व एक ॥२॥

विषयवासना त्यागितां संपुर्ण । ब्रह्मा तें संपुर्ण सर्व एक ॥३॥

एका जनार्दनीं एकत्व भाव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥४॥

२३५४

जैशी देहापाशीं छाया । तैशी दिसे मिथ्या माया ॥१॥

आत्मा शुद्ध काया मळीन । काया जड आत्मा चिदघन ॥२॥

जीव अलिप्त माया गुणी । माया वेष्टन जीवालागुनी ॥३॥

एका जनार्दनीं शिव । सदा असे स्वयमेव ॥४॥

२३५५

ऐसा ज्याचा एक भाव । तेथें नाहीं द्वैता ठाव ॥१॥

द्वैत अद्वैत हारपलें । अवघें एकरुप जाहलें ॥२॥

संकल्प विकल्प विराला । अवघा देहीं देव जाहला ॥३॥

एका जनार्दनीं ठाव । स्वयमेव भरला देव ॥४॥

२३५६

परमात्मा एकला एक । एकपणें तोचि अनेक ॥१॥

तेथें जाती विजाती नाहीं देखा । महा सुखा सुखपात्र ॥२॥

म्हणे जनार्दनाचा एक । आत्मा सारिखा सर्व देहीं ॥३॥

२३५७

आत्मा केवळ एकला एक । तेथें सुखदुःख कैंचे ॥१॥

आत्मा सुखदुःखावेगळा । हें तों न कळे कळा तयाची ॥२॥

म्हणे जनार्दनाचा एका । आत्मा देखाक सर्वघटीं ॥३॥

२३५८

घटामाजीं घालिजे अमृत । अथवा घालिजे खात मूत ॥१॥

घट घाई करितां चूर । आकाशासी नुमटे चीर ॥२॥

घट फोडुनी केला नाश । आकाश तैसेंचि अविनाश ॥३॥

तेवीं देव नश्वर जाण । एका जनार्दनीं परिपुर्ण ॥४॥

२३५९

घटामाजीं जीवन घालितां अभ्र दिसों लागें सर्वथा ॥१॥

घट फुटलिया जाण । अभ्र न नासेचि पुर्ण ॥१॥

घटाकार देहस्थिती । जाणावी पां त्वां निश्चिती ॥३॥

एका जनार्दनीं पूर्ण । सबाह्म आत्मा परिपुर्ण ॥४॥

२६६०

देही असोनि देहातीत । भूतीं भूतात्मा भगवंत ॥१॥

भिन्न खाणी भिन्नाकार । चिदात्मा हा निर्विकार ॥२॥

एक निश्चयो नाहीं चित्तीं । एका जनार्दनीं वायां भक्ति ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel