पुष्पांचा गजरा विशीर्ण मजला वाटेवरी आढळे
त्याची खिन्न विपन्न पाहुन दशा, त्याला करी घेतले
होता येत सुवास त्यास अजुनी, गेला जरी कोमुन
काले जाय निघून यौवन परी मागे उरे सदगुण
कोणाचा गजरा ? प्रमत्त तरुणी-वेणीतुनी हा पडे ?
किंवा होउन प्रेमभंग युवती याला झुगारुन दे ?
शृंगारास्तव भामिनीस गजरा आणी तिचा वल्लभ
त्याने काढुनि टाकिला निज करे, की होय हा निष्प्रभ !
आता मागिल सर्व वैभव तुझे स्थानच्युता ओसरे !
बाला कोण तुला धरुन हृदयी चुंबील हुंगील रे !
कृष्ण, स्निग्ध, सुगंधयुक्त विपुला त्या केशपाशावरी
डौलाने मिरवेन हासत, अशी आशा न आता धरी
घेई मानुनि तू तथापि गजर्या चित्ती समाधान हे
की एका कवितेत भूषित मला केले कवीने स्वये !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.