नमस्कार वाचकहो आणि लेखकहो, या अंकापासून आरंभ तुमच्यासाठी एक नवीन सदर घेऊन येत आहे. ते म्हणजे 'आरंभयात्री'. प्रत्येक अंकात विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत प्रकाशित करण्यात येईल. यंदाचा हा सप्टेंबरचा अंक कथा विशेषांक आहे. याच अनुषंगाने या अंकातील आरंभयात्री आहे प्रसिद्ध चित्रपटलेखक तसेच गीतकार क्षितिज पटवर्धन!

वायझेड, धुरळा, क्लासमेट्स, टाईमपास २, फास्टर फेणे, माऊली, डबल सीट अशा सुपरहिट चित्रपटांचे लेखन क्षितिज यांनी केले आहे. बघतोस काय मुजरा कर, सातारचा सलमान, बापजन्म, अंड्याचा फंडा या चित्रपटांसाठी गीतकार म्हणून त्यांनी काम केले आहे.

'रायटर्स फर्स्ट' हे त्यांचे युट्युब चॅनेल नवलेखकांसाठी मार्गदर्शक आहे.  

(मुलाखत आणि शब्दांकन: वैष्णवी सविता सुनिल कारंजकर)

    तुम्ही कथालेखनाच्या क्षेत्रात छंद म्हणून आलात की ठरवून या क्षेत्राकडे वळलात?

मी शाळेत असल्यापासून निबंध आणि कविता लिहायचो. पण कथा याच्याशी फारसा लिहिली नव्हती. त्यानंतर लेखनाविषयी हळूहळू कुतुहल निर्माण होऊ लागलं. पुढे कॉलेजात गेल्यावर एकांकिकांकडे, नाटकांकडे वळलो. त्यामध्ये रस वाटू लागला. पुढे मी पत्रकारितेचे पद्व्युत्तर शिक्षण घेतले. तिथे पत्रकारिता, जाहिरात क्षेत्र अशा लेखनाच्याच विविध अंगांशी ओळख झाली. त्यातून मला नाटक, सिनेमा, जाहिरातक्षेत्राविषयीची आवड निर्माण झाली. मग यात काम करायचं ठरलं. पुढे एका कामातून दुसरं काम मिळत गेलं आणि अशी ही वाटचाल सुरु झाली.  याला छंद म्हणण्यापेक्षा मी खरंतर पॅशन म्हणेन.

    या आधी तुम्ही कविताही केलेल्या आहेत. त्यामुळे चांगली कविता करायची असेल तर फक्त कल्पनाशक्ती असून चालत नाही. त्यासाठी प्रतिभा ही एक महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं, कवितेप्रमाणेच कथालेखनासाठीही प्रतिभेची आवश्यकता असते का?

प्रतिभा हा शब्द व्यक्तिसापेक्ष आहे. तुम्हाला ज्या गोष्टीत प्रतिभा वाटते, ती समोरच्यासाठी कदाचित नसेल. मला असं वाटतं की जगातला प्रत्येक माणूस गोष्ट सांगू शकतो. प्रत्येकाकडे गोष्ट सांगण्याची हातोटी असते असं नाही, पण त्याच्याकडे गोष्ट नक्की असते. फक्त ती कशी, कधी आणि कोणाला सांगायची हे बर्‍याच जणांना कळत नाही. त्यामुळे प्रतिभा हा लांबचा मुद्दा आहे पण चांगली कथा सांगायची असल्यास आधी तुमच्याकडे कथा असणे गरजेचे आहे. तुम्ही गोष्टी बघणे, अनुभवणे, जगणे हे खूप महत्त्वाचे आहे. यातूनच हळूहळू तुमच्या आत कथा तयार होत जाते. त्यामुळे माणसाकडे माणूस म्हणून बघणे, जगण्याकडे जगणे म्हणून बघणे खूप महत्त्वाचे आहे. कारण, यातूनच कथा सापडत जाते. एकदा जगण्यातल्या गमतीजमती दिसू लागल्या की त्याचे पापुद्रे दिसू लागतात. थोडं हळवं होतो, कधीकधी चिड येते, कधी त्यातला विनोद दिसतो.
साहित्याचे जे नऊ रस असतात त्यात आपण आयुष्य जगत असतो. त्यामुळे प्रत्येक रसाचा आस्वाद आयुष्य तुम्हाला देत असतं आणि त्यातूनच कथा तयार होतात. It’s a mixture of Imagination and observation. कल्पनाशक्ती आणि निरिक्षणशक्तीच्या मिश्रणातूनच कथा तयार होते. कधीकधी पूर्ण कल्पनाशक्तीतून होते, कधी पूर्ण निरिक्षणशक्तीतून होते. पण बहुतांशवेळा या दोन्हीचे मिश्रण असते. त्यामुळे मला असं वाटतं की कथा लिहिण्यासाठी तुमच्याकडे या दोन गोष्टी असणे गरजेचे आहे.

    तुम्ही आधी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत होता. त्या क्षेत्राकडून कथालेखनाच्या क्षेत्राकडे कसे वळलात? त्यासाठी काही अडचणी आल्या का?

मी आतापर्यंत जिथे जिथे काम केलं तिथे मी एक गोष्ट कायम पाळत आलो. जेव्हा मला असं वाटेल की हे काम आपला कम्फर्ट झोन बनत आहे, त्यावेळी मी तिथून बाहेर पडलो. मग तिथे पैसे चांगले असूदे, माणसे चांगली असूदे पण जिथे आपली वाढ होत नाही, आपली समज वृद्धिंगत होत नाही, शिकायला मिळत नाही तिथे थांबायचं नाही हा नियम मी कटाक्षाने पाळला. मी वृत्तपत्रासाठी काही काळ काम केलं. नंतर एका जाहिरात संस्थेत काम केलं. तोवर मी लिखाणाच्या प्रेमात होतो, मग हळूहळू संकल्पनांच्या, आयडियाच्या प्रेमात पडलो. मग नाटकाच्या बाजूला वळलो. नाटक लिहित असतानाच मला चित्रपटाचं काम मिळालं आणि ते छान जमलं आणि मग कामं मिळत गेली.

    कथालेखक पटकथा लिहू शकतो का? त्याला विशेष प्रशिक्षणाची गरज असते का?

कथालेखक पटकथा लिहू शकतोच असं नाही. त्याला प्रशिक्षणाची नक्कीच गरज असते. कारण नाटक हा कलेचा शब्दप्रधान प्रकार आहे आणि चित्रपट हा दृश्यप्रधान प्रकार आहे.

हा त्यातील मूलभूत फरक आहे. म्हणून आपण म्हणतो, सिनेमा हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे आणि नाटक हे लेखकाचे माध्यम आहे. त्यामुळे चांगला लेखक, कथाकार चांगला पटकथाकार होतोच असं नाही. कारण चित्रपटाची एक विशिष्ट जडणघडण आहे. ती तुम्हाला नव्याने विद्यार्थी होऊन आत्मसात करावी लागते. त्यामुळे मी कथा चांगल्या लिहितो म्हणून मी चित्रपटही चांगला लिहिन असं होत नाही. चित्रपट हा निगुतीने, शांतपणे आणि विद्यार्थीदशेत येऊन करावा लागतो. त्यामुळे त्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे कारण त्याशिवाय तुमच्यावर ते संस्कार होणे शक्य नाही. तुम्ही नाटकाचे संस्कार चित्रपटात आणले तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी जागतिक चित्रपट, स्थानिक चित्रपट जसे की मराठी, तमिळ, तेलुगु यांच्याबद्दल माहिती असणे, माहिती मिळवणे, त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ते एक विशेष प्रकारचे काम आहे ज्याला प्रशिक्षणाची जरूरी असते.

    कथा लिहिणे आणि चित्रपटासाठी कथालेखन करणे यात काय फरक आहे?

चित्रपटासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कथेचा पट तिथे मांडावा लागतो. कथांमध्ये साधारणत: मानवी गुंतागुंत असते, वर्णने असतात, घटना घडलेल्या असतात. चित्रपटामध्ये कॅरॅक्टरायज़ेशन हा महत्त्वाचा घटक आहे. चित्रपटाची गंमत अशी आहे की तो सगळ्या कलाप्रकारांचे मिश्रण असलेला कलाप्रकार आहे. म्हणजे संगीत, नृत्यकला, शिल्पकला, गायन, वादन, वेशभूष, रंगभूषा, लेखन, दिग्दर्शन, तांत्रिक गोष्टी या सगळ्या बाबी एकत्र येऊन चित्रपटात काम करत असतात. त्यामुळे चित्रपटाची कथा लिहिणे हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. चित्रपट लिहिताना तो दृश्यात्मक कसा होईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं.

    चित्रपटांसाठी कथालेखनाकडे आपण पूर्णवेळ व्यवसाय म्हणून बघू शकतो का?

निश्चितच बघू शकतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम हवा आणि प्रक्रियेवर विश्वास असायला हवा. या दोन गोष्टी आणि कथा लिहिण्याची आवड, सवड, इच्छा असेल, पॅशन असेल, लिहिल्याशिवाय गोष्ट सांगितल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नसेल तर तुम्ही निश्चितच या क्षेत्रात येऊ शकता. माया अ‍ॅन्जेलु यांचं एक खूप चांगलं वाक्य आहे, “ There is no bigger burden than a story untold” म्हणजे तुमच्या आत सांगायची राहून गेलेली गोष्ट हे जगातील सगळ्यात मोठं ओझं आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की मी रिता झालो पाहिजे, माझ्यातील गोष्ट बाहेर यायला पाहिजे त्या सगळ्या लोकांसाठी हे क्षेत्र खुलं आहे. इथे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. हे गणित नाही. जो ज्याला हवं तसं आणि ते समीकरण मांडू शकतो. मी कायम म्हणतो, “कलेमध्ये स्पर्धा असावी, प्रदर्शन नसावे.”

    व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे बघत असताना नवलेखकांनी कुठून सुरुवात करायला हवी?

सगळ्यात आधी लेखकांनी स्वत:ची नोंदणी करायला पाहिजे. स्क्रीन राईटर असोसिएशन नावाची एक संस्था आहे. तिथे स्वत:ची नोंदणी केली पाहिजे. त्यांचे ओळखपत्रही मिळते. त्यानंतर तुम्ही लिहिलेली कोणतीही कसलीही कथा तुम्ही त्यांच्या वेब साईटवर रजिस्टर करू शकता. कथा नोंद केल्यावर तुम्ही ती कुठेही, कोणालाही पाठवू शकता. मग ते निर्मात्याला, प्रॉड्क्शन हाऊसला, दिग्दर्शकालाही पाठवू शकता. इथे तुमचं माणसं शोधण्याचं काम सुरु होतं. यानंतर समविचारी लोक शोधून त्यंच्याकडून काहीतरी शिकत राहणे, सुधारणा करत राहणे हा महत्त्वाचा टास्क आहे. नवलेखकांसाठी मी तीन गोष्टी सांगेन:

१.      स्वत:ची नोंदणी करून घ्या.
२.      भरपूर वाचा, भरपूर चित्रपट बघा.
३.      माणसांमध्ये फिरा.

कारण घरात बसून तुम्ही जगात काय चाललं आहे हे पाहूही शकत नाही आणि ठरवूही शकत नाही. जेव्हा तुम्ही जगाचा बरावाईट अनुभव घ्याल, तो घ्यायला शिकाल तेव्हा तुम्ही एक चांगला लेखक होऊ शकता.

    वाचकांची अभिरूची घडवणे हे लेखकाचे काम आहे. त्यामुळे लेखकाने आपला दर्जा टिकवायला हवा. तो कसा टिकवता येईल?

लेखकाचे काम वाचकांची अभिरुची घडवणे हे नसून व्यक्त होणे हे आहे असं मला वाटतं. प्रेक्षकांची, वाचकांची अभिरुची कशी घडेल हे आत्ताच्या काळात लेखक सांगू शकत नाही. कारण जे पॉप्युलर असतं ते चांगलं असतं हा गैरसमज आधी काढून टाकूया. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की ज्या गाण्याचे १० कोटी प्रेक्षक, श्रोते आहेत त्या गाण्यापेक्षा २ लाख श्रोते असलेली गाणी जास्त चांगली असू शकतात. त्यामुळे प्रेक्षकांची, वाचकांची अभिरूची घडवण्यापेक्षा न घाबरता, मोकळेपणाने व्यक्त होणे हा लेखकाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. मग अभिरूची आपोआप घडते. मला आता लोकांची अभिरूची घडवायची आहे असे म्हणून काम कधीच होत नाही. दर्जाबद्दल बोलायचं झालं तर असं होऊ शकतं की तुम्ही अत्यंत चांगल्या विषयावर सुमार सिनेमा केला किंवा सुमार विषयावर दर्जेदार सिनेमा केला. मग अशा वेळेला तुमचा दर्जा कोण ठरवणार? त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाचे विश्लेषण करू नये. तुम्ही विश्लेषण करू लागलात की तुम्ही मोकळे राहत नाही. सर्वप्रथम हा विचार करायला हवा की मला हे बघायला आवडेल का? जर त्याचं उत्तर हो असेल तर तुम्ही बिंधास्त पुढे जा. मग ती गोष्ट कोणाला आवडते कोणाला नाही याचा विचार करू नका.

*****

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel