ऐका परमेश्वरा महाविष्णु, तुमची कहाणी.

काशीपूर नगर, सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी, बावन आड. तिथं एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे. काय करतो? सकाळी उठतो, स्नानसंध्या करतो, विभूतीचं लेपन करतो, तिबोटी लंगोटी घालतो. खांदी कुर्‍हाड घेतो, वनात जातो. वनाचीं फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पांच भाग करतो. देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीला देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो, गाईचा गाईला देतो, उरलंसुरलं आपण खातो. असं करतां करतां नखं रुपलीं, बोटं खुपलीं, अंगीं रोम वाढले, मस्तकीं जटा वाढल्यां. अठ्याऍंशीं सहस्त्र वर्षं तपास भरलीं. एवढं तप कुणा कारणें करतो? महाविष्णु भेटावा याकारणें करतो.

कपोत-कपोती एका वृक्षावर बसलीं होती, तीं त्याला विचारूं लागलीं “भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणीं तर चालतोस, मुखीं तर वदतोस. एवढं तप कोणाकारणें करतोस?” “महाविष्णु भेटावा याकारणें करतों.” शेषशयनीं, सुवर्णमंचकीं, महाविष्णु निजले होते. तिथं येऊन कपोत-कपोती सांगूं लागलीं-

“काशीपूर नगर, सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी, बावन आड. तिथं एक सप्तक्या ब्राह्मन तप करीत आहे. काय करतो? सकाळी उठतो, स्नानसंध्या करतो, विभूतीचं लेपन करतो. तिबोटी लंगोटी घालतो. खांदीं कुर्‍हाड घेतो. वनास जातो. वनचीं फळें आणतो, त्याचा उत्तम पाक करतो. त्याचे पांच भाग करतो. देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीला देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो, गाईचा गाईला देतो, उरलंसुरलं आपण खातो, असं करतां करतां नखं रुपलीं, बोटं खुपलीं, अंगीं रोम वाढले, मस्तकीं जटा वाढल्या, अठ्याऍंशीं सहस्त्र वर्षे तपास भरलीं. एवढं तप कोणाकारणें करतो? महाविष्णु भेटावा याकारणें करतों.”

महाविष्णु बरं म्हणाले. झटकन उठले. पायीं खडावा घातल्या. मस्तकीं पीतांबर गुंडाळला. ब्राह्मणाजवळ उभे राहिले. “भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणीं तर चालतोस, मुखीं तर वदतोस, एवढं तप कोणाकारणें करतोस?” ‘ महाविष्णु भेटावा याकारणें करतों.” तेव्हां महाविष्णु “तो मीच”असं म्हणाले. “कशानं भेटावा? कशानं ओळखावा?” “असाच भेटेन, असाच ओळखेन.” शंख-चक्र-गदा-पद्म-पीतांबरधारी अयोध्याचारी माघारीं वळला, तों महाविष्णूची मूर्त झाली.

“भल्या रे भक्ता, शरणागता, राज्य माग, भांडार माग, संसारीचं सुख माग.” “राज्य नको, भांडार नको, संसारीचं सुख नको, तुझं माझं एक आसन, तुझी माझी एक शेज, तुझी माझी एक स्तुति.” कुठं करावी?” देवाद्वारीं, भल्या ब्राह्मणांच्या आश्रमीं.” असं त्याला एकरूप केलं.

महाविष्णूची कहाणी ऐकती, त्यांची किल्मिष पातकं हरती. नित्य कहाणी करती, त्यांना होय विष्णुलोक प्राप्ती. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: जो सद्धर्मानें वागतो व सत्कर्म करण्यांत आपलें आयुष्य घालवितो त्याला अखेर देव भेटल्याशिवाय राहात नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel