ऐका दीपकांनो, तुमची कहाणीं.

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला, आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला कीं, आपल्यावर उगाच आळ आला आहे. तेव्हां आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनीं विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशीं तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरांतून तिला घालवून दिलं.

तिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घांसावे. तेलवात करावी, स्वतः लावावे. खडीसारखेनं त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अंवसेच्या दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं ती घरांतून निघाल्यावर बंद पडलं.

पुढं दिव्यांच्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तिथें त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवांतले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरीं जेवायला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली.

त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. “बाबांनो, काय सांगू? यंदा माझ्या सारखा हतभागी कोणी नाहीं. दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत.’ इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, “असं होण्याचं कारण काय?” मग तो सांगू लागला. ” बाबांनो, काय सांगू? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनीं विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला.

रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशीं तिची फजिती झाली. सासूदिरांनीं निंदा केली. घरांतून तिला घालवून दिलं. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो.” असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.

हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं, अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय, म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून आणलं. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखात्यारी दिली. सुखानं रामराज्य करूं लागली. तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळाला, तसा तुमचा आमचा टळो.

ही साठां उतरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel