संजय म्हणाला

असा तो करुणा-ग्रस्त घाबरा अश्रु गाळित । करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला ॥ १ ॥

श्री भगवान म्हणाले

कोठूनि भलत्या वेळी सुचले पाप हे तुज । असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ति दुर्गति ॥ २ ॥

निर्वीर्य तू नको होऊ न शोभे मुळी हे तुज । भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ तू कसा ॥ ३ ॥

अर्जुन म्हणाला

कसा रणांगणी झुंजू भीष्म-द्रोणांविरुद्ध मी । ह्यांस बाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की ॥ ४ ॥

न मारिता थोर गुरूंस येथे । भिक्षा हि मागूनि भले जगावे ॥ हितेच्छु हे ह्यांस वधून भोग । भोगू कसे भंगुर रक्त-मिश्र ॥ ५ ॥

ह्यांचा चि व्हावा जय आमुचा की । कशात कल्याण असे न जाणो ॥ मारूनि ज्यांते जगणे न इच्छू । झुंजावया ते चि उभे समोर ॥ ६ ॥

दैन्याने ती मारिली वृत्ति माझी । धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे ॥ कैसे माझे श्रेय होईल सांगा । पायांपाशी पातलो शिष्य-भावे ॥ ७ ॥

मिळेल निष्कंटक राज्य येथे । लाभेल इंद्रासन देव-लोकी ॥ शमेल त्याने न तथापि शोक । जो इंद्रियांते सुकवीत माझ्या ॥ ८ ॥

संजय म्हणाला

असे अर्जुन तो वीर हृषीकेशास बोलुनी । शेवटी मी न झुंजे चि ह्या शब्दे स्तब्ध राहिला ॥ ९ ॥

मग त्यास हृषीकेश जणू हसत बोलिला । करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा ॥ १०॥

श्री भगवान् म्हणाले

करिसी भलता शोक वरी ज्ञान हि सांगसी । मेल्या-जित्यावीषी शोक ज्ञानवंत हि जाणती ॥ ११ ॥

मी तू आणिक हे राजे न मागे नव्हतो कधी । तसे चि सगळे आम्ही न पुढे हि नसू कधी ॥ १२ ॥

ह्या देही बाल्य तारूण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ॥ १३ ॥

शीतोष्ण विषय-स्पर्श सुख-दुःखात घालिती । करी सहन तू सारे येती जाती अनित्य ते ॥ १४ ॥

ह्यांची मात्रा न चाले चि ज्या धीर पुरूषा वरी । सम देखे सुखे दुःखे मोक्ष-लाभास योग्य तो ॥ १५ ॥

नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाश हि । निवाडा देखिला संती ह्या दोहींचा अशापरी ॥ १६ ॥

ज्याने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू । नाश त्या नित्य-तत्त्वाचा कोणी हि न करू शके ॥ १७ ॥

विनाशी देह हे सारे बिलिले त्यात शाश्वत । नित्य निःस्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव ॥ १८ ॥

जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे । दोघे न जाणती काही न मारी न मरे चि हा ॥ १९ ॥

न जन्म पावे न कदापि मृत्यु । होऊनी मागे न पुढे न होय ॥ आला न गेला स्थिर हा पुराण । मारोत देहास परी मरे ना ॥ २० ॥

निर्विकार चि हा नित्य जन्म मृत्यू हुनी पर । जाणे हे तत्त्व तो कैसा मारी वा मारवी कुणा ॥ २१ ॥

सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे । मनुष्य घेतो दुसरी नविन ॥ तशीचि टाकूनि जुनी शरिरे । आत्मा हि घेतो दुसरी निराळी ॥ २२ ॥

शस्त्रे न चिरिती ह्यास । ह्यास अग्नि न जाळितो ॥ पाणी न भिजवी ह्यास । ह्यास वारा न वाळवी ॥ २३ ॥

चिरवे जाळवे ना हा । भिजवे वाळवे हि ना ॥ स्थिर निश्चळ हा नित्य । सर्वव्यापी सनातन ॥ २४ ॥

न देखू ये न चिंतू ये । बोलिला निर्विकार हा ॥ जाणूनि ह्यापरी आत्मा । शोक योग्य नसे तुज ॥ २५ ॥

अथवा पाहसी तू हा । मरे जन्मे प्रतिक्षणी ॥ तरी तुज कुठे येथे । नसे शोकास कारण ॥ २६ ॥

जन्मता निश्चये मृत्यू । मरता जन्म निश्चये ॥ म्हणूनी न टळे त्याचा । व्यर्थ शोक करू नको ॥ २७ ॥

भूतांचे मूळ अव्यक्ती । मध्य तो व्यक्त भासतो ॥ पुन्हा शेवट अव्यक्ती । त्यामधे शोक कायसा ॥ २८ ॥

आश्चर्य जो साच चि ह्यास देखे । आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी ॥ आश्चर्य जो वर्णन ते हि ऐके । ऐके तरी शून्य चि जाणण्याचे ॥ २९ ॥

वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा । म्हणूनी भूतमात्री तू नको शोक करू कधी ॥ ३० ॥

स्वधर्म तो हि पाहूनि न योग्य शगणे तुज । धर्म-युद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले ॥ ३१ ॥

प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे । क्षत्रियास महा-भाग्ये लाभते युद्ध हे असे ॥ ३२ ॥

हे धर्म-युद्ध टाळूनि पापात पडशील तू । स्वधर्मासह कीर्तीस दूर सारूनिया स्वये ॥ ३३ ॥

अखंड लोक गातील दुष्कीर्ति जगती तुझी । मानवंतास दुष्कीर्ति मरणाहूनि आगळी ॥ ३४ ॥


भिऊनि टाळिले युद्ध मानितील महा-रथी । असूनि मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की ॥ ३५ ॥


बोलितील तुझे शत्रु भलते भलते बहु । निंदितील तुझे शौर्य काय त्याहूनि दुःखद ॥ ३६ ॥


मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने मही-तळ । म्हणूनि अर्जुना उठ युद्धास दृढ-निश्चये ॥ ३७ ॥


हानि लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम । मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुज ॥ ३८ ॥


सांख्य-बुद्धि अशी जाण ऐक ती योग-बुद्धि तू । तोडिशील जिने सारी कर्माची बंधने जगी ॥ ३९ ॥


न बुडे येथ आरंभ न घडे विपरीत हि । जोडा स्वल्प हि हा धर्म तारी मोठ्या भयातुनी ॥ ४० ॥


ह्यात निश्चय लाभूनि बुद्धि एकाग्र राहते । निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपती चि ना ॥ ४१ ॥


अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया । वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ॥ ४२ ॥

जन्मूनिया करा कर्मे मिळवा भोग-वैभव । भोगा कर्म-फळे गोड सांगती स्वर्ग-कामुक ॥ ४३ ॥

त्यामुळे भुलली बुद्धि गुंतली भोग वैभवी । ती निश्चय न लाभूनि समाधीत नव्हे स्थिर ॥ ४४ ॥

तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू । सत्त्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध ॥ ४५ ॥

सर्वत्र भरले पाणी तेंव्हा आडात अर्थ जो । विज्ञानी ब्रम्ह-वेत्त्यास सर्व वेदात अर्थ तो ॥ ४६ ॥

कर्मात चि तुझा भाग तो फळात नसो कधी । नको कर्म-फळी हेतु अकर्मी वासना नको ॥ ४७ ॥

फळ लाभो न लाभो तू निःसंग सम होऊनी । योग-युक्त करी कर्मे योग सार समत्व चि ॥ ४८ ॥

समत्व-बुद्धि ही थोर कर्म तिहूनि हीन चि । बुद्धीचा आसरा घे तू मागती फळा दीन ते ॥ ४९ ॥

येथे समत्व-बुद्धीने टळे सुकृत-दुष्कृत । समत्व जोड ह्यासाठी ते चि कर्मात कौशल ॥ ५० ॥

ज्ञानी समत्व-बुद्धीने कर्माचे फळ सोडुनी । जन्माचे तोडिती बंध पावती पद अच्युत ॥ ५१ ॥

लंघूनि बुद्धि जाईल जेंव्हा हा मोह-कर्दम । आले येईल जे कानी तेंव्हा जिरविशील तू ॥ ५२ ॥

श्रवणे भ्रमली बुद्धि तुझी लाभूनि निश्चय । स्थिरावेल समाधीत तेंव्हा भेटेल योग तो ॥ ५३ ॥

अर्जुन म्हणाला

स्थिरावला समाधीत स्थित-प्रज्ञ कसा असे । कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ॥ ५४ ॥

श्री भगवान् म्हणाले

कामना अंतरातील सर्व सोडूनि जो स्वये । आत्म्यात चि असे तुष्ट तो स्थित-प्रज्ञ बोलिला ॥ ५५ ॥

नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे । नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित-प्रज्ञ संयमी ॥ ५६ ॥

सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता । न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ५७ ॥

घेई ओढूनि संपूर्ण विषयातूनि इंद्रिये । जसा कासव तो अंगे तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली ॥ ५८ ॥

निराहार-बळे बाह्य सोडी विषय साधक । आंतील न सुटे गोडी ती जळे आत्म-दर्शने ॥ ५९ ॥

करीत असता यत्न ज्ञात्याच्या हि मनास ही । नेती खेचूनि वेगाने इंद्रिये दांडगी चि की ॥ ६० ॥

त्यास रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण । इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ६१ ॥

विषयांचे करी ध्यन त्यास तो संग लागला । संगांतूनि फुटे काम क्रोध कामात ठेविला ॥ ६२ ॥

क्रोधातूनि जडे मोह मोहाने स्मृति लोपली । स्मृति लोपे बुद्धि-नाश म्हणजे आत्म-नाश चि ॥ ६३ ॥

राग-द्वेष परी जाता आली हातात इंद्रिये । स्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नता ॥ ६४ ॥

प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडूनिया । प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ॥ ६५ ॥

अयुक्तास नसे बुद्धि त्यामुळे भावना नसे । म्हणूनि नमिळे शांति शांतीविण कसे सुख ॥ ६६ ॥

इंद्रिये वर्तता स्वैर त्यामागे मन जाय जे । त्याने प्रज्ञा जशी नौका वार्‍याने खेचली जळी ॥ ६७ ॥

म्हणूनि इंद्रिये ज्याने विषयातूनि सर्वथा । ओढूनि घेतली आंत त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥ ६८ ॥

सर्व भूतास जी रात्र जागतो संयमी तिथे । सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्र ती ॥ ६९ ॥

न भंग पावे भरता हि नित्य । समुद्र घेतो जिरवूनि पाणी ॥ जाती तसे ज्यात जिरूनि भोग । तो पावला शांति न भोग-लुब्ध ॥ ७० ॥

सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि निःस्पृह । अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ॥ ७१ ॥

अर्जुना स्थिती ही ब्राम्ही पावता न चळे पुन्हा । टिकूनि अंत-काळी हि ब्रम्ह-निर्वाण मेळवी ॥ ७२ ॥

दुसरा अध्याय समाप्त .....

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel