मैत्रेयी पंडित
जून महिना उजाडला की लहान मुलांची पटापट खूप खेळून घेण्यासाठी सुरू असलेली गडबड वातावरणात काही वेगळाच उत्साह आणते. उन्हाळ्याने काहिली झालेला प्रत्येकाचा जीव या चिवचिवाटात जरा रमतो. पहिल्या आठवड्यात वळीवाचे एकदा तरी येणे होतेच. आणि मग पसरतो तो हळुवार गारवा आणि सुखद उत्साह! अबालवृद्धांपर्यंत सगळेच याचा आनंद लुटतात.
आणि मग दुसऱ्या आठवड्यात सुरू होते खरेदीची गडबड. कपड्यांची दुकाने, स्टेशनरी स्टोअर्स, खचाखच गर्दीने भरून जातात. दोन महिन्यांपासून शांततेच्या गर्तेत बुडालेल्या शाळा आपल्या चिमण्या पाखरांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला हा अविस्मरणीय आठवडा ! फक्त तो अविस्मरणीय आहे हे तो जगताना कोणालाच कळत नसतं.... आणि तो आयुष्यात मागे पडला की पुन्हा जगता यावा म्हणून प्रत्येकचं मन आसुसतं !
आज १५ जून ! वर्षानुवर्षे अव्याहतपणे ठरलेला नवीन शालेय वर्षाचा पहिला दिवस ! पण आज दामले काकूंची ती दरवर्षीची गडबड मात्र नव्हती, कालच्यासारखाच आजचा ही दिवस शांत होता. फक्त कोलाहल होता, तो त्यांच्या मनात ! चाळीस वर्षांच्या ज्ञानदानाच्या अव्याहत सेवेनंतर तीन महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाल्या होत्या त्या. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्या दिवशीची नसलेली गडबड त्यांच्या मनात काहूर उठवत होती. पण काकुंचे मन मात्र अजूनही तेवढंच उत्साही आहे बरं का ! सध्या काकूंनी नवीन उपक्रम हातात घेतला आहे ना सेवानिवृत्तीनंतर ! सोसायटीमधल्या लहान मुलांना जमवणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे, त्यांना गोष्टी सांगणे, गीतेचे अध्याय, छोटेमोठे श्लोक शिकवणे अशा सगळ्या गोष्टी त्या उत्साहाने करतात. त्यामुळे त्या सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या झाल्या आहेत. छोटीमोठी भांडणे पण घरी नेण्यापेक्षा मुलं त्यांच्याकडेच सोडवायला आणतात आता तर ! त्या सुद्धा आनंदाने त्या लुटुपूटूच्या कोर्टाच्या जज बनतात... न्याय निवाडा करतात. आणि या छोट्या कोर्टात शिक्षा काय असते माहिती?? दोन्ही पक्षांनी सोसायटीच्या आवारात एक नवे रोप लावायचे आणि रोज त्याची निगा राखायची. इतक्या गोड शिक्षेमुळे त्या लाडक्या 'दामले आजी' झाल्या होत्या मुलांच्या. गेले दोन महिने मुलांच्या सुट्ट्या असल्याने दिवसभर सगळी मुले दामले काकूंच्याच घराबाहेर चिवचिव करत असायची. पण आज ती पण चिवचिव नव्हती सकाळपासून, शाळेत गेले होते ना सगळे. मुलांशिवाय करमत नव्हतं आज काकूंना. मुलांच्या शाळेचा विचार करता करता सहज काकूंचे मन स्वतःच्याच बालपणात घेऊन गेलं. पुन्हा नव्याने छोटी नमू (म्हणजे त्याच) त्यांच्या डोळ्यापुढे तरारली. "तेव्हापासून आजतागायत शाळेचा पहिला दिवस म्हणजे न बोलणी खाता दांडी मारता येणारा हक्काचा दिवस, असा जणू अलिखित नियम आहे. कारण त्या दिवशी गेलं नाही म्हणून कोणते शिक्षक रागावले आहेत किंवा त्यांनी चौकशी केली आहे असे शालेय जीवनात कधी घडलेले कोणालाच आठवत नाही. पण शाळेच्या पहिल्या दिवशी माझी मात्र न चुकता चौकशी व्हायची, आज का आलीस म्हणून!! शाळेचा पहिला दिवस, आणि मी गेले नाही असे मला तरी कधीच आठवत नाही. अगदी बालवाडीच्या पहिल्या दिवशी सुद्धा गेले होते, ते सुद्धा न रडता !!" त्या स्वतःशीच गप्पा मारू लागल्या होत्या.
"दामले आजी..." अचानक आलेल्या चिमुरड्या हाकेने त्यांची विचारांची तंद्री मोडली. राधा आली होती. दामले काकूंची खास छोटी मैत्रीणच आहे ती ! काकूंना स्वतःचे बालपण जिच्यात तंतोतंत सापडते, ती ही राधा...कधी मूड असेल तर तिला अगदी स्वतःहून घरी येऊन गप्पा मारायच्या असतात, आणि कधी मूड नसेल तर बघायच पण नसतं. तिचा आज बालवाडीचा पहिलाच दिवस होता. आणि कालपासूनच तिची गडबड चालू होती. आपला दादा शाळेत जातो, आज आपण जाणार म्हणून भलतीच खुश होती ती ! सोसायटी मध्ये कोणाला सांगू आणि कोणाला नको असे झाले होते तिला ! दहा वाजता शाळा असावी बहुदा तिची ! साडेनऊलाच ती अगदी छान आवरून सावरून खाली येऊन उभी राहिली. छानसा गुलाबी रंगाचा फ्रॉक, त्यावर साजेसे बूट आणि सॉक्स, डोक्याला गुलाबी पट्टा आणि टुनटुन उडया मारत ती खाली आली. आणि बालपणात हरवलेल्या दामले काकूंना जोरात हाक मारून सांगितलं, "मी कुलला जातेय...." तेवढयात तिचे बाबा आले. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी कार घेतली होती. मला कार मध्येच शाळेत जायचं असा छोट्या राधाने हट्ट धरला. दामले काकूंना जरा हसूच आलं. खरं तर तिची शाळा इतकी लांब होती की कारने जायला खूप वेळ लागला असता, त्यापेक्षा लवकर ती रस्ता क्रॉस केला की पायी पायी पोहोचणार होती. त्यांनी तिला समजावले, पण बालहट्ट ! त्यापुढे कोणाचे काय चालावे ! बाबांना ऑफिसला जायला तशी तर गाडी काढायचीच होती... मग त्यांनी ती काढली, आणि गेट जवळ आणून परत लावून दिली... तरी सुद्धा किती खुश झाली राधा ! तोपर्यंत तिची आई आली तिचं दप्तर आणि डब्बा घेऊन. गळ्यात दोरीच्या बाटलीचा हार होताच राधाच्या ! तिने धावत जाऊन आईच्या हातात असणारे (रिकामे) दप्तर आपल्या पाठीवर लावून घेतले... आणि काकूंच्या घराच्या खिडकीकडे बघून मोठ्याने ओरडली.... बाय आजी....... !!
बापरे!! इतका उत्साह ! बाबा रागावले ओरडू नको म्हणून... पण राधाचं त्याकडे लक्ष कुठे होतं? एका हाताने आईचा आणि दुसऱ्या हाताने बाबाचा हात धरून ती केव्हाच धावत निघाली होती शाळेकडे जायला !! बिनओझ्याचे दप्तर आयुष्यभर पुरतील अशा निरागस, निर्व्याज्य आठवणींनी तुडुंब भरायला ! आणि नकळत दामले काकूंची स्वारीही भूतकाळात गेली आठवणी दडवून ठेवलेल्या बिनओझ्याच्या दप्तरात डोकावयाला....
*****