निनाद कुलकर्णी

भारत हा पुरुषप्रधान देश आहे असं मानतात. पण म्हणायला जरी पुरुषप्रधान असला तरीसुद्धा भारतीय पुरूषाचं आयुष्य हे आई, बहिण, बायको, मैत्रीण, आज्जी अशा नात्यांमध्ये गुंफलेलं असतं. थोडक्यात काय तर स्त्री शिवाय पुरुष हा नेहमी अपूर्ण आहे, असं ठामपणे सांगणारी आपली भारतीय संस्कृती. अगदी पौराणिक गोष्टींमध्ये सुद्धा हा मुद्दा शिव आणि शक्ती या दोन रूपकांच्या मदतीने उलगडला आहे. 'शिव' म्हणजे पुरुष तर 'शक्ती' म्हणजे स्त्री आणि ही दोन्ही तत्वं मिळून 'शिवशक्ती' बनते. यातली जर शक्ती काढून टाकली तर शक्तीविना शिव नुसताच 'शव' उरतो असं म्हणतात. यावरूनच लक्षात येईल की भारतीय संस्कृतीत स्त्रीला पुरुषाइतकंच किंबहुना जास्त महत्व आहे.

आपण रामायण-महाभारत काळाचा अभ्यास केला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे 'स्वयंवर'. आता ह्या शब्दाचा अर्थ बघितला तर स्वयंवर म्हणजेच स्वतः वर निवडणे. म्हणजेच त्या काळात स्त्रियांना आपला वर स्वतः निवडायचं स्वातंत्र्य होतं! पण आज आमचं दुर्दैव असं आहे की हुंडा, बालविवाह, इच्छेविरुद्ध लग्न असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. आपल्याकडे देवीच्या स्वरुपात स्त्रीशक्तीची पूजा केली जाते. नवरात्रात मोठा जागर होतो; पण एक गोष्ट कायम दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे देवी स्वतः हातात आयुधं घेऊन युद्धाला उतरली. तिने हे सिद्ध करून दाखवलं आहे की स्त्रियांना या जगात काहीही अशक्य नाही. पण या नवरात्राला सुद्धा भारतीय समाजाने आणि स्वतः स्त्रियांनीच केवळ साडीच्या ९ रंगांमध्ये जखडून टाकलं ! एखाद्या गोष्टीचा करमणूक म्हणून वापर सुरु झाला की त्या गोष्टीची वैचारिक महानता संपुष्टात येते..

आपल्याकडे आज एखादी महिला उच्च पदावर गेली की कुठेतरी सगळ्यांचाच भुवया उंचावतात. मग तिची एखादी साधी गोष्ट सुद्धा विशेष वाटायला लागते आणि याच कौतुकाचा भडीमार वाढणाऱ्या कर्तृत्वाची गती कुठेतरी कमी करतो की काय? अशी भीती वाटायला लागते. जोपर्यंत आपला समाजाच्या मनात स्त्रियांविषयी एक कळत नकळत भिनलेलं वैशिष्ट्य कमी करणार नाही तोपर्यंत स्त्रिया त्यांच्या १००% क्षमतेचा वापर विनासायास करू शकणार नाहीत. समाजातले बरेच लोक स्त्रियांना एखाद्या गोष्टीपासून थांबवण्यासाठी पूर्वीच्या काळची सबब सहज पुढे करतात पण खरंच आपण वैदिक कालखंड बघितला तर लक्षात येईल की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी प्रगती केली आहे. गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया असुदेत किंवा विश्वावरा, अत्रेयी सारख्या स्त्रिया ज्यांनी स्वतः यज्ञाचे आचार्य अर्थात प्रमुखपद भूषवले.

हा असा इतिहास जर दडपशाही करणाऱ्या स्त्री-पुरुषांना दाखवला तर कदाचित त्यांना आपल्या संकल्पना पुन्हा एकदा पडताळून घ्यायची गरज भासेल. बऱ्याचदा आपण सुरक्षिततेचा विचार करून महिला स्वातंत्र्यात काटकसर करतो. आज अनेक संस्था स्त्रियांना स्वरक्षणाची शिकवण देताना दिसतात. उराशी स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांनीच 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' यातली बारीकशी लक्ष्मणरेखा ध्यानात घ्यायला हवी. एका स्त्रीनेच स्त्रीचे पाय खेचणे याहून अधिक दुर्दैव कुठलंच नाही. पण पुन्हा एकदा सगळे प्रश्न येऊन थांबतात या एका मुद्द्यावर, समाजाची स्त्रीविषयी मानसिकता !   

आपल्या जन्मापासूनच कळत नकळत, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. आपल्या मनात एक पक्का संभ्रम निर्माण केला जातो किंवा होतो, तो म्हणजे स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा काहीतरी कमतरता आहे ! आणि हा समजच सगळ्या गोष्टींचं मुळ आहे. आपण कितीही कायदे काढले, शिक्षा दिल्या, लेख लिहिले तरीसुद्धा जोपर्यंत आपण या मानसिकतेत बदल करणार नाही तोपर्यंत स्त्रियांना खरी समानतेची वागणूक मिळणं शक्य वाटत नाही! कागदोपत्री समानता, अधिकार मिळेल आणि मिळाला सुद्धा; पण फक्त राजकीय खुर्चीवर नावादाखल बसलेली स्त्री आणि मागून निर्णय घेणारा तिचा पती हा ओशाळवाणा कारभार खूप काही सांगून जातो. मानसिकता पालटत नाही तोपर्यंत स्त्रीला बुजगावणं होणंच नशिबात येणार का? हा प्रश्न सतावतो आणि ही मानसिकता आपणच बदलायला हवी हा आशावाद बळावतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel