आटपाट नगर होत. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. त्याला सात मुलगे होते. एक मुलगी होती. त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नांव धनवंती नी मुलीचं नांव गुणवंती होतं. त्यांच्या घरीं अशी चाल होती कीं, आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी नि नमस्कार करावा.

पुढं एके दिवशीं काय झालं. एक मोठा सूर्यासारखा ब्राह्मण आला. सगळ्यांनीं त्याची पूजा केली. साती सुनांनीं त्याला भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं त्यांना आशिर्वाद दिला, “संतत वाढो, संपत वाढो, तुमचं सौभाग्य अक्षयी असो.” धनवंतीबाईनं आपल्या मुलीला सांगितलं, “मुली मुली, भिक्षा घाल.” मुलगी उठली, भिक्षा घातली नी नमस्कार केला. बाह्मणानं तिला आशीर्वाद दिला, “धर्मिणी हो.”

मुलीनं आपल्या आईला सांगितलं, “आई ,आई, भटजींनीं जसा वहिनीला आशिर्वाद दिला, तसा मला नाहिं दिला,” आई म्हणाली, “चल पाहूं, पुन्हां त्याला भिक्षा घाल.” मुलीनं पुन्हां भिक्षा घातली. नमस्कार केला. ब्राह्मण म्हणाला, “धर्मिणी हो.” तेव्हां धनवंतीनं त्याला विचारलं, हिला असा आशीर्वाद कां देतां?” ब्राह्मण म्हणाला, “हिला लग्नांतच वैधव्य येणार आहे.” धनवंतीनं ब्राह्मणाचे पाय धरले, नि म्हणाली, “जो अपाय सांगेल तोंच उपाय सांगेल. माझी एकुलती एक मुलगी रंडकी झाली तर मी काय करूं? याचा मला कांहीं उपाय सांगा.” असं म्हणून रडूं लागली.

ब्राह्मणाला तिची दया आली. “बाई,बाई, रडूं नका, मी तुम्हांला एक उपाय सांगतो. सातांसमुद्रांपलीकडे एक बेट आहे, तिथ एक सोमा नांवाची परटीण आहे, तिला मुलीच्या लग्नाला आणा, म्हणजे तुमचं संकट दूर होईल. लगीन झाल्यावर तिला वाटेला लावा.” असं म्हणून ब्राह्मण आपल्या दुसर्‍या घरीं भिक्षेला गेला.

इकडे काय झालं? धनवंतीनं आपल्या नवर्‍याला सांगितलं, अशी गोष्टा आहे. कोणी तरी जाऊन सोमेला आपल्या घरीं आणलं पाहिजे. तेव्हा त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलावलं. त्यांना सांगूं लागला. “ज्याची आमच्यावर भक्ति असेल, त्यांनीं आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं नि सोमेला आणायला जावं.” तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले, “तुझी सगळी माया मुलीवरती, आमच्यावर कांहीं माया नाहीं. सातसमुद्रांपलीकडे आम्ही सगळे जात नाहीं,” हें ऐकून आईला रडूं आलं. बापाला वाईट वाटलं.

तो आपल्या बायकोला म्हणाला, “तूं कांहीं भिऊं नको. आपल्याल सात मुलगे असून नसून सारखेच, तूं आपली निपुत्रिकच आहेस असं समजं. तूं कांहीं काळजी करूं नकोस. मीच जातो नि सोमेला घेऊन येतों.” तेव्हा त्यांतला धाकटा मुलगा होता तो आपल्या बापाला म्हणाला, “बाबा बाबा, आम्ही सातजण असून तुम्ही आपल्याला निपुत्रिक असं कां म्हणूवून घेतां? मी ताईला बरोबर घेऊन जातों नि सोमेला घेऊन येतो.” आई बापांना नमस्कार केला आणि ती आपलीं बहीणभावंडं निघाली.

जातां जातां समुद्र आला. वार्‍याचा सोसाटा चालूं लागला, समुद्राच्या लाटा येऊ लागल्या, पलीकडे कसं जावं हे सुचेना. जवळ कांहीं खायला नाहीं, प्यायला नाहीं. सारं त्रिभुवन दिसूं लागलं. परमेश्वराचं स्मरणं केलं. “देवा, देवा, आतां तूंच ह्या संकटांतून पार पाड.” असा देवाचा धांवा केला.

तिथं एक वडाचं झाड होतं. त्याच्याखालीं तीं जाऊन बसलीं. सगळा दिवस उपास पडला. त्या झाडावर गृध्रपक्ष्यांचे घरटं होते, त्यांत त्या पक्ष्याचा पिलं होतीं. संध्याकाळ झाली गृध्रपक्षी घरीं आले. पिलांना चारा देऊं लागले, पिलं कांहीं चारा घेत नाही. त्यांनीं आपल्या आईबापांना सांगितलं,“आपल्या घरीं दोन पाहुणे आले आहेत झाडाखाली. उपाशी आहेत त्यांना टाकून मी जेवणार नाहीं.”

गृध्रपक्षी खालीं आले. ब्राह्मणाला पुसूं लागले. “तूं असा चिंतेंत कां पडला आहेस? तुझं काय काम असेल तें आम्हांला सांग. आम्ही तें काम पार पादूं. तुझी चिंता दूर करूं, उपाशी कांहीं निजूं नको. आम्ही तुला फळं देतॊं, तीं थोडीशीं तूं खा. थोडींशीं ह्या मुलीला दे.” ब्राह्मणाला आनंद झाला. देवाचे त्यानं आभार मानले.

गृध्रपक्ष्यांना आपला हेतु सांगितला. पक्षी म्हणाला, “उद्यां उजाडल्यावर तुम्हांला घेऊन जातों. सोमा परटिणीच्या दारी नेऊन सोडतो.” मग बहीणभावांनीं फळं खाल्ली. रात्री आनंदानं झाडाखालीं निजलीं. उजाडल्यावर पक्षी झाडाखालीं आले. बहिणभावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घराशी नेऊन सोडले. पक्षी आपले चरायला गेले. पुढं बहिणभावंडांनीं काय केलं? रोज पहांटेस उठावं, सोमा परटिणीचं अंगण झाडावं, शेण घेऊन सारवून ठेवावं. असं करतां करतां वर्ष निघून गेलं.

एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना, सुनांना विचारलं, “रोज सकाळी कोणं उठतं? माझं अंगण कोण झाडतं? त्याच्यावर सारवण कोण घालतं?” ही म्हणे मी नाहीं, ती म्हणे मी नाहीं. तेव्हां सोमेला आश्चर्य वाटलं. कांहीं केल्या पत्ता लागेना. मग दुसरे दिवशीं सोमा जागत बसली. तीन प्रहर रात्र उलटून गेली. चौथ्या प्रहरीं काय झालं? ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे. तिचा भाऊं तें सारवतों आहे.असं पाहिलं. सोमा परटीण पुढं आली.

तिनं विचारलं, “मुलांनो, तुम्ही कोण आहा?” त्यांनीं सांगितलं. “आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोंत.” सोमा म्हणाली, “तुम्ही ब्राह्मण, मी परटीण. आमची नीच जात. तुम्ही आमचं अंगण कां झाडतां? कां सारवतां? आम्हांला पाप लागेल. ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाहीं. तेव्हां तुम्ही आमची सेवा कां करतां?” तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं, “ही माझी बहीण आहे. हिचं लगीन करायचं आहे. तूं लग्नाला यावंस अशी आमची इच्छा आहे. आईबापांची आज्ञा घेतली तुला बोलावूं आलों. तर तुला लग्नाला आलंच पाहिजे. तूं न आलीस तर हिला लग्नांतच वैधव्य येईल. असं एका ब्राह्मणानं सांगितलं आहे.

तूं प्रसन्न होऊन यावंस म्हणून आम्ही तुझीं सेवा करतों.” मग सोमा म्हणाली, “तुम्ही सेवा करूं नका,मी तुमच्याबरोबर जातें. ह्या मुलीचं लगीन झाले म्हणजे मग परत येईन. तोंपर्यंत आपल्या घरांत किंवा सोयर्‍याधायर्‍यात कोणी मेलंबिल तर त्याला दहन करूं नका.” असं सांगून निघाली. ती समुद्राच्या कडेला आली. ब्राह्मणाच्या मुलाला नि मुलीला समुद्राच्या पार केलं. आपण आकाशांत उड्डाण करून त्याच्या जवळ आली. सोमेला घेऊन ती आपल्या घरीं आलीं. सर्वांना आनंद झाला.

धनवंतीनं परटिणीची पूजा केली. धाकटा भाऊ उज्जनीस गेला. बहिणीजोगा नवरा पाहून आणला. सुमुहूर्तावर लग्न लावलं. वधूवरांवर अक्षता टाकल्या. तों एकाएकीं काय झालं? नवर्‍यामुलाला मूर्च्छा आली, धाडकन भुईवर पडला. हलत नाही. बोलत नाही, सगळे लोक घाबरले. सोमेनं जवळ येऊन पाहिलं. “मुली मुली, घाबरूं नको,” म्हणून धीर दिला. “मी तुला सोमवतीचं पुण्य देतें. त्यानं तुझा पती जिवंत होईल.” असं सांगितलं.

मग सोमा उठली. हातीं उदक घेतलं, संकल्प केला, आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. तसा तिचा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला. पुढं लग्न झाल्यावर सोमा घरीं जायला निघाली. इकडे सोमेच्या घरीं काय झालं? पहिल्यानं तिचा मुलगा मेला, मागून नवरा मेला, त्याच्या मागून जांवई मेला. इकडे सोमा आपली घराची वाटा चालतेच आहे. वाटेंत तिला सोमवती अंवस पडली.

त्या दिवशी काय झालं? एक म्हातारी बाई वाटेंत भेटली. तिच्या डोईवर कापसाचा भारा होता. ती सोमेला म्हणाली, “बाई, बाई, माझ्या डोक्यावर भार झाला आहे. एवढा भारा खालीं उतर. आपण दोघी बरोबर जाऊं” सोमेनं तिला उत्तर केलं, “आज सोमवारी अंवस आहे. मला नेम आहे. धर्म आहे. मला कापसाला शिवायचं नाहीं.” पुढं जातां जातां काय झालं?

एका नदीच्या कांठीं आली. तिथं पिंपळाचं झाड दिसलं. नदींत स्नान केलं, श्रीविष्णूची पूजा केली. तिच्याजवळ कांहीं नव्हतं, प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं काय झालं? तिच्या घरीं तिचा मुलगा, नवरा, जावई, सारे जिवंत झाले. सोमा आपल्या घरीं आली. सुनांनी तिला विचारलं, “सासूबाई, सासूबाई, तुम्ही गेल्यावर घरांतली माणसं मेलीं होतीं. आम्ही तशींच ठेवली होतीं आणि तुमची वाट पहात बसलों होतों. तुम्ही यायच्या अगोदर जिवंत झालीं. असा चमत्कार कशानं झाला?”

सोमा म्हणाली, “मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं, तिचा नवरा जिवंत केला. माझ्याजवळचं पुण्यं संपलं, म्हणून इकडे असं अशुभ झालं. वाटेंत मला सोमवती अंवस पडली. मीं पुन्हा हें व्रत केलं. कापसाला शिवलें नाहीं. मुळ्याला शिवलें नाहीं. श्रीविष्णूची पूजा केली. पिंपळाला शंभर नि आठ प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं घरातलीं माणसं जिवंत झाली. तुम्हीही ह्या व्रताचं आचरण करा, म्हणजे तुम्हांला वैधव्य प्राप्त होणार नाहीं. संतत संपत अक्षयी राहील.”

तेव्हां सुनांनीं विचारलं, ‘हें व्रत कसं करावं?” तशी ती म्हणाली, “सोमवारीं अंवस आली म्हणजे सकाळीं उठावं, स्नानं करावं. मुक्यानं वस्त्र नेसावं. पिंपळाच्या पारावर जावं. श्रीविष्णूची पूजा करावी. श्रीमंतांनीं हिरे-माणकं घ्यावीं; मोतीं-पोवळी घ्यावी, सोन्यारुप्याचीं भांडीं घ्यावीं. गरीबांनीं आपलीं तांब्याकांशाची घ्यावीं. चांगली चांगली फळं पुष्पं घ्यावीं, जशीं अनुकूल असतील तशीं घ्यावी; पण तीं सगळीं शंभर नि आठ मोजून घ्यावीं. तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जें आपण घेतलं असेल तें पिंपळाला अर्पण करावं. मग तें सारं ब्राह्मणाला द्यावं. सवाष्णी ब्राह्मणाला जेवूं घालावं आणि आपण मुक्यानं जेवावं. असं व्रत जी करील तिला वैधव्य प्राप्त होणारा नाहीं. इच्छिंत फळ प्राप्त होईल. संतत संपत वाढेल.”

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel