प्रसाद वाखारे
मनुष्य हा आयुष्यभर एक विद्यार्थीच असतो हे अगदी खरं आहे. सुरुवातीला अगदी रडत पडत कशीतरी शाळेची पहिली पायरी चढतो आणि नंतर त्या विश्वात असा रमतो की शाळा त्याच्या जीवनातला अविभाज्य घटक बनून जाते. आज कित्येक वर्षानंतर स्वतःसाठी निवांत वेळ मिळाला आणि मग काय मनाने असली भरारी घेतली आणि थेट शाळेच्या आठवणींची वरातच काढली. वरातीमध्ये सर्वांनी हजेरी लावली. विशेष अतिथी होते माझा शाळेतला लंगडा बेंच, काळाकुट्ट फळा, चेपलेली केराची पेटी, रंगीत खडूंचा डबा आणि बाईंचं डस्टर. त्यांना बघून डोळे पाणावले पण त्यांनी त्या आठवणी तश्याच जपून ठेवल्या होत्या.
पहिले मला माझा बेंच भेटला, तो लंगडत चालत होता. माझा प्रश्नजडीत चेहरा बघून तो खुदकन हसला आणि मला म्हणाला अरे मीच तो ज्यावर तू खूप मस्ती केलीस, बरेच नावं कोरलीत. तुझ्या बऱ्याच सुख दुःखाचे मलाच ओझे होते. आज लंगडत चालतोय मी ही तुझीच भेट आहे. बस ! तेव्हाच डोळ्यात साठलेलं डबकं ओसंडून वाहायला लागले. त्या बेंचला मी दिलेल्या त्रासाचं दुःख अजिबात नव्हतं उलट त्याला आनंद होता की त्याने माझ्या आठवणींत कायमचं स्थान मिळवलं. आज नकळत त्याने आठवणींचे महत्व पटवून दिले.
पलीकडे फळा आणि बाईंचं डस्टर माझ्याकडे कुतूहलाने पहातच होते. क्षणभर उशीर न करता माझ्या पुढ्यात येऊन बसले. आजही फळा तसाच अगदी काळाकुट्ट आणि सोबतीला तेच एकुलतं एक बाईंचं डस्टर. माझी मस्करी करत मला त्यांनी विचारले की, काय रे कुठे व्यक्त होतोस आज? शिकवणी लावलीस की काय? हजेरी पटावरची संख्या डोळ्यासमोर दिसायची तेव्हा तुला तुझ्या सोबतीची जाणीव व्हायची, आज कोण सांगतं तुला सर्व? सुविचार वाचायला मिळतात का रे? तिकडे डस्टर पण पुटपुटलं झालेल्या चुका कशाने पुसतोस आज? यांचा एक एक प्रश्न मला बोचत होता आणि सोबत अश्रूंना बांध घालायलाही कुणीच नव्हतं. या प्रश्नांतून एक मात्र नक्की शिकायला मिळालं की आज चुकीला माफी नाही शेवटी जुनं ते सोनं.
कोपऱ्यातली केराची पेटी माझ्याकडे डोकावून बघत होती. ती मला समाधानी दिसत होती शेवटी स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी चोखपणे पार पडल्याचा तिला आनंद होता. बऱ्याचदा लाथा खाल्यामुळे नेहमी तिला मिळालेला नवीन आकार तिचं मनोरंजन करतच होतं. खऱ्या अर्थाने चेपलेली केराची पेटी म्हणजे मूर्ती लहान पण तिची कीर्ती महान होती !
सर्वांसोबत बोलत असतांना टपकन डोक्यावर कुणीतरी उडी मारली आणि समोर येऊन पंगत मांडली ते दुसरे कुणी नसून ते होते रंगीत खडू. इंद्रधनुष्यप्रमाणे या खडूच्या डब्याने माझ्या आयुष्यात रंग भरले होते ते ही अगदी निस्वार्थपणे. आज ते देखील मला पाहून खूप आनंदी होते शेवटी माझ्या आजच्या यशातला हत्तीचा वाटा त्यांचाच होता. आज सर्वांना भेटून खूप छान वाटलं, निर्जीव वस्तूंनी आठवणींत जीव फुंकला. आज मनसोक्त नाचलो आठवणींच्या वरातीत अगदी बेधुंद होऊन! आठवणींच्या साठ्यातील ही एक अविस्मरणीय आठवण...
*****