(अंतिम)......
लिस्बन मधील आमचा दुसरा आणि शेवटचा दिवस उगवला. ब्रेकफास्ट करून गायडेड सिटी टूर सुरु झाली. पहिल्यांदा आम्ही पोहोचलो ते 'जेरॉनीमास मोनेस्टरी' ला. हे एक जुन्या काळचे चर्च म्हणा राजवाडा म्हणा पण अतिशय भव्य बांधकाम. जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त. हे चर्च आम्ही आतून फिरून पहिले. बांधकाम बघून आश्चर्याने माणूस अवाक होतो. त्याकाळी यांच्याकडे एवढी सुंदर वास्तुकला होती हे बघून आश्चर्य वाटतेच, आतासारखी आधुनिक साधनं उपलब्ध नसूनही इतकी भव्य बांधकामे कशी केली असतील? अर्थात आपली भारतीय संस्कृतीही काही कमी नाही. असेच आश्चर्य आपल्याला 'वेरूळ-अजिंठा' बघतानाही वाटते. या इमारतीत अनेक कलाकृती आणि म्युरल्स होते. एका भिंतीवर अनेक चेहरे असलेले एक म्युरल होते आणि त्यातील एका व्यक्तीचा चेहरा आणि हेअर स्टाईल हि आताचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रन्फ यांच्यासारखेच होते. त्यामुळे त्या गाईडने 'हे म्युरल तयार करणारा नक्कीच नॉस्ट्राडॅमस सारखा भविष्यवेत्ता असावा' असे गमतीने म्हटले. या इमारतीमधील अजून एक लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे 'वास्को द गामा' याचे थडगे. अस्तित्वात असलेल्या भारताचा शोध (?) या वास्को द गामाने लावला असा इतिहास आपल्याला शिकवला गेलाय. हा वास्को द गामा संपूर्ण आयुष्य समुद्रावर फिरत फिरतच जगला. आपल्या भारतातील कालिकत बंदरात त्याने पहिले पाऊल टाकले होते. नंतर पोर्तुगालला परत गेला. त्यानंतर काही वर्षांनी हा वास्को द गामा पुन्हा एकदा भारतात आला पण परत नाही जाऊ शकला. १५२४ ला कोचीन इथे त्याचा आजारपणात मृत्यू झाला. तिथेच त्याचे दफन करण्यात आले, पण काही वर्षांनी त्याचे शव काढून स्पेन ला नेण्यात आले व तिथे एका मॉनेस्ट्रीत ठेवले गेले. त्यानंतर काही वर्षांनी पोर्तुगाल ने मागणी केल्याने ते शव तिथून काढून पोर्तुगालला आणले गेले. सध्या ते या जेरॉनीमास मोनेस्टरी मध्ये एका थडग्यात ठेवले आहे. त्यामुळेच 'वास्को द गामा' ची फिरण्याची हौस त्याच्या मृत्यूनंतरही टिकून होती असे गमतीने म्हणतात. या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदा फिरते विक्रेते भेटले. गॉगल्स, गळ्यात बांधायचे मोठे गमछे, माळा, कानातील आभूषणे, चित्रे अशा विविध वस्तू लोक विकत होते. हि नक्कीच आपली देन असावी. आपल्याकडून पोर्तुगीज किमान एवढे तरी शिकले असे म्हणायला हवे. पुढे एका मार्केट मध्ये सर्व खरेदीसाठी गेलो. महाबळेश्वरला जसे मार्केट आहे, तशा अनेक छोट्या छोट्या गल्ल्या या विविध दुकानांनी भरलेल्या होत्या. स्थानिकांपेक्षा बाहेरून येणारे पर्यटक डोळ्यासमोर ठेऊन हि दुकाने सजलेली होती. इथल्याच एका दुकानात एकजण हिंदी बोलणारा भेटला. तो बांगलादेशी दुकानदार होता. इथून बाहेर पडून आम्ही सेंट जॉर्ज कॅसल आणि बेलेम टॉवर ला भेट दिली. समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेली हि मॉन्युमेंट्स खास पर्यटकांचे आकर्षण म्हणूनच बांधली गेली असावीत. इथेच एक उंच इमारत होती तिचे नाव 'मॉस्टिरिओ डॉस जेरॉनीमास'. आतील लिफ्टने १०० फूट उंचावर गेलो आणि उंचावरून लिस्बन शहराचा देखावा दिसला. समोरचा जुना राजवाडाही मस्त दिसत होता.
एव्हाना दुपार होत आली होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष आता जेवणाकडे लागले होते. इथे एक तर रस्त्यावर कोणी काही खाद्यपदार्थ विकत नाही, आणि एखाद्या हॉटेलात जायचं तर तिथलं नक्की काय मागवायचं हे कळत नाही. पदार्थांचे दिसणे आणि चव यात जमीन अस्मानाचा फरक. हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट करताने एखादा छानसा केक सारखा दिसणारा पदार्थ उचलून तोंडात टाकावा आणि तो भिकार चवीचा ब्राऊन ब्रेड निघावा असंही व्हायचं. नॉन व्हेज चे तर इतके प्रकार असायचे पण चव घेऊन बघितली कि तोंड कडू व्हायचं. युरोपियन लोक पोर्क, लैम्ब, टर्की आणि इतर अनेक प्राण्यांचे मांस खातात पण त्याला मसाला नसतो, तो अनेक प्रकारच्या सॉसेजेस आणि बटर, चीज किंवा तत्सम काही पदार्थ टाकून खायचे असतात. पण आपल्याला नक्की कशात काय घालायचे माहित नसल्याने खाणे जमत नाही...... अरे! भरकटलो वाटतं. चला जेवायला. रोसिवो स्क्वेअर येथील छानसे इंडियन रेस्टोरेंट मध्ये दुपारचे जेवण झाले. इथून पुढचा वेळ तसा काही नियोजित नव्हता. आणि संध्याकाळचे जेवण सुद्धा या रोसिवो स्क्वेअर च्याच परिसरात होते. त्यामुळे इथेच रेंगाळायचे कि परत हॉटेल वर जायचे यावर उहापोह होऊन रात्री परत येऊया म्हणत गाडीत बसलो. एकटा आमचा आशिष हलगेकर मात्र तिथेच थांबतो म्हणाला. आशिषने इथे ज्या गोष्टी बघितल्या त्या बघून अनेकांना वाटले कि आपणही थांबायला पाहिजे होते. हॉटेलवर जाऊन कोणी आराम करणे पसंत केले, कोणी जवळच्याच कॅसिनोला गेले, कोणी खरेदीला गेले. हॉटेलच्या शेजारीच भला मोठा 'कॅसिनो लिसबोआ' होता. मी आणि अजून एक दोन जण तिथे गेलो. चार मजली असलेला हा कॅसिनो म्हणजे अजब मायानगरी होती. किमान ५-७ हजार मशिन्स तिथे होती. आणि ती पैसे खाणारीच होती हे नक्की, कारण माझे १०० युरो (८०००/-रुपये) दहाच मिनिटात संपले, आणि हे आपले काम नाही असे म्हणत बाहेर पडलो. रात्री पुन्हा रोसिवो स्क्वेअरच्या एका पंजाबी रेस्टोरंटला डिनर होते. आपले इंडियन कुठेही गेले तरी बदलत नाही कारण या हॉटेलमध्ये ड्रिंक्स बारला जे लाईट डेकोरेशन केलेलं होतं त्यासाठी चक्क चायना मेड पन्नास-साठ रुपयांच्या लाईटच्या माळा वापरल्या होत्या. जेवण करून हॉटेलवर पोहोचलो, सर्वात महत्वाचे काम म्हणजे लगेज पॅक करणे. अनेकांच्या सामानात खरेदी केलेल्या अनेक वस्तू वाढल्या होत्या. इथे एक आवर्जून सांगायला हवे ते असे कि अनेक देशात ड्युटी फ्री शॉप्स आणि मॉल्स असतात. अशा ठिकाणी खरेदी केलेल्या गोष्टी आपण त्यांच्या देशाबाहेर घेऊन जाणार असलो तर एअर पोर्ट वर यातील काही रक्कम म्हणजे त्या देशाचा विक्री कर भरलेला असतो तो परत मिळतो. पूर्वी बघा एखादा ट्रक सामान घेऊन निघाला आणि मध्ये एखादी सिटी लागली, जी फक्त पास करणार असला तर एका जकात नाक्यावर जकात भरायची आणि बाहेर पडताने दुसऱ्या नाकयावरून परत घ्यायची. साधारण तसाच प्रकार. फक्त त्यासाठी त्या दुकानातून तसा इन्व्हॉईस करून घ्यायला लागतो.
सकाळी सकाळी लवकर आवरून बॅगा घेऊन आम्ही लिस्बनचे एअरपोर्ट गाठले. तिथे त्या वस्तू दाखवून अनेकांनी काही रक्कम परत मिळवली पण तिथेही काट छाट होतीच. पण भागते चोर कि लंगोट प्यारी म्हणतो तसे फुकट मिळताहेत म्हणल्यावर तासाभराच्या प्रयत्नानंतर थोडीफार रक्कम परत घेतली. एअरपोर्ट वरील नेहमीचे सोपस्कार पार पाडून आम्ही लिस्बन आणि पोर्तुगालला शेवटचा गुड बाय करत इस्तंबूल कडे जाणाऱ्या विमानात पाय ठेवला. एव्हाना परतीचे वेध लागले होते, कधी एकदा घरी पोहोचतोय असं वाटत होतं. इस्तंबुलला विमान बदलून पहाटे पहाटे मुंबई ला पाय उतार झालो. गेल्या दहा दिवस बघितलेल्या निळ्या आकाशातून परत मुंबईच्या धुरकटलेल्या आकाशाकडे नजर गेली आणि आपण आपल्या भारतात आल्याची जाणीव झाली. आणि अशा प्रकारे आमचा 'स्पेन-पोर्तुगाल' चा विदेश दौरा आनंदात पार पडला. ........
अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)