श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः ।

श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः । जयजयाजी संकष्टहरणा । चंद्रशेखरा भोगिभूषणा ।

तूच निजभक्तांचे करोनि पाळणा । अंती चरणा दाविसी ॥१॥

आपली कथा मधुररस । बोलवोनि माझे प्रपंचमतीस । हरोनि दावी निजपदास । तुझा दास म्हणोनिया ॥२॥

पाराशर म्हणे गा चतुरानना । गणेशकथा श्रवणे मना । तृप्ती नसे अधिक वासना । वाढताहे श्रवणार्थी ॥३॥

भार्गवराम हा कवणाचा कवण । तेणे अर्चिला गजकर्ण । ती कथा सांगोनि जाण । समाधान करी माझे ॥४॥

विधी त्याचे ऐकोनि वचन । मनी पावला समाधान । म्हणे ऐके चित्त देऊन । गजानन कथेते ॥५॥

कार्तवीर्यनामे भूपती । सहस्त्रबाहू अद्भुत शक्ति । जेणे पराक्रमे वसुमती । पालाणली कौतुके ॥६॥

ज्याचा ऐकता शंखनाद । होतसे सपत्‍न ह्रदयभेद । निजायली भोगिता आनंद । बुद्धिभेद जाहला ॥७॥

घेवोनिया चातुरंग सेना । राजा पातला घोर वना । मृग शार्दूल श्वापदे नाना । वधोनिया चालला ॥८॥

सह्याद्री पर्वताचे शिखरी । राजा पातला सहपरिवारी । चातुरंग सेना ठेऊनि दूरी । ऋष्याश्रम अवलोकी ॥९॥

जैसा कैलास शिखरी महेश्वर । तैसा सह्याद्रि शिखरी ऋषिवर । जमदग्निनामे परमचतुर । तपोधन अनुपम्य जो ॥१०॥

रेणुकानामे त्याची वनिता । महासाध्वी पतिव्रता । चातुर्यखाणी जीते पाहाता । नाककांता लाजती ॥११॥

इतरी पावोनि स्वरूपखंती । तिचे देही पावले विश्रांती । मुखेंद्रु तिचा पाहोनि लाजती । सकल युवती रायांच्या ॥१२॥

तिचे उदरी परशराम । अवतरला पुरुषोत्तम । स्वरूपी दिसे उणाकाम । सकल विद्याधाम जो ॥१३॥

घेऊनि मातृपितृ आदेश । नैमिषारण्यी गेला ऋषीश । मागे ऋषिदर्शनार्थी नरेश । कार्तवीर्य पातला ॥१४॥

राजा येवोनिया जमदाग्न्याश्रमी । दंडवत ऋषीत नमी । वनी होवोनिया श्रमी । विश्रांतीते पावला ॥१५॥

कुंडी जैसा ज्वलदग्नी । तैसा कुशासनी जमदग्नी । पाहोनि कार्तवीर्य मनी । देखोनि त्याते तोषला ॥१६॥

ऋषीने देवोनिया आसन । आदरे केला सुप्रसन्न । राजा जोडोनि कर दोन । स्तविता जाहला ऋषीते ॥१७॥

मग आपले नाम सांगोन । मागो लागला आज्ञावाचन । ऋषि म्हणे करी भोजन । मध्यान्हकाळ समय असे ॥१८॥

राजा म्हणे उदकपान । करोनिया स्वगृही जाईन । परिवार स्वकीय जन त्यागुन । न करी भोजन एकला मी ॥१९॥

ऋषि म्हणे परिवारसेना । घेवोनि यावे तुम्ही भोजना । राजा मानोनिया त्याच्या वचना । नदीतीरी उतरला ॥२०॥

ऋषीने पाचारिली निज युवती । जी शुभानना मूलप्रकृती । तीते म्हणे नृपती । भोजनाप्रति पाचारिला ॥२१॥

सवाहिनी तो नृपवर । भोजनास येईल आता सत्वर । तुवा कामधेनू प्रार्थून लौकर । भोजनावसर संपादी ॥२२॥

रेणुकेने प्रसन्नमने । मस्तकी वंदोनि पतिवचने । येवोनिया हास्यवदने । कामदुधेसी अर्चियेले ॥२३॥

मग म्हणे वो कामधेनुके । राजा भोजनास येतो कौतुके । हे व्हावे तुज ठाउके । म्हणोनि प्रार्थिले तुजलागी ॥२४॥

आता करी लज्जारक्षण । ऐकोनि तिचे करुणावचन । कामधेनू होऊन प्रसन्न । साहित्य पूर्ण तिणे केले ॥२५॥

होता भोजनाची सर्व तयारी । रेणुका ऋषीते प्रार्थना करी । सिद्ध आहे सर्व सामग्री । राजा पाचारी परिवारेसी ॥२६॥

मग पाठऊनिया शिष्यासी । राजास पाचारिले भोजनाशी । राजा पातला परिवारेशी । भोजनासी तेधवा ॥२७॥

येवोनि पाहे ऋष्याश्रम । उणे वाटे स्वकीयधाम । शतखणी गोपुरे उत्तम । गगनी झळकती कळस ज्यांचे ॥२८॥

आदर्श खणोखणी दाटले । सुरंग रंगे रंगविले । पाहाता सर्वांचे मन भूलले । आत बैसले सर्व जन ॥२९॥

मृदुमवाळ बैठका सुभट । वरी टेकणे घनदाट । समारंभे राजभाट । आणोनिया बैसविले ॥३०॥

शतावधी वारांगना । नृत्य गायने रिजविती जना । मग करवोनि मंगलस्नाना । पीतांबर नेसविले ॥३१॥

केशरकस्तुरीचे तिलक । अष्टगंधे उट्या देख । सेनेसहित नरनायक । एक एक अर्चिले हो ॥३२॥

खाली कनकाच्या आडणी । वरी रत्‍नजडित ताटांच्या श्रेणी । दीप लाविले रत्नखाणी । तैशा वाती प्रकाशल्या ॥३३॥

शतानुशत ऋषिसेवक । सत्कारे तोषविती नरनायक । भोजनास बैसविले सकळिक । पाहूनि कौतुक चमत्कारले ॥३४॥

राया समान सर्वापुढे । ताटे वाढिली वाडेकोडे । जो जो पदार्थ ज्यास आवडे । तो तो निवाडे पुरविती ॥३५॥

सहस्त्रावधी बैसल्या पंक्ती । लक्षानुलक्ष वीर जेविती । देव विमानी कौतुक पाहती । अद्भुतशक्ती ऋषीची पै ॥३६॥

सुटला अन्नाचा परिमळ । तेणे दुमदुमिले निराळ । देव घोटिती मुखी लाळ । धन्य कपाळ जेवी त्याचे ॥३७॥

ऋषिगृही अन्न जेविता । सर्वासमान जाहली तृप्तता । मग हस्तमुख प्रक्षाळिता । शर्करा घालिती हातावरी ॥३८॥

येऊनिया सभास्थानी । सर्व बैसले सुखासनी । तांबूल अर्पिल त्रयोदशगुणी । सर्वासमान एकसरे ॥३९॥

पुष्पमाला हारतुरे । सुगंधतैले एकसरे । वस्त्रे अर्पिली मनोहरे । लहानथोरी समसमान ॥४०॥

वस्त्राभरणे शृंगारिले । परस्परे वदू लागले । कुबेरास येणे उणे आणिले । इंद्र रंक यापुढे ॥४१॥

पाहता याची अगण्य संपत्ती । येथे भूपतीचा पाड किती । राजा म्हणे ऋषिप्रती । धन्य त्रिजगते तूच पै ॥४२॥

जे कार्य आम्हास गहन । ते तुवा न लगता क्षण । संपादिलेस परिपूर्ण । पाहता मन माझे तरळले ॥४३॥

पूर्वी आलो होतो जेव्हा । पर्णकुटीत होता तेव्हा । आता पाहता उणा मघवा । ऐश्वर्येशी तुजपुढे ॥४४॥

धन्यधन्य तू तपोधन । न कळे तुझे मला विंदान । ब्रह्मवेत्ता तू भगवान । संशय यात असेना ॥४५॥

कोण्या साधने गहनकर्मा । करिता जाहलासि विप्रोत्तमा । येरू म्हणे सकलकामा । कामधेनू पुरवीतसे ॥४६॥

ती आहे माझे घरी । सर्व कार्य ती करणारी । तिचे प्रसादे आजवरी । प्रतिकूळ काही असेना ॥४७॥

ऐसे ऐकता मनुजनाथ । मनी आणोनि विपरीतार्थ । ऋषीस म्हणे तू समर्थ । पुरवी अर्थ आता माझा ॥४८॥

मज द्यावी येव्हडी गाय । मग तुज नसे अपाय । सदा वंदीन तुझे पाय । येव्हडी सोय समजे मनी ॥४९॥

अमोल वस्तू राजगृही । त्यात असावी धेनूही ही । तुज लक्षसंख्या गायी । इचे पालटी देईन मी ॥५०॥

ऐकोन त्याचे ऐसे वचन । ऋषि बोले सुहास्य वदन । राया तुज ही बुद्धी कोठून । कोण्या कर्मे जाहली ॥५१॥

माझे घरी जेवलाशी । आणि सर्वस्वी हरू पाहशी । मोठा कृतघ्न पुरुष होशी । हे मजसी कळले आता ॥५२॥

घेऊनिया सकल यश । आता जावे निज नगरास । विपरीतार्थ होईल नाश । हेच नरेशा सत्य मानी ॥५३॥

ऐसी ऐकता ऋषीची बोली । किमर्थ धमगाऊनि बोलशी । काय शक्ती ब्राह्मणाशी । रायापाशी द्वंद्वपणे ॥५५॥

गर्जोनिया कार्तवीर्य । सेवकांसि म्हणे सोडा गाय । गरिब ब्राह्मण करील काय । नाही भय राजयासी ॥५६॥

ऐकोनि रायाचे आज्ञावचन । वेगे धावती सेवकजन । गोकंठपाश मुक्त करून । हाकलून चालविली ॥५७॥

धेनू न निघे गोठ्याबाहेरी । सेवक हाणिती काष्ठभारी । तेणे क्रोधावली भारी । हुंकारे करी अपूर्व पै ॥५८॥

हुंकारापासूनि तयेचे । बर्बरवीर जाहले साचे । त्याणी सेवक रायाचे । दंडभारे झोडियेले ॥५९॥

राजदूतास सुटला पळ । हे पाहूनि वीर प्रबळ । धावोनिया तात्काळ । त्याणी प्रळय मांडिला ॥६०॥

लक्षानुलक्ष धेनुजवीर । त्याणी राजसेना अपार । मृत्युपंथे शमनपुर । क्षणमात्रे पावविली ॥६१॥

ऐसे अवलोकिता राजसेवक । रथारूढ एक एक । धावोनिया वीरनायक । युद्ध करिती तयांसी ॥६२॥

वर्षती शस्त्रांचे घनदाट । परी न माघारिती धेनुज भट । जैसा विद्युल्लतेचा कडकडाट । वीर अचाट गर्जती तैसे ॥६३॥

तेथे मांडली रणधुमाळी । नारद नाचे अंतराळी । भली माजली आता कळी । होईल होळी क्षत्रियांची ॥६४॥

धेनुजवीरांचे बळ तुंबळ । तेणे सुटला राजचमूस पळ । रणी जाहला हलकल्लोळ । दुरोनि भूपाळ पाहतसे ॥६५॥

राजसेना भय पावोनि जाण । दशदिशा पळती घेवोनि प्राण । वीर सोडोनिया रण । एक एक पळाले ॥६६॥

ऐसे पाहता अवनीपती । आश्चर्य मानोनिया चित्ती । शंख लावोनि अधराप्रती । सबळ बळे फूंकीतसे ॥६७॥

ऐकताच त्याचा शंखनाद । जाहला अमरांचा ह्रदयभेद । तेणे चढला रणमद । वीर प्रमोद पावले ॥६८॥

अवनी कापे थरथरा । समोर सुटला अद्भुतवारा । धुरोळा झाकोनि अंबरा । तेणे दिनकरा लोपविले ॥६९॥

पुन्हा माजली रणधुमाळी । परस्परे हाणिती तयेवेळी । रणी पाडिल्या वीरावळी । राजयाच्या धेनुजांनी ॥७०॥

रणी लोटता धेनुजवीर । राजभटा न धरवे धीर । धेनुदळे करिता मार । चरणकररहित पडले किती ॥७१॥

कितीकांची जाहली खटारे । कितीक जाहले प्राणे पुरे । कितीक होवोनि घाबरे । रणी पाणी मागती ॥७२॥

राज चमूंत जाहली दयना । असंख्यात पडली रणी सेना । हे पाहून कृतवीर्यनंदना । कोप मनात न साहे ॥७३॥

पंचसत धनुष्यी गुण । लावोनि सोडी एकदाच बाण । परी न गणिती सपत्नगण । करित कंदना उठावले ॥७४॥

रायासमोर त्याचे वीर । मरण पावले समग्र । धेनुवीरांचे बळ थोर । अनिवार नाटोपते ॥७५॥

मनी म्हणे कार्तवीर्य । काय जाहले माझे वीर्य । शत्रूचे विस्तारले रणी शौर्य । दिसते कार्य अवघड पुढे ॥७६॥

काळ जाहला पाठमोरा । जय पावला परवीरा । धेनू गुप्त होवोनि अंबरा । जाती जाहली क्षणमात्रे ॥७७॥

निमाले सकळ वीरनायक । भग्न जाहले अवघे कटक । यश बुडाले सकळिक । ह्रदयी दुःख संचरले ॥७८॥

मग भूप त्रास पावला । हा विप्र कपटी मारीन याला । म्हणोनि चापी शर लाविला । प्राण घ्यावया ऋषीचा ॥७९॥

जमदग्नीचे कोमल ह्रदयी । शर भेदला लवलाही । प्राण सोडिला ते समयी । जमदग्नीने क्षणमात्रे ॥८०॥

पाहोनि पतीचे निधन । रेणुका करी दीर्घ रुदन । भूमीसि मस्तक आपटून । बोले वदन राजयासी ॥८१॥

म्हणे पापिष्ठा कैसे केले । विना अपराध यासि मारिले । तुझे यश जगी बुडाले । कारे वधिले याशी तुवा ॥८२॥

राजा म्हणे रेणुकेशी । व्यर्थ कांगे बडबड करिशी । आता घेयीन तुझे प्राणाशी । म्हणोनि धनुष्यासि बाण लावी ॥८३॥

एकवीस बाणाची आकर्ण वोढी । रेणुकेवरी तत्काळ सोडी । शरे भेदली ती बापुडी । विकळ पडली तेधवा ॥८४॥

राजा पावोनिया खेद मनी । मोडके कटक सवे घेउनी । जाता जाहला निजभुवनी । अधोवदनी तेधवा ॥८५॥

येरूकडे रेणुका सती । शरघाते व्याकूळ चित्ती । आठवोनिया पुत्राप्रती । दीनस्वरे बाहतसे ॥८६॥

अरे भार्गवा बाळा राजसा । हा प्रसंग न जाणसी कैसा । लवकर येयीरे डोळसा । मरण दिवसा साधी माझे ॥८७॥

राम होता नैमिषवनी । तेथे शब्द ऐकिले तेणे कानी । लगबग पातला तयास्थानी । माता नयनी देखिली ॥८८॥

पाहोनिया पितृनिधन । राम करी दीर्घरुदन । शरघाते माता म्लान । पाहोन तीते पूसतसे ॥८९॥

मांडीवर घेवूनि तिचे शीर । वर्तमान ऐके सादर । रेणुका म्हणे तू सुकुमर । करी संहार क्षत्रियांचा ॥९०॥

दुष्टे मारिले एकविंशति शर । निःशेष क्षत्रियसंहार । करी तू एकवीस वार । तरीच कुमर धन्य माझा ॥९१॥

कासावीस जाहले माझे प्राण । मी पावते आता मरण । दत्तात्रेयासि आणोन । करी संपादन उत्तरकार्य ॥९२॥

रामासि ऐसे सांगुन । रेणुकेने सोडिला प्राण । राम करी दीर्घरुदन । आठवोनि गुण तियेचे ॥९३॥

करिता स्मरण आत्रिजांचे । आगमन जाहले तेथे त्याचे । क्रियाकर्म सुखे तयाचे । संपादिले तयाने ॥९४॥

न होता पूर्ण दिवस । व्याघ्रभय होवोन तयास । राम हाका मारी रेणुकेस । षष्ठमदिवशी मध्येच ॥९५॥

ऐकता रामाचे वचन । रेणुका जाहली उत्पन्न । करचरणादि अवयवहीन । स्नेहे स्नुतपयोधरा ॥९६॥

पूर्ण होते त्रयोदश दिन । तरी पूर्णावयव होती जाण । षष्ठम दिनी दत्तात्रेय येऊन । पाहे अंगहीन तयेचे ॥९७॥

दत्त म्हणे रामाशी । कारे मध्येच पाचारिले इशी । राम म्हणे तयासी । भयविव्हल जाहलो मी ॥९८॥

स्नेहयोगे बालभावे । पाचारिले मी स्वभावे । जे होणारे तेचि दैवे । जाहले गा ऋषिवर्या ॥९९॥

त्रयोदश दिवसपर्यंत । राम उत्तरकार्य करित । मंत्रविधान दत्त सांगत । तैसेच करित रेणुकात्मज ॥१००॥

मातेची आज्ञा घेऊन । राम प्रवेशला कैलासभुवन । तेथे शंकराते नमून । करी स्तवन राम तेव्हा ॥१०१॥

जयजयाजी भोगिभूषणा । चंद्रशेखरा गौरीरमणा । आनंदरूप निर्गुणा । विश्वभूषणा सुखाब्धे ॥२॥

नमो तूते महेश्वरा । अजअजितापिनाकधरा । पुराणपुरुषा शंकरा । करुणाकरा विश्वेशा ॥३॥

गजचर्मवसना नीललोहिता । अनंगारे देहत्रयातीता । भक्तपालका रे अनंता । जगन्नाथा परात्परा ॥४॥

ऐकोन त्याचे ऐसे स्तवन । संतोष पावला हैमवतीरंजन । षडक्षरमंत्र उपदेशून । सांगे विधान याशी ॥५॥

शिव म्हणे रेणुकानंदन । कृपा करील गजानन । त्याचे प्रसादे करून । निःक्षत्रिय मही करशील ॥६॥

घेऊन शंभूचे आज्ञावचन । राम कृष्णातटाकी येऊन । करिता जाहला अनुष्ठान । एकाग्र मन करोनिया ॥७॥

पाहोनि त्याची उग्र गरिमा । कृपा उपजली मंगलधामा । प्रगटोनिया भार्गवरामा । वर देता जाहला ॥८॥

परश देवोनि गणेश म्हणे । आता तुजला नाही उणे । सप्तत्रिवार करणे । निःक्षत्रिय मही आतांची ॥९॥

ऐसा देऊनिया वर । गुप्त जाहला लंबोदर । रामे प्रासाद करोनि सुंदर । लंबोदर स्थापियेला ॥११०॥

परश पावला म्हणोन । परशराम जाहले नामाभिधान । मग तेणे सहस्त्रार्जुन । क्षणमात्रे वधियेला ॥११॥

एकवीस वेळा निःक्षत्रिय अवनी । परशरामे तेव्हा करूनी । ब्राह्मणासी दान दिल्ही मेदिनी । गणेशवरे करोनिया ॥१२॥

राम तो साक्षान्नारायण । त्याचा पराक्रम वर्णिल कोण । संक्षेपे सांगीतले तुजलागून । सोमकांतराया तूते ॥१३॥

विधी म्हणे व्यासाप्रती । उपासनाखंड श्रवण करिती । त्यावरी तुष्टोनि गणपती । भुक्तिमुक्ती देतसे ॥१४॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराणसंमत । उपासनाखंड रसभरित । विंशतितमोध्याय गोड हा ॥१५॥

अध्याय ॥२०॥ ओव्या ॥११५ ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel