`बार्सिलोना मधील तिसरा दिवस हा ` हॉट एअर बलून राईड या ऍडव्हेन्चरस राईड साठी होता. बार्सिलोना पासून एक तासाच्या अंतरावर ही सोय होती. पण यासाठी सकाळी ८-८.30 लाच पोहोचावे लागते. ऊन वाढले आणि वाऱ्याची दिशा बदलली तर हा खेळ घातक ठरू शकतो. आम्ही सकाळीच आवरून, ब्रेकफास्ट करून ७ वाजता निघालो. या दिवसात स्पेन मधील सूर्य आठ नंतर उगवतो. त्यामुळे आम्ही निघताने बाहेर अंधारच होता. एक ते सव्वा तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका मोकळ्या ग्राउंडवर पोहोचलो. तिथे ओळीने छोट्या गोडाऊन शेड्स होत्या. त्यात छोटी विमाने आणि हेलिकॉप्टर्स आहेत हे नंतर कळले. तो एरिया खाजगी हेलिपॅड म्ह्णून वापरला जातो. थंडी प्रचंड होती. ग्लोबलच्या अल्ताफभाईंनी अगोदरच कल्पना दिलेली असल्याने आतून थर्मल बॉडी वॉर्मर, वरून शर्ट, त्यावर जर्किन्स, डोक्याला कानटोपी, हँडग्लोव्हज असा सगळा जामानिमा करून सर्वजण तयार होते. तरीही थंडी जात नव्हती. आमच्या मागोमागच ते बलून राईड एक्सपर्ट्स आले. त्यांनी व्हॅन मधून बलून आणि खालच्या बास्केट्स आणल्या होत्या. आल्याबरोबर त्यांनी आमच्यासाठी चहा कॉफी आणि स्नॅक्सची सोय केली. पण त्या थंडीत तो चहा कपात ओतून ओठापर्यंत जाईपर्यंत थंड होत होता. मग अनेकांनी आपापले बरोबर आणलेले खाद्य पदार्थ सॅकमधून काढत त्यावर ताव मारला. नंतर फेर धरत आम्ही मस्त डान्स केला, त्यामुळे शरीराला जरा उब आली. इकडे मोठं मोठे बर्नर्स लावून त्या बलून मधील हवा गरम करून बलून फुगवणे चालू होते. धुकेही भरपूर होते, त्यामुळे ते लोक आणि आम्हीही काळजीत होतो. आम्हाला काळजी खाली काही दिसणार का? आणि त्यांना काळजी कि या धुक्यात बलून उडणार का? थोड्यावेळानंतर धुके बरेच निवळले. बलूनही हवा भरून तयार झाले होते. एकूण तीन बलून होते. एकात दहा जण, दुसऱ्यात सहा जण, आणि एकात आम्ही फक्त चार जण होतो. न कळणाऱ्या स्पॅनिश भाषेतील अनेक सूचनांपेक्षाही त्यांनी केलेल्या हातवाऱ्यांवरून काय काळजी घ्यायची याची अर्धवट माहिती मिळत होती. अनेकांच्या हृदयाची धडकन वाढलेली होती. एकदाचे एक एक करत ते बलून आकाशाकडे निघाले. हळू हळू ते वर जात होते आणि आम्हाला खालच्या परिसराचे दर्शन होत होते. खरेतर हा प्रकार तसा जरा भगवान भरोसे किंवा निसर्ग भरोसे म्हणायला हवा. या बलूनला काही इंजिन नसते, त्यामुळे तो हवा तसा वळवता येत नाही. सेफ्टीची काहीही साधने उपलब्ध नसतात. त्यामुळे आपण पूर्ण निसर्गाच्या मेहेरबानीवर आणि बलून कंट्रोल करणाऱ्या माणसाच्या स्किल वर अवलंबून असतो. दुसरे महत्वाचे म्हणजे हा बलून एका ठिकाणाहून निघाला कि पुन्हा त्या ठिकाणी आणता येत नाही. तो वाऱ्याच्या दिशेने जात असतो. त्यामुळे याचे उतरण्याचे ठिकाण नक्की नसते. ठराविक वेळानंतर तो बलून चालक एखादी त्यातल्यात्यात सेफ जागा बघून हा बलून उतरवतो. हे काही आम्हाला माहित नव्हते, आणि त्याची भाषाही कळत नव्हती. त्यामुळे १.३० तासांनी जेंव्हा बलून खाली जाऊ लागला तेंव्हा नक्की काय होतंय हे आम्हाला कळत नव्हते. आमचा बलून अगदी झाडांच्या शेंड्यांना धडकत शेतातील मोकळ्या भागाच्या अगदी जवळ आला. आणि त्या चालकाने केलेल्या खाणाखुणांवरून आम्ही दोघे खाली उतरलो आणि त्याने फेकलेली दोरी ओढत तो बलून योग्य ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत होतो. आमचा बलून जमिनीवर टेकल्यानंतर काही वेळाने दुसरा मोठा बलूनही तिथेच आला आणि त्यालाही ओढत आम्ही योग्य जागी नेण्यास मदत केली. पण त्याचा चालक इतका एक्सपर्ट होता कि त्याने इकडे तिकडे करत आणि आमच्या मदतीने ती बास्केट बरोबर त्या व्हॅनच्या ट्रॉलीत उतरवली. तिसरा बलून दूर कुठेतरी उतरला असावा. जमिनीला पाय लागल्यानंतर ते थरार नाट्य संपले. नंतर त्यांच्या गाड्यांमधून आम्हाला त्यांनी पहिल्या ठिकाणी पोहोचवले...... हा बलून उड्डाणाचा अनुभव अतिशय थरारक, आणि तेवढाच रोमांचक, अविस्मरणीय होता. डिस्कव्हरी चॅनेल वर व्हिडीओ बघणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे यात खूप अंतर आहे. तेंव्हा ज्यांना कोणाला भविष्यकाळात असा मोका मिळेल त्यांनी बिल्कुलही न घाबरता हा अनुभव घ्यावाच. आम्ही जागेवर पोहोचल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी `शॅम्पेन्ची' व्यवस्था केली होती. हे शँम्पेन नावाचे पेय खरेच फक्त उडवण्याच्याच लायकीचे असते, कारण त्याला तशी फार काही चांगली चव नसते. नाव मोठे अन लक्षण खोटे. कोणाकोणाला आवडत असेलही. पण तशी आमच्याकडे आमची आमची सोय होतीच. थन्डी घालवण्यासाठी हा पर्याय उत्तम असतो. असो,. ............................
हा अनुभव गाठीशी बांधत आम्ही `क्रेयेलोरे द मॉंटेसरांत' कडे प्रयाण केले. साताऱ्याजवळच्या सज्जनगडासारखा किंबहुना त्याहून थोड्या जास्त उंचीचा हा डोंगर. जाण्यासाठी रेल्वे आहे. एवढ्या खड्या उंचीवर चढणारी रेल्वेही तशी थरारक. या रेल्वेने आम्ही त्या डोंगरावर पोहोचलो. अतिशय सुंदर चर्च आणि इतर इमारती इथे आहेत. आम्हाला बलून राईडलाच खूप उशीर झाल्याने इथे आम्हाला खूप कमी वेळ मिळाला आणि त्यात आमचे लंच सुद्धा तिथेच असल्याने सर्व वेळ त्यातच गेला. लोकल स्पॅनिश लंच मात्र हॉरिबल होते. म्हणजे थाट खूप चांगला होता, सुंदर हॉटेल, चांगली वाईन, थ्री कोर्स मेन्यू. पण ते त्या पदार्थांचे दिसणे आणि चव मात्र कुणाला भावली नाही. अतिशय महागडा साल्मन मासाही त्यात होता, पण त्याची चव विचित्रच होती. आमच्या सुहास आणि सचिन यांनी मात्र ते पदार्थ आवडीने खाल्ले. असो.
परतीची ट्रेन लगेचच असल्याने अगदी धावत पळत जमेल ते डोळ्यात साठवून घेत आम्ही स्टेशन गाठले आणि ट्रेन उताराला लागली. तिथून आम्ही परत बार्सिलोनाला आलो. बसने आम्हाला `कॅटालोनिया स्क्वेयर' या चौकात सोडले. चौक कसला हो, आपलं एक उपनगर त्यात बसेल. मुख्य चौकात फक्त वाहणे जात येत होती, बाकी सगळे उप रस्ते, छोट्या गल्ल्या अनेक प्रकारच्या दुकानांनी भरलेल्या होत्या. युरोपात तशी माणसे कमीच दिसतात पण या चौकात मात्र भरपूर लोक दिसत होते. अल्ताफ आणि सयाजी पोलीस स्टेशनच्या गडबडीत असल्याने लोकल गाईडने आमची क्रेयेलोरे द मॉंटेसरांत' ट्रिप लवकरच उरकली होती. त्यामुळे इथे आम्हाला ४ तास वेळ होता. तास दोन तास मजेत गेले, पण जसजशी संध्याकाळ झाली आणि थंडीचा कडाका वाढला तसतसा कधी एकदा बस येतेय असे झाले. थंडीचा बचाव म्हणून विनाकारणच कुठल्याही दुकानात घुसायचं, तिथल्या उबदार वातावरणात उगाच वस्तू बघत बसायचं. तिथे काही शृंगारिक वस्तू आणि साधने बिनधास्त मांडलेली बघून नक्कीच अनेकांना आश्चर्य वाटले. नुसती वेगवेगळी दुकाने बघायचाही कंटाळा आला नंतर आम्ही मग मुख्य चौकात येऊन बसची वाट पाहत थांबलो. आणि एकदाची बस आली. परत एक नवीन इंडियन रेस्टॉरंट गाठून रात्रीचे जेवण घेतले. दुपारच्या `क्रेयेलोरे द मॉंटेसरांत' च्या जेवणाच्या अनुभवामुळे सर्वांनी इंडियन जेवणावर यथेच्छ ताव मारला आणि हॉटेल गाठलं, आणि आमचा बार्सिलोनातला तिसरा दिवस आंनदात संपला. भेटू उद्या.................
अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)