संत तुकाराम

अखंड, अनाहत कीर्तनामुळे ज्यांची काया ब्रह्मभूत झाली असे साक्षात्कारी ‘सत्पुरूष’; जगाच्या कल्याणासाठी स्वत:चा देह कष्टवणारे व जगाला आध्यात्मिक दीक्षा देणारे ‘जगद्गुरू’ आणि भागवत धर्माचा कळस झालेले ‘संतश्रेष्ठ’!

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निभिर्र्ड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक, सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच,तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

   

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणीपरब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानते.

   

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले.  देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.    

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

एका शुचिष्मंत घराण्यात पुणे जिल्ह्यातील देहू येथे शके १५३० मध्ये (इ. स. १६०८) वसंत पंचमी (माघ शु. पंचमी) या दिवशी त्यांचा जन्म झाला. नुकतीच इ. स. २००८ या वर्षी त्यांच्या जन्माला ४०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती.  पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे  आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला.

 

भामगिरी पाठारी वस्ती जाण केली। वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।

सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले। पिडू जे लागले सकळीक।।

पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार।।

या शब्दांत त्यांच्या तपश्र्चर्येचे वर्णन केलेले आढळते.

सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही व्यक्त करणे हेच संत तुकारामांचे जीवन होते. ‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी। आणिक न करी तीर्थव्रत।।’ या वचनावरून पंढरपूरचे त्यांच्या जीवनातील स्थान लक्षात येते.  पांडुरंग हेच त्यांचे दैवत होते.

वेद, गीता, भागवत, ज्ञानेश्र्वरी, पुराणांचा त्यांचा अभ्यास होता हे दिसून येते. अस्सल मराठमोळी भाषा हे त्यांच्या रचनांचे मुख्य वैशिष्ट्य होय. वैराग्याच्या कसोटीवरचा आत्मानुभव अनंत गुणांनी त्यांच्या अभंगवाणीत प्रगट झाल्याचा दिसतो. त्यांच्यारचनांतून श्रीविठ्ठलभक्तीसह संत-गुणवर्णन; कर्मठपणा व अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक विषय समोर येतात. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो.

उदाहरणार्थ,

‘‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।

तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।’’

‘‘संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।’’

‘‘तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।’’

‘‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।’’

‘‘ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।’’

‘‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।’’

‘‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।’’

तुकोबांचे हे अभंग समाजातील सर्व स्तरांत इतके झिरपले आहेत, की असंख्य लोकांच्या मुखांतून त्याचे चरण सहजगत्या बाहेर पडतात. अनेक चरण हे मराठी भाषेतील सुविचारच बनून गेले आहेत. अवघ्या ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सुमारे ५००० अभंगांची रचना केली. प्रत्येक क्षण त्यांनी भक्तीने व नामसंकीर्तनाने जागविला.

‘आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा राम राम घ्यावा।।’, असे म्हणत तसेच,

सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावे तुम्ही।।

वाढवेळ झाला उभा पांडुरंग। वैकुंठा श्रीरंग बोलावतो।।

आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी।।

अंत:काळी विठो आम्हासी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका।।

असे म्हणत ते फाल्गून वद्य द्वितीया शके १५७१ मध्ये (इ. स.१६४९) ब्रह्मलीन झाले. (शके पंधराशे एकाहत्तरी। विरोधक्ष नाम संवत्सरी। फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारी। प्रथम प्रहरि प्रयाण केले।। अशी नोंद आढळते.)

श्रीसंत तुकारामांचे सार्थ वर्णन कवी वामन पंडित यांनी पुढील शब्दांत केले आहे.

जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी। म्हणावे कसे हो तया लागी वाणी।।

परब्रह्मरूपी असा जो तुकावा। तयाचे तुकी कोण दुजा तुकावा।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel