जीव :- असें कोण करील, कोण शिकवील ?
गणेश :- अरे तुमची कांग्रेस शिकवीत आहे. कांग्रेस म्हणजे जणूं माझें मंगलरूप. कांग्रेसनें आपले दरवाजे सर्वांसाठीं खुले ठेवले आहेत. कोणा एका वर्गाचें, कोणा एका धर्माचें, कोणा एका जातीचें हित ती पहात नाहीं. 'यारे सारे अवघे जण' अशी ती हांक मारीत आहे. त्या कांग्रेसनें मुसलमानांसहि जवळ घेतलें आहे, हरिजनांना पोटाशी धरलें. परन्तु तुम्हीं तिला दगड मारतां, शिव्या देतां. ते दगड मला बसतात, त्या शिव्यांची लाखोली मलाच मिळते. माझी पूजा करावयाची असेल तर कांग्रेसची पूजा करा. भरतखण्डांत जगांतील सर्व धर्म व सर्व जाति जणूं आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन एक महान् प्रयोग कांग्रेस करूं पहात आहे. हें दिव्य कर्म आहे. यांत तन, मन, धन ओतून सामील व्हा. कांग्रेसद्वेषी तो गणेशद्वेषी; कांग्रेसद्रोही तो गणेशद्रोही.
जीव :- देवा गणेशा, हें लोकांस कोण पटवणार ?
गणेश :- तुम्हींच. गणेशाची पूजा म्हणजे विद्येची पूजा. मला तुम्हीं ज्ञानदेवता मानतां ना ? गणपतीची पूजा म्हणजे सर्व गणांची पूजा; सर्व मानवांची पूजा. ही पूजा विचार देऊन करा. जो खरा गणेशाचा उपासक असेल तो सर्व गणांत सहकार्य व प्रेम उत्पन्न करण्यासाठीं झटेल. सहानुभूति शिकवील. निरक्षर लोकांस साक्षर करील. विचारहीनांस विचार देईल. अज्ञानी जनतेस ज्ञान देईल. गणेशाची पूजा शहरांत चालली आहे. तेथें ज्ञानसत्रें आहेत. परन्तु बहुजन समाज खेड्यांत पसरलेला आहे. तेथें ना शाळा, ना वाचनालय; ना नवीन विचार ना व्याख्यानमाला. शहरांतून गणेशोत्सवांत जेवढा पैसा दरसाल जातो तेवढा खेड्यांतून शाळा काढण्यांत खर्च केला तर किती तरी काम होईल ? परन्तु ज्ञानाचें महत्त्व तुम्हांला नाहीं. आपले सारे गण, आपले सारे भाऊ विचारवंत, ज्ञानवंत व्हावेत म्हणून आहे का तळमळ ? खरा गणेशाचा उपासक यासाठीं तडफडेल.
जीव :- खरें आहे तुझें म्हणणें. आमच्यांत सहानुभूति नाहीं. सहानुभूति नाहीं म्हणून दुसर्याचें दु:ख कळत नाहीं. दुसर्याची स्थिति सुधारावी असें स्वप्नांतहि मनांत येत नाहीं. अशानें आमचें मंगल कसें होणार ?
गणेश :- मला तुम्ही मंगलमूर्ति म्हणतां. परंतु मातीच्या देवाची पूजा करून मंगल येणार नाहीं. मातीच्या देवाला मखरें घालून मोक्ष मिळणार नाहीं. मातीची मूर्ति म्हणजे सर्व मूर्तीचें प्रतीक आहे. माझी पूजा करून सर्व दु:खी लोकांची सेवा करावयास वांकणार नसाल तर माझें स्वरूप तुम्हांला समजलें असें मी कसें म्हणूं ? मला मखरें घालणारा कामगारांना, हरिजनांना, 'भंग्यांना, गरिबांना घरें आहेत कीं नाहीं तें पाहील. माझ्यासमोर व्याख्यानमाला करणारा आपले बंधू किती सुशिक्षित आहेत याचा विचार करील. माझ्यासमोर आरास करणारा किती घरांत दिवा रात्रीं नसतो याचा विचार करील. माझ्यासमोर ताटें भरभरून खिरापती वाटणारे किती घरांत पोटभर खायला नाहीं, मुलांना खाऊ कधीं मिळत नाहीं, याचा विचार करतील. हा विचार जोंपर्यंत पूजकाला स्फुरत नाहीं, तोंपर्यंत ती मंगलमूर्तीची पूजा नसून मातीची पूजा आहे. गणेशाची पूजा नसून एका तुकड्याची पूजा आहे. विद्यानिधीची पूजा नसून अज्ञानाची पूजा आहे.
जीव :- देवा गणेशा, तूं सांगितलेंस हें दुसर्यांना मी सांगेन. परन्तु हें कोणाला आवडेल ?
गणेश :- आवडो नावडो. स्वत:च्या सद्सद्विवेकबुध्दीप्रमाणें वागावें. माणुसकीप्रमाणें वागावें. त्यासाठीं दगड डोक्यांत बसले व कुर्हाड मानेंत बसली तरी पर्वा करूं नये. सत्कर्म करतां करतां हें देहाचें मडकें फुटणें याहून भाग्य तें कोणतें ? जा व या विराट् गणेशाची खरी ज्ञानमय पूजा करावयास सांग म्हणजे दु:खें दाही दिशांस पळतील; विघ्नें नाहींशीं होतील; समाजांत आनंद व मांगल्य येईल.
२९ ऑगस्ट, १९३८.