टर्किश एअर लाईनचे ४५० प्रवाशांना घेऊन जाणारे विमान मुंबईवरून अरबी समुद्राकडे झेपावलं तेंव्हा दिवस नुकताच उजाडत होता. आमचा बिल्डर्स असोसिएशन, सातारा सेंटरचा २१ जणांचा ग्रुप युरोपमधील स्पेन आणि पोर्तुगालला भेट द्यायला निघाला होता. ग्लोबल हॉलीडेजचे अल्ताफ पठाण आमच्यासोबत होते. आमचा विमान प्रवास तसा सूर्याला मागे टाकत पुढे पुढे जाणारा असल्याने विमान पुढे गेले तरी प्रत्यक्ष २-३ तासांनी जरा ऊन पडलं. अरबी समुद्राची निळाई संपून ओमानच्या भूमीचा नजारा दिसू लागला. आतापर्यंत मी ज्या ज्या वेळी विमान प्रवास केलाय त्या त्या वेळी खिडकीच्या बाजूची सीट निवडलीय. (त्यासाठी २४ तास अगोदर ऑन लाईन चेकइन करावे लागते किंवा तिकीट बुक करतानेच आपली सीट निवडावी लागते) मला एवढ्या उंचीवरून घडणारे पृथ्वीचे दर्शन मनापासून आवडते. तुम्ही जगाचा नकाशा बघितलाय? बघितला असणारच म्हणा. त्या नकाशात जसे हिरवे, पिवळे, करडे, पांढरे रंग दिसतात तसे ते आकाशातूनही अगदी स्पष्ट दिसतात. विमान प्रवास हा साधारण ३० ते ३५ हजार फुटांवरून होत असतो. आकाश क्लियर असेल तर खालचे भूभाग स्पष्ट दिसतात. ओमान, सौदी अरेबिया, बहारीन, कुवैत, बगदाद आणि नंतर सिरिया ची जमीन अतिशय रखरखीत आणि उजाड. (आपण कुठून प्रवास करतोय हे मला स्क्रीनवरच्या नकाशात दिसत होते.) सर्वदूर पसरलेल्या वैराण, विराण, भकास वाळूच्या टेकड्या इथलं जगणं किती खडतर असेल याचा अंदाज देतं. मध्ये कुठेतरी एखाद दुसरे शहर दिसते, तीच काय फक्त जीवनाची चाहूल. बाकी ऐंशी टक्क्या पेक्षा जास्त सर्व भकास,  उजाड माळरान. ही बंजर जमीन जिवंत दिसत नसली तरी जमिनी खालील काळं सोनं म्हणजेच खनिज तेलाचे साठे इथल्या लोकांना समृद्ध करताहेत, आणि इथले लोक सर्व सुखसोयी विकत घेताहेत. ...........................

काही वेळाने जमीन दिसायची बंद झाली आणि ढग दिसू लागले. विमानातून दिसणारे ढंगाचे दृश्य अतिशय मन मोहक असते. आणि त्यात विविधता तरी किती? काही ठिकाणी ढगांचे डोंगर दिसतील, कुठे कापसाच्या असंख्य लडी पसरून ठेवलेल्या दिसतील तर काही ठिकाणी कापसाचा गालिचा दिसेल. सौदी अरेबिया वरून जाताने असा पांढरा शुभ्र गालिचा दिसला. अगदी एकसंध पसरलेले हे ढग थोड्याशा सुरकुत्या पडलेल्या गालिच्या सारखे दिसत होते. हे ढग एकाच ठिकाणी कसे काय तरंगून राहत असतील याचं मला नेहमी आश्चर्य वाटते. थोड्या वेळाने आकाश पुन्हा निरभ्र झाले. दूरवर धुरांच्या रेषा उमटवत जाणारे एक विमान आम्हाला समांतर प्रवास करत होतं. लहानपणी आम्ही त्याला रॉकेट म्हणायचो. पण असं रोज रोज कोण रॉकेट सोडणार? धूर सोडणारे विमानच असावे. तेवढ्यात विमानाला थोडेसे हादरे बसू लागले, आणि पायलटने खुर्चीचे पट्टे बांधण्याची सूचना केली. मी बाहेर बघितले तर आकाश एकदम क्लिअर होते. तेंव्हा नवीन माहिती कळली कि विमानाच्या दृष्टिकोनातून खराब हवामान म्हणजे फक्त वादळ, वीज, पाऊस, ढगच नव्हे, तर वेगवेगळ्या उंचीवरून कमीजास्त वेगाने वाहणारे वारे हेही धोका दायकच. विमान थोडा वेळ खाली, वर, उजवीकडे डावीकडे असे होत पुन्हा स्थिर झाले. काही वेळानंतर वैमानिकाने आपण थोड्या वेळातच लँडिंग करणार आहोत अशी सूचना केली. आपला वेग कमी करत आणि एक छानशी गिरकी घेत त्या अवाढव्य विमानाने धावपट्टीला स्पर्श केला आणि करकचून ब्रेक लावत ते काही अंतरावर जाऊन थांबले. असे विमान थांबत असताने आपण जे पाठीमागच्या सीटवर दाबले जातो त्यावरून विमानाचा खरा वेग काय असेल याची हलकीशी चुणूक अनुभवास येते. विमान उतरताच प्रवाशांनी टाळ्या वाजवून पायलटचे कौतुक केले. जवळ जवळ ६ तासांचा प्रवास झाला होता....................................

``इस्तंबूल''............. तुर्कस्थानच्या या राजधानीचे विहंगम दृश्य खिडकीतून दिसत होते. तुर्कस्थान कधी फार श्रीमंत असलेले कधी ऐकले नव्हते पण इस्तंबूल मात्र फार सुंदर दिसत होते. या पश्चिमेकडच्या देशांनी इतकी सुंदर आखीव रेखीव शहरे कधी आणि कशी वसवली याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आलंय. सगळीकडे बहुतांशी एकाच रंगाच्या इमारती. भिंतींचा थोडासा पिवळसर, ऑफव्हाईट रंग आणि छप्पर मात्र पूर्ण लाल रंगाचे. इस्तंबूल बहुतांशी सर्व घरे हि उतरत्या छपराची आहेत आणि ते हि पॅगोडा टाईप. म्हणजे चारही बाजूंनी उतरत्या कौलांचे छप्पर. आभाळातून पडणारे बर्फ साठून न राहता ते घसरून जावे म्हणून ही सोय असते. तशा मॉडर्न बिल्डींग्ज दिसतातही पण बहुतांशी इमारती एकसारख्या दिसणे हे शहराचे वैशिष्ठय.

इस्तंबूल ला काही आमचा मुक्काम नव्हता मुंबईपासूनचा आतापर्यंतचा प्रवास सहा तासांचा झाला असला तरी तिथे सकाळचे अकरा वाजले होते आपल्यापेक्षा दोन तास मागे. इस्तंबूल ला फक्त ट्रान्झिट म्हणजे विमान बदलणे होते. तेवढ्या वेळेत विमानतळाचा फेरफटका मारून झाला होता. विमान उतरताने आणि पुन्हा उड्डाण करताने झालेले इस्तंबूलच दर्शन नक्कीच सुखावणारं होतं. पुन्हा कधी इथे ट्रांझिट असेल त्यावेळी इथे किमान एक मुक्काम तरी नक्की करायचा हे मी मनोमन ठरवून टाकले होते. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही १५० ची कॅपॅसिटी असलेल्या छोटेखानी विमानातून बार्सिलोनाला प्रयाण केले. पुढचा प्रवास कधी जमिनीवरून तर कधी समुद्रावरून असा होत होता. खाली दिसणारे विविध नजारे बघत चार तासाच्या प्रवासानंतर बार्सिलोना जवळ आल्याची अनांउन्समेंट झाली आणि आम्ही सर्व साहित्य, आणि महत्वाचा म्हणजे पासपोर्ट/ बोर्डिंग पास व्यवस्थित घेतलाय याची खात्री करून घेत स्पेन च्या जमिनीवर पहिले पाऊल टाकण्यास सज्ज झालो. ..................

अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel