चार पाच महिन्यांपासून गाजत असलेल्या `स्पेन-पोर्तुगाल' ट्रीपच्या प्रयाणाचा दिवस उद्यावर येऊन ठेपलाय. गेले काही दिवस ऑफिसच्या कामांमुळे वर तोंड करायला वेळ मिळत नव्हता. आता कामेही आवाक्यात आलीत आणि प्रयाण उद्यावर येऊन ठेपल्याने जाण्याची हूर हूर देखील वाढलीय. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरचे आम्ही सभासद दरवर्षी अशी एक फॉरेन टूर करतो, अर्थात पूर्णपणे स्वखर्चाने. यावेळी व्हियेतनाम-कंबोडिया, इटली-फ्रान्स, न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया, असे अनेक पर्याय शोधत माझ्या मनात पहिल्यांदा आलेल्या `स्पेन-पोर्तुगाल' ची निवड झाली. अनेकांच्या कोटेशन मधून `ग्लोबल हॉलिडेज' च्या अल्ताफ पठाणांनी दिलेले कोटेशन फायनल झाले. `ग्लोबल हॉलिडेज' ने आमच्याआतापर्यंत अनेक फॉरेन ट्रिप अरेंज केल्यात. त्यामुळे बी.ए.आय. च्या लोकांचे लायकिंग्ज, अपेक्षा, प्रॉब्लेम्स ग्लोबलचे पार्टनर अल्ताफ पठाण यांना व्यवस्थित कळल्याने ते चांगली टूर अरेंज करून देतात. २५ मेम्बर अपेक्षित होते पण १६ च्या वर काही लिस्ट जाईना. मग कुणाला फोर्स करत, गळ घालत, विनंती करत कशी तरी २१ पर्येंत लिस्ट पोहोचली. आमचे कोटेशन कमीत कमी २१ लोक असे होते. त्यातही एखादा मध्येच नाही म्हणतोय, दुसरा कुठली तरी अडचण सांगतोय, मग तिसऱ्यालाच तयार कर, असे करत कोटा पूर्ण झाला. मग सुरु झाली तयारी. बऱ्याच जणांच्या या अगोदरही फॉरेन ट्रिप झाल्याने आणि युरोपही (पण दुसरे देश) या अगोदर दोन वेळा झाल्याने तसा अनुभव होताच. डॉलर/ युरोची खरेदी, मागील वेळी काय न्यायचे राहिले होते, काय उगाचच नेले होते, या सगळ्यातुन हळू हळू तयारी पूर्ण होत होती. तसा विमान प्रवास काही मला आणि इतरांनाही नवीन नाही, त्यामुळे त्यातील उत्सुकता मला नसली तरी नवनवीन देशात जाणे, नवीन प्रदेश, तिथली संस्कृती, तिथल्या हेरिटेज आणि आताच्या आधुनिक इमारती पाहणे याबद्दल मला आकर्षण आहेच.......

विमानतळ हि सर्वसमानतेचा आदर्श घालून देणारी जागा असते. इथे कोणी छोटा मोठा नसतो, सगळे एका लायनीत उभे दिसतील. अनेक भले भले सेलिब्रेटी लोक सुद्धा एअरपोर्ट च्या बाहेरच्या बाजूला कट्टयावर बसलेले किंवा इकडे तिकडे रेंगाळताने दिसतील. कोणी नवखा नवरा आपल्या बायकोला सोडून जाणार असतो, त्यांच्यातील निरोप देण्याची रोमांचकताही कुठे दिसेल. त्यांनी घेतलेले निरोपाचे चुंबन म्हणजे शृंगार नव्हे, तर ती प्रेमातील उत्कटता, विरहाची वेदना, पुनर्भेटीची ओढ असं बरंच काही त्या भेटीमागे असते. कुठे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी निघालेल्या मुलाला सोडायला आलेले वृद्ध आईबाप, आता पुन्हा कधी भेटेल या चिंतेत नकळत डोळे पुसताने दिसतील. प्रवाशांखेरीज इतरांना विमानतळाच्या आत जायला परवानगी नसल्यामुळे विमानतळावर सोडायला गेलेल्या माणसाला अक्षरशः स्त्यावरच सोडून परत फिरावे लागते. एकदा तो आत गेला कि तुमचा त्याच्याशी संपर्क संपला. आपल्या अपेक्षेतलं सोडायला जाणं म्हणजे कसं असतं.? ``गाडी सुटली, रुमाल हलले........... क्षणात डोळे टचकन ओले''........ असं काहीतरी. असो.

एकदा तुम्ही तिकीट, पासपोर्ट आणि व्हिसा दाखवून आत शिरलात कि बाहेरचा संपर्क संपला. आत जाताने आपल्या तिकिटावरील नेमका गेट नंबर शोधणे आणि योग्य त्या गेटवर पोहोचणे हे खूप गरजेचे. आत गेलात कि समोर आपण बुकिंग केलेल्या एअर लाईनचे काउंटर शोधायचे. तिथे अगोदर लगेज चेकिंग. स्कॅनर मधून सगळ्या बॅगा सुखरूप बाहेर आल्या कि आपल्याकडे काही आक्षेपाहार्य नसतानानेही आपला जीव भांड्यात पडतो. पुढे काउंटरवर बॅगेजचे वजन करून ताब्यात देणे. इथे एकदा बॅग सोपवली कि तुम्हाला ती प्रवास संपल्यानंतरच दर्शन देणार. याच काउंटरवर तुम्हाला बोर्डिंग पास दिला जातो, यापुढे तो महत्वाचा. नंतर पुढे इमिग्रेशन काउंटर समोर उभे राहायचे. इथल्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर मूळचाच एक गंभीर भाव असतो, तो बघून प्रवाशी हि विनाकारण  गंभीर होतात. इथे स्कॅनरच्या बेल्ट वर तुमची केबिन बॅग तर ठेवायचीच पण पाकीट, चेन, खिशातील सगळ्या वस्तू, कंबरेचा बेल्ट, घड्याळ सगळे ट्रे मध्ये ठेऊन या स्कॅनरच्या हवाली करावे लागते. काही ठिकाणी तर पायातले बूट सुद्धा काढावे लागतात. आपल्याला स्वतःलाही दुसऱ्या एका स्कॅनर मधून जावे लागते. पुढे एक गंभीर अपटुडेट पोंशाखातला कडक कर्तव्यदक्ष दिसणारा ऑफिसर आपल्या सर्वांगावरुन स्कॅनर आणि हात फिरवत तपासणी करतो. इथे आपण उगाचच नर्व्हस होतो. इथे काही आक्षेपाहार्य वस्तू लायटर, माचीस, चाकू, नेलकटर, डिओड्रंट, पॉवर बँक असे काही बाही काढून घेतले जाते. इथून सुटलो कि माणूस हुश्श म्हणत लाउंज मध्ये येतो. आता विमानात बोर्डिंगची वाट बघणे. पण हा लाउंज म्हणजे श्रीमंतीचा मोठा बाजार असतो. अनेक मोठं मोठी शॉप्स इथे असतात. ड्युटी फ्री शॉप मध्ये बऱ्याच ब्रँडेड वस्तू मार्केट पेक्षा स्वस्त मिळतात. पण यापैकी बऱ्याच ब्रॅण्डच्या मूळ किमतीच इतक्या असतात कि डिस्काउंट असूनही त्या महाग वाटतात. अनेक जण खरेदी करतात इथे. इथे काही मोठ्या ब्रँडचे/ बँकांचे फ्री लाउंज असतात. तुमच्याकडे तेथील क्रेडिट कार्ड असेल तर चांगली सोय होते. समोरच्या स्क्रीनवर आपल्या विमानाचे बोर्डिंग कधी सुरु होते याकडे लक्ष द्यावे लागते. आणि ते सुरु होताच आपण विमानात पोहोचतो. पहिल्यांदा विमान प्रवास करणाऱ्याला एकप्रकारची हूर हूर, थोडीशी काळजी वाटत असते. अगोदर

प्रवास केलेल्यांची नवलाई संपलेली असते. विमान प्रवासातील टेक ऑफ आणि लँडिंग यातील थोडी खळबळ सोडली तर विमान प्रवास तसा कंटाळवाणा आणि एकसुरी. मोठा आवाज करत सुरु होणारे विमान जेंव्हा टॅक्सिइंग करत टेक ऑफच्या रनवे पर्यन्त जात असते तेंव्हा ते एस टी त बसल्याचा अनुभव देते. पन रनवेवरून वेग घेत अचानक हलकासा धक्का देत आकाशात झेपावते तो क्षण मस्त थरारक अनुभव असतो. क्षणभर आपण वजनविरहित फुलपाखरू होऊन हवेत उडतो आहोत असं वाटतं. (पण एखाद्याला भीती वाटत असेल तर त्याला मात्र आपण कुठेतरी अंतराळात भिरकावले जातोय असेही वाटून जाऊ शकते.) एकदा विमान सुखरूप आपल्या मार्गी लागले कि अनेक जण हुश्श करतात आणि सैलावतात. मग खाणे पिणे, टी.व्ही. बघणे आणि इच्छित स्थळी पोहोचण्याची वाट पाहणे एवढेच........................

अरे बोलता बोलता पोहोचलो कि इस्तंबुलला, उतरा आता. पुढचं विमान पकडायचं आहे ना?...............................

अनिल दातीर (सातारा)
९४२०४८७४१०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel