'' .... उगीच कशाला खोटें सांगूं ! डॉक्टरसाहेब, माझी सगळी दौलत जर म्हणाल, तर दोन हजार रुपये. ते मीं कधींच बायकोच्या नांवानें बँकेत करुन ठेवले आहेत. घर नाहीं, शेत नाहीं, कांहीसुद्धां नाहीं बरें आपण विचाराल, कीं हे दोन हजार रुपये तरी कोठून आले ? तर, माझ्या वडिलांनी मरायच्या आधीं, जे काय घरामध्यें डागडागिने होते ते सगळे मोडून टाकले. अन् त्यांचे जे हे रुपये आले, ते त्यांनी आईच्या नांवानें बँकेत ठेवून दिले. झालें ! वडील वारले तेव्हां मी अगदीच लहान होतों. आई नुकतीच वारली ! आणि मीही पण लवकरच - हं ! डॉक्टरसाहेब ! माझ्या डोळ्यांवर दुर्दैवानें रचीत आणलेली ही काळोखाची भिंत, चारपांचशें रुपये खर्च केल्याशिवाय, कांहीं आतां उतरतां यायची नाहीं ना ? अहो ! महिना बारा - पंधरा रुपये मिळविणारा मी माणूस - हा ! वर्षभर तर जवळजवळ मी घरींच बसून आहें कीं ! आतां मी आणूं कोठले इतके रुपये ! - काय निघालां ? हे घ्या. ही तुमची डोळे तपासायची पांच रुपये फी. - कांही नाही ! अशक्तपणामुळें माझा हात इतका कांपत आहे ! - घेतलीत ? आपले माझ्यावर फार उपकार झालें ! डॉक्टरसाहेब ! या बरें !.... ''

'' .... माझ्या या त्रासानें नासलेल्या मस्तकांतील किडयांचें गुणगुणणें आतां थांबणार तरी केव्हां ? - ' तूं आपले डोळे लवकर बरे कर, नाहीं तर जन्मभर ही काळतोंडी मध्यानरात्र - बाबा रे ! - एकसुद्धां, अगदीं लहानसा तारासुद्धां आतां चमकलेला दिसायचा नाहीं ! - जिवाचें रक्त शोषीत सारखी तुझ्या डोळ्यांत बसेल ! आयुष्यभर रडत बसावें लागेल ! डोळे मुठींत धरुन, तुला रडत बसावें रे लागेल ! ' - काय ? माझ्या - नाहीं, माझ्या लाडकीच्या दोन हजारांतले चारशें रुपये खर्च करुं ? आणि डोळे बरे झालेच नाहींत तर ? मग कसें ! - थांबलें कीं नाही अजुन तुमचें गुणगुणणें ? का अशी ताडकन् थप्पड - अरे ! हें काय ! माझ्या हाताच्या फटकार्‍यानें हा ग्लासच फुटला वाटतें ? हाताला किती बारीक बारीक तुकडे लागत आहेस हे ! - हं : काय पहा ! हाताच्या एका फटकार्‍यासरशीं हें काचेचें भांडें फुटलें ! - पण, अहोरात्र मनः संतापाचें कडकडून दांत चावणें, व जोरानें वळलेल्या मुठीचे धडाधड प्रहार होणें चाललेलें असतें, तरी हा जीव कांही केल्या फुटतच नाहीं ! आंधळ्या ! तूं आतां जगून तरी काय करणार ? अरे ! आपल्या मेलेल्या जिवंतपणानें तिला आतां नको रे छळीत बसूं ! - सखे ! - अरे नको नको, निजूं दे तिला. चांगली गाढ झोंप लागली आहे - ही काय वाटी सांपडली वाटतें ! फार छान झालें ! या काचांचे बारीक तुकडे करुन, देतों या नरडयांत ती पूड ओतून; म्हणजे चांगली आंतडी तुटून जिवाची कायमची सुटका तरी होईल ! पण थांबा, मी जर असा जीव दिला, तर माझ्यामागें हिचे किती बरें हाल होतील ! हिला किती यातना सोसाव्या लागतील ! - सखें, माझ्यामागें तुला कोण बरें प्रेमाने वागवील ? - नको ते मरणाचे भयंकर विचार ! - हो, हा हाताला काचेचा चुरा फेंकूनच द्यावा; पण - जिवंत राहून हिला जन्मभर रडविण्यापेक्षां, एकदांचें मरुन जाऊन थोडेच दिवस रडविणें बरे नव्हे का ? - अरे नको थांबूं आतां ! आटप लवकर ! जिवा ! अशी घाई कां ? बाबा रे, आत्महत्या करुन आपल्या बायकोला जर दुःखांत लोटलें, तर जग मला काय बरें म्हणेल ? दुष्ट नाहीं का म्हणणार ? - काय ? तुझ्या तडफडण्यापुढें जनावापवादाला मान देऊं नको ? - जा ! - अशा धडक्या घेऊं नकोस ! सोडतों तुला ! - सगळा चुरा पोटांत गेला ! - आतां मी कायमचा सुटणार ! - हाय ! सखे ! मी तुला आतां टाकून - हां चूप रहा ! निजूं दे तिला ! - देवा ! या जगांतल्या प्रत्येक वस्तूला आपल्या पापी नजरेनें भ्रष्ट केल्यामुळें, आंधळा झालेला हा दुरात्मा आतां नरकांत - आलों ! थांबा - .... ''

३० नोव्हेंबर १९११

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel