''ताई, मी येईपर्यंत रंगाला जपा, सांभाळा.''
''चिंता नको करुं.''
''मघाचें त्याचें बोलणें ऐकून हृदयाला चर्र झालें.''
''सांभाळणारा प्रभु.''
गाडी गेली. नयना जड मनानें घरीं जात होती. वडिलांच्या हृदयाला पाझर फोडायला जात होती, होतील का ते प्रसन्न, देतील का आशीर्वाद, देतील का मदत ?
नयना गेल्यापासून रंगा अधिकच अशक्त झाला. तो विषेश बोलत नसे. कांही दिवस गेले.
''ताई, नयनाचें पत्र आलें का ? कधीं येणार ती ?''
''तुझ्या हवापालटाची सारी व्यवस्था करुन येईल.''
''कसली हवापालट ? मी आतां एकदम थेट जाणार आहें. वासुकाकांच्या जवळ, आईबाबांजवळ, देवाच्या घरीं.''
''असें नको बोलूं रंगा. तुझें जरा पाय चेपूं ?''
''नको. तुम्हां सर्वांना माझ्यासाठीं किती त्रास ! मी कोठला कोण ? जन्मल्यापासून मी सर्वांना राबवित आहें. पुरे हें जीवन, निरुपयोगी, निस्सार जीवन. मी कोण भारताची कीर्ति दिगंतांत नेणारा ? व्यासवाल्मीकीनीं, राम-कृष्णबुध्दंनीं, महात्माजी, गुरुदेव, पंडितजी, यांनी ती दिगंत नेली आहे. उगीच मला मूर्खाला कांही तरी वाटे. बुडबुड्यानें क्षणभर सूर्याच्या प्रकाशानें रंगून मिरवावें तसा मी. वासुकाका म्हणायचे आणि मला बावळटाला तें खरें वाटायचें. ते प्रेमानें म्हणत. मी वेडा. कांही तरीच मला वाटे. आज मी कोण तें मला कळलें. झाडाचें मी एक पान, पावसाचा मी एक थेंब. गवताची मी एक काडी, वाळूचा मी एक कण.''
''रंगा नको बोलूं'' ताई म्हणाली.
''बोलूं दे. खेळ खलासच व्हायचा आहे सारा.''
''खेळाला आतां तर सुरवात झाली. नयना किती आशेनें आहे. तुला दूर नेईल, बरें करील.''
''परंतु प्रभूच दूर नेणार आहे, बरें करणार आहे.'' सुनंदाआईंना आतां राहवेना. त्या पुढें आल्या. रंगाजवळ बसून म्हणाल्या:
''असें कांही बोलूं नकोस. तुला त्यांचें स्वप्न पुरें करायचें आहे.''
''माझी ती पात्रता नाहीं. माझ्यांतून सारी शक्ति जात आहे असें वाटतें.''