अश्विनी निवर्गी

कार्येषु दासी ,करणेशु मंत्री, भोज्येशु माता ,शयनेशु रंभा,धर्मानुकुला ,क्षमया धरित्री...

अर्थात गृहकार्यात दासी, कार्यप्रसंगी मंत्री, भोजन बनवताना माता, रती प्रसंगात रंभा ,धर्मामध्ये सानुकुल, क्षमा करताना धरित्री प्रमाणे अशी भारतीय स्त्री असते.

खरंतर स्त्री म्हणजे ईश्वराने निर्माण केलेली अप्रतिम कलाकृती. ती असंख्य भूमिका आयुष्यभर पार पाडते. या सर्व भूमिकांबरोबरच तिच्यामध्ये असंख्य गुणही आहेत. ती एक कर्तबगार व्यवस्थापक असते, सुगृहिणी असते. जितकी खंबीर असते, तितकीच हळवी असते. कमालीची सोशिक असते. जगात सर्वात जास्त वेदना ही एक स्त्री मूल जन्माला घालताना सहन करते.

वेदना मोजण्याचे एकक म्हणजे डेल म्हणजे डोलरीमीटर. एक मानव जास्तीत जास्त 45 डेल इतक्या वेदना सहन करू शकतो परंतु प्रत्येक स्त्री मूल जन्माला घालत असताना 57 डेल इतक्या वेदना सहन करते. म्हणजे एकाच वेळी वीस हाडे फ्रॅक्चर झाली तर जेवढ्या वेदना होतील, तेवढ्या वेदना प्रत्येक स्त्री प्रत्येक बाळंतपणात सहन करते.

असं असतानासुद्धा तिच्यावरील अत्याचारांचं प्रमाण वाढत चाललेले आहे. स्त्रियांच्या बाबतीत जे गुन्हे घडतात,त्या आकडेवारीप्रमाणे कौटुंबिक हिंसाचाराचे 30.9%, छेडछाड विनयभंग 21.8 टक्के, अपहरण खंडणी 17.9 टक्के आणि बलात्कार 7.9 टक्के इतके आहे.

स्त्रियांवरील अत्याचारामध्ये 2018 मध्ये 58% इतका होता तर 2019 मध्ये 62.8% इतका वाढला.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2017 मध्ये 3.59 लाख, 2018 मध्ये 3.78 लाख व 2019 मध्ये चार लाखांपेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले. 32,033 इतके बलात्कार झाले. म्हणजेच प्रत्येक दिवशी 88 बलात्कार झालेले दिसून येतात. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे या सर्व केसेस दहा टक्क्यापेक्षा कमी आहेत. जे गुन्हे नोंदवले गेले तेवढीच आकडेवारी आहे. परंतु न नोंदवल्या गेलेल्या असंख्य केसेस आहेत. याचा अर्थ वस्तुस्थिती आपल्या कल्पनेपेक्षाही अतिशय भयानक आहे. उत्तर प्रदेश व राजस्थान या खालोखाल स्त्रीवरील अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.

याची अनेक कारणे आहेत. पण त्यातले सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय समाज अत्यंत दुटप्पी व ढोंगी आहे. कारण या समाजात स्त्रियांना एक तर देवी समजले जाते, त्यांना मखरात बसवून त्यांची पूजा केली जाते किंवा त्यांना अत्यंत नीचपणाने अतिशय वाईट वागणूक दिली जाते. एक माणूस म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसितच होत नाही.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः
असे आमची भारतीय संस्कृती सांगते. ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान केला जातो तेथे देवता निवास करतात, असे म्हणत सती, सावित्री, दुर्गा, लक्ष्मीची पूजा केली जाते. लोक त्यांना देवी समजतात परंतु त्याच घरातील स्त्रियांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळते आणि समाजामध्ये स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढतच चालले आहे.

पूर्वी स्त्रिया घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत असायच्या. परंतु आता काळानुसार, जागतिकीकरणानंतर पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली आहे. टॅक्सी ड्रायव्हरपासून टॉप कंपन्यांच्या सीईओ अशी अनेक क्षेत्रे त्यांनी काबीज केली आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे स्त्रियांचा समाजाच्या विविध क्षेत्रातील वावर वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या गुन्ह्यांची संख्या आपल्यासमोर येते. जेव्हा स्त्रिया घराच्या चार भिंतीत होत्या तेंव्हाही त्यांच्यावर अत्याचार होतच होते. फक्त त्याची नोंद झालेली नव्हती.

आज आमच्या मुली सुरक्षित नाहीत. निर्भया, अंकिता, प्रियांका, मनीषा….. यादी वाढत चालली आहे. तीन महिन्यांपासून ते 80 वर्षापर्यंत कुठलीही स्त्री मादी म्हणून चालते. तिच्यावर अत्याचार करत असताना त्या नराधमांना कसलंच भान नाही.

पितृसत्ताक पद्धतीमुळे, पुरुष प्रधान संस्कृतीमुळे पुरुषी वर्चस्व छोट्या छोट्या गोष्टीतूनही दिसून येते. ज्यामध्ये कायमच पुरुषांना स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे समानतेचा तर प्रश्नच येत नाही. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मुलींची छेडछाड, लैंगिक छळ ,बलात्कार, महिलांवरील घरगुती हिंसा अशी शस्त्रे वापरली जातात. भारतात स्त्रियांच्या बाबतीत हिंसाचार वाढतच चालला आहे हे यामागचे सर्वात प्रमुख कारण आहे. आपला देश महिलांच्या बाबतीत सुरक्षित नाही ही खूप चिंताजनक बाब आहे. त्यात आपल्या न्याय व्यवस्थेविषयी काय बोलावे?

निर्भया प्रकरणाच्या वेळी एका कवीने चार ओळी लिहिल्या होत्या.

एक 70 वर्षाची म्हातारी
कोर्टात चकरा मारत होती
सतरा वर्षांची असताना
तिच्यावर बलात्कार झाला होता
त्याची केस कोर्टात चालू होती.

इतक्या धीम्या गतीने जर न्याय मिळत असेल तर स्त्रियांना त्याचा काय उपयोग आहे? न्यायाला विलंब म्हणजे अन्याय हे डोळ्यावर पट्टी बांधलेल्या आमच्या न्याय देवतेला कधी कळणार आहे ? निर्भया केसमध्ये निकाल यायला सात वर्षांचा काळ जावा लागला आणि निकाल न लागलेल्या अशा असंख्य केसेस आपल्या कोर्टात येण्याची वाट पाहत फाईलीमध्ये पडून आहेत.

पोलिस यंत्रणा सक्षम नाही. गुन्ह्याची नोंद ज्या विलक्षण वेगाने घ्यायला हवी तशी घेतली जात नाही. त्यामध्ये राजकारणापासून इतर अनेक गोष्टींचा गुंता आहे. एक तर समाजाच्या दबावामुळे बऱ्याच घटना, गुन्हे नोंदवलेच जात नाहीत. पीडित स्त्रीला कायम अपमान व सामाजिक छळाचा सामना करावा लागतो. गुन्हेगार मात्र उजळ माथ्याने समाजात मिरवत राहतो. खरंतर त्याला समाजाने कठोर शिक्षा द्यायला हवी. त्याच्याशी वागत असताना अशा पद्धतीने वागले पाहिजे की हा गुन्हेगार आहे. तरच त्याला गुन्हा करताना भीती वाटेल. न्यायव्यवस्थेची, पोलिसांची भीती आता गुन्हेगारांना वाटेनाशी झाली आहे.

स्त्रियांच्या बाबतीत परिस्थिती भयानक आहे आणि हे वादळ आता आपल्या दाराशी येऊन थांबले आहे. सकाळी घरातून बाहेर पडलेली स्त्री सुरक्षितपणे घरी परत येईल याची कुठलीही खात्री देता येत नाही. मुलीला जन्माला घालण्यापासूनच तिच्या व्यथांना सुरुवात होते. तिची कथा ऐकण्याची गरज कुणालाच वाटत नाही. वंशाचा दिवा म्हणजे मुलगा. तो जन्माला घालते ती स्त्री. परंतु तिला आपल्या पोटी मुलगी जन्माला यावी असे अजिबात वाटत नाही. त्याचे एक कारण म्हणजे मुलगी म्हणजे उरावरचा धोंडा, पदरातला विस्तव अशी मानसिकता समाजात खोलवर रुजलेली आहे. खरंतर शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करणाऱ्या कर्तबगार महिलांची संख्या समाजात वाढत चालली आहे आणि त्याही हिरीरीने पुढे येऊन आपल्या संसारासोबत आई-वडिलांची जबाबदारी ही उचलत आहेत. परंतु छळ स्त्रीनेच सहन करावा आणि सोशिक असावे आणि सासरी गेल्यानंतर तिची तिरडीच बाहेर पडावी. त्याच्याआधी तिने कुठेही येऊ नये, माहेरचा आधार मागू नये, अशी काहीतरी विचित्र मानसिकता समाजात रुजलेली आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुली बऱ्याच गोष्टी करू शकत नाहीत.
यावर उपाययोजना करायची म्हणजे महिलांची संख्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वाढायला हवी.

आपल्या भारतीय समाजातील पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे आणि याची सर्वात मोठी जबाबदारी ही स्त्रियांवरच आहे. कारण मुलीला बँकेचे व्यवहार शिकवले जातात, तांत्रिक गोष्टी शिकवल्या जातात, स्वयंपाक शिकवला जातो, त्याचप्रमाणे मुलालाही उत्तम संस्कार करून मनावर ठसवले पाहिजे की स्त्री ही उपभोगाची वस्तू नाही, तिला सन्मान व आदर द्यायला हवा, हे त्याच्या मनावर अगदी लहानपणापासून बिंबवले पाहिजे.

फक्त पुरुषांची मानसिकता नाहीतर स्त्रियांची स्वतःकडे बघण्याची मानसिकतासुद्धा बदलली पाहिजे. अनेक गोष्टी या फक्त स्त्रियांनीच केल्या पाहिजेत असे खुद्द स्त्रियांचेच समज असतात. आपल्या हक्कांसाठी उभे रहायला त्यांना शिकवले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे गुलामाला आपण गुलाम आहोत याची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआपच बंड करून उठेल. अन्याय निमूटपणे सहन करणारा हा अन्याय करणाऱ्या इतकाच दोषी असतो हे मुलींना लहानपणापासून कळलं पाहिजे.

मुलींना अगदी लहान वयापासून स्वसंरक्षणाचे धडे जाणीवपूर्वक दिले पाहिजेत. त्याचबरोबर गुन्हे कसे घडतात? या परिस्थितीत काय करावे? मदत कशी मागावी? आधुनिक तंत्रज्ञानानुसार कोणते अॅप वापरावे हे शिकवले पाहिजे. स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य, निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. ऑफिसमध्ये उच्च पदावर काम करणारी स्त्री ऑफिसचे मोठे मोठे निर्णय सहजपणे घेते, परंतु घरातल्या कोणत्याही निर्णयात मात्र तिला सहभागी करून घेतलं जात नाही. आर्थिक बाबतीत तेच घडत आहे. स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पैशातील किती पैसा त्या स्वतःच्या मनाने खर्च करू शकतात हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होईल. आर्थिक साक्षरता स्त्रियांमध्ये जाणीवपूर्वक रुजवली पाहिजे. गुन्हा घडल्यानंतर ताबडतोब पोलिसांची मदत मागितली पाहिजे आणि अशावेळी केला जाणारा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर त्याचा निकाल लागायला हवा.

स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे . परंतु नुसतेच कठोर कायदे करून काही उपयोग नाही तर त्यांची अंमलबजावणी सुद्धा योग्य पद्धतीने व्हायला हवी.

स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांना स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे. त्यामुळे आयुष्यात कोणतीही वाईट घटना घडली तर तिच्या विरोधात स्वतःच्या बळावर सक्षमपणे तिला उभे राहता आले पाहिजे. एवढी ताकद तिच्या मनगटात निर्माण करणे हे आईवडिलांचे प्रथम कर्तव्य असायला हवे. दुर्गादेवी हे स्त्रीचे विराट रूप आहे. अष्टभुजा देवीची आपण पूजा करतो. स्त्रिया आपल्या दोन हातांनी त्या आठ हातांइतकं काम करतात. परंतु त्यांना नुसता देवीचा दर्जा देऊन काही उपयोग नाही. त्यापेक्षा एक माणूस म्हणून तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला तर खऱ्या अर्थाने समाज बदलेल आणि याची जबाबदारी स्त्री आणि पुरुष दोघांचीही आहे .

वपुर्झामध्ये व. पु. काळे असे म्हणतात की काही पुरुषांना ते केवळ जन्माला पुरुष आहेत एवढाच पुरुषार्थ जन्मभर पुरतो. परंतु केवळ जन्मानं पुरुष असणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे तर पुरुषार्थ म्हणजे अर्थ असलेला पुरुष आणि पुरुषाच्या जीवनाला हा अर्थ येण्यासाठी त्यांनी फार मोठं भव्यदिव्य कार्य केलं पाहिजे असं मुळीच नाही. आपल्या जोडीदाराला सुरेख साथ देणे, तिच्यावर अमाप माया करणं आणि तिला आपली साथ सोडावीशी न वाटेल इतके प्रेम तिच्यावर करणं म्हणजे पुरुषार्थ. असे पुरुष, पुरुष या शब्दाला अर्थाची जोड देतात. हिरकणी योगायोगानं मिळते. ती टिकवायची असते हे ज्यांना कळते ते खरे पुरुष. पुरुषार्थाची ही कल्पना घराघरात जेव्हा रुजेल तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्रियांना माणूस म्हणून जगता येईल. जेंव्हा दृष्टिकोन बदलेल तेंव्हा समाज आपोआप बदलेल. तो सुदिन लवकर यावा हीच सदिच्छा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel