सायली संजय कुलकर्णी
"नमस्कार तात्या"
" राम राम "
"मी समीर सळगावकर, इंजिनीयर आहे. या गावच्या प्लांटवर माझी नियुक्ती करण्यात आली आहे."
" नमस्कार साहेब ,स्वागत आहे आमच्या गावात तुमचं. काय सेवा करू तुमची ?"
"मला फक्त हा बंगला कुठे आहे तेवढे सांगा. "
"हा सांगतो की कुठला दावा ".
"आबा.... बाबा... साहेब अहो ह्या बंगल्यात रहायला तुम्हाला कोणी सांगितलं?"
"आमच्या सरांनी माझी व्यवस्था तिकडे केली आहे ."
"आवं साहेब जाऊ नका तिकडं. आव भूत बंगला हाय त्यो. तिकडं कुणी बी जात न्हायी. एका बाईच्या ओरडण्याचे सारखे आवाज येत राहतेत तिकडनं. लय डेंजर आहे. तुमी बी जाऊ नका."
"अहो नाही तात्या भूत बित काही नसतं. सगळी अंधश्रद्धा आहे."
"तुम्हा शहरातल्या पोरांचा नसल बी भूतावर इस्वास. पर आमचा हाय. म्हणून सांगतो नका जाऊ."
"नाही. काही नाही होत मला .तुम्ही फक्त सांगा कुठे आहे ते?"
"सांगतो मी. मला काय आता... माझं काम केलं मी तुम्हाला सांगायचं, तरी बी तुमाला जायाचं तर जावा .हितंन सरळ जावा .पुढं वडाचे झाड येईल. तिथून डाव्या हाताला वळा .तिथून थोडे चालत गेलं की तिथ एक नारळाचे झाड हाय .त्याच्या म्होरंच हाय त्यो बंगला ."
"ठीक आहे. जातो मी. धन्यवाद तुमचे."
असं म्हणून समीर त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेला. रात्रीचे आठ वाजले होते. त्यामुळे गावात सगळीकडे अंधारच होता. थंडीचे दिवस असल्यामुळे गारठाही खूप होता. तिथे पोहोचल्यावर बघतो तर काय, खरंच एखाद्या पिक्चर मध्ये किंवा पुस्तकात भूत बंगल्याविषयी जसं वर्णन असतं अगदी तसंच तिथे होतं. बाहेर सगळा पालापाचोळा पडला होता. कित्येक दिवस तो झाडलाही गेलेला नव्हता. दरवाजा तर उघडता उघडत नव्हता. थंडीने जाम झाला होता. कसाबसा उघडून समीर आत गेला .दिवे तर बंद होते. दार उघडले की किर्र... पक्षी बाहेर आले. क्षणभर तर खरंच त्याला भीती वाटली .पण बरेच दिवसांपासून घर बंद आहे म्हणून अशी हालत झाली आहे, हे कोणालाही कळत होतं. तिथलं सगळं बघून त्याच्या मनात एक विचार आला .काय ही गावातली लोक? खरंच काहीही विचार करतात आणि कशावरही विश्वास ठेवतात .
मोबाईलच्या बॅटरीत चाचपडत चाचपडत तो एकेक पाऊल टाकत होता आणि लाईट लावण्यासाठी स्विच बोर्ड शोधत होता. एका कोपऱ्याला त्याला बोर्ड दिसला. त्याच्या दिशेने जात असताना त्याचा पाय कशाला तरी अडखळला आणि तो खाली पडला. त्याला कळलंच नाही नेमका त्याचा पाय कशाला लागला. स्वतःला सावरून तो उठला आणि त्याने लाईट लावला आणि बाहेर ठेवलेलं सामान आणण्यासाठी मागे वळाला. इतक्यात त्याची नजर खाली गेली. खाली बघतो तर काय एक स्त्री कृश होऊन खाली पडली होती. ते बघता क्षणी त्याच्या जिवाचा थरकाप झाला .हृदयाचे ठोके अधिक वेगाने चालू झाले. त्याच्या तोंडातून आवाज फुटेना. त्याला दरदरून घाम फुटला.भूत भूत भूत असा तो मोठ्याने ओरडू लागला. पण आसपास कोणीही नसल्यामुळे त्याची हाक कोणाला गेलीच नाही .
इतक्यात ती खालची बाई त्याला म्हणाली , "घाबरू नको. मी भूत नाही. मी एक जिवंत बाई आहे."
हे ऐकून तो जरा शांत झाला .
"मग मग तुम्ही कोण ?" त्याने घाबरतच विचारलं.
"सांगते .तुझ्याकडे थोड पाणी आहे का?"
"हो आहे. देतो ".
त्याने त्याच्या बॅग मधून पाण्याची बॉटल काढली आणि त्या बाईला दिली. तिने अख्खी पाण्याची बाटली गटागटा संपवून टाकली आणि एक मोठा श्वास घेऊन, डोळे मिटून दोन मिनिटं शांत बसली. मग तिचे लक्ष त्याच्या बॅगमध्ये शेजारच्या कप्प्यात असलेल्या बिस्कीट पुड्याकडे गेले. ती आशाळभूत नजरेने त्या पुड्याकडे सारखी पाहत होती. हे समीरच्या लक्षात आले आणि त्याने तो बिस्किट पुडा काढून तिच्या हातात दिला. तो घेतल्याबरोबरच तिने पटकन फोडून लगेच खायला सुरुवात केली. ती खात असताना समीर तिचे निरीक्षण करत होता .केसांचा विचित्र अवतार, डोळ्याखाली प्रचंड काळं, वाढलेले नखं ,नुसते लाल सुजलेले डोळे आणि कृश झालेलं शरीर. हे बघून त्याला इतकं लक्षात आलं होतं की त्या बाईला खूप दिवसांपासून जास्त काही खायला-प्यायला मिळालेलं नव्हतं .
मग समीरने विचारायला सुरुवात केली.
" तुम्ही इथे कशा काय? तुम्ही कोण?"
त्या बाईने समीरकडे हळूवार कटाक्ष टाकला आणि त्याला म्हणाली ,
"मी कविता हे आमचंच फार्महाऊस आहे."
हे ऐकून समीरला धक्काच बसला.
" पण मग तुम्ही ह्या अशा, इथे कस काय ?"
"सांगते सगळे सांगते. मी कविता. माझं लग्न शेजारच्याच गावात झालं. सुरुवातीला घरचे सगळे चांगले होते. माझा नवराही बँकेत नोकरी करत होता. आधी तो ही खूप चांगला वागत होता. आमचा सगळा संसार सुरळीत छान आणि अगदी आनंदात चालू होता. पण नंतर नंतर(माझा नवरा) त्याचं वागणं बदलत चाललं होतं. प्रत्येक वेळेला चिडचिड, शिवीगाळ, अर्वाच्च बोलणं. कशात माझं मत विचारात घेणे, माझी मर्जी सांभाळणं हे दूरच पण मी साधही काही बोललेलं त्याला आवडत नव्हतं. त्याच्यासमोर एक शब्दही मी बोलू नये असे त्याला वाटू लागलं. मी थोडेही काही बोलले की लगेच त्याचा राग, चिडचिड चालूच व्हायची. एकदा-दोनदा तर त्याने मला मारले सुद्धा.
मी काही दिवस सहन केलं. पण आपल्याकडे बरेच जण म्हणतात की नवऱ्याचं काय सहन करायचं ,आपण सहन करतो म्हणून त्यांच जास्त चालतं. आपण त्याच्या अन्यायाविरोधात आवाज उठवलाच पाहिजे .मला वाटलं कदाचित मी ही असंच केल्यावर तोही शांत होईल. म्हणून एकदा तो खूप चिडलेला असताना मी त्याला म्हणलं ,"तू जर असाच वागत राहिला तर मी कायमस्वरूपी तुला सोडून माहेरी जाईल आणि पोलिसात तुझी तक्रार ही करेल. ते ऐकून त्याचा अहंकार जागृत झाला. तो प्रचंड चिडला. त्याने मला अक्षरशः रक्त येईपर्यंत मारले. प्रचंड मारामुळे मी बेशुद्ध झाले. पुढचे मला काहीच आठवत नाही.
दुसऱ्या दिवशी बघते तर काय मी येथेच येऊन पडले होते. खूप ओरडले, खूप आवाज दिले पण कोणीच माझ्या मदतीला आले नाही .सगळ्यांना वाटलं हा भूत बंगला आहे आणि भुताचे आवाज येत आहेत. त्यांची तरी काय चूक? माझ्या नवऱ्याने सगळ्या गावात पसरवलं की हा भूत बंगला आहे कारण माझ्या कोणीच मदतीला येऊ नये आणि मी तशीच रडत बसले कुणीतरी येईल या आशेवर.
पाच दिवसांनी तो (माझा नवरा) आला. त्यादिवशीही त्याने मला खूप मारले. माझ्यासमोर माझ्या आई-वडिलांना फोन करून सांगितले की तुमच्या मुलीचं दुसऱ्या कोणासोबत तरी अफेअर होतं आणि त्याच्या सोबत पळून गेली. मी खुप रडले, ओरडले. त्याच्या विनवण्या केल्या. पण त्याने काहीच ऐकलं नाही आणि मला तसाच सोडून गेला. कारण त्यादिवशी मी फक्त एकदा त्याच्यासमोर मोठ्याने बोलले होते .
त्या दिवसापासून आजपर्यंत मी इथेच आहे. इथे माझ्या मदतीला कोणीही आले नाही. कोणाला माहितीच नाही की मी इथे आहे.
सगळ्यांना म्हणायला सोपे असते की आवाज उठवा. तुमच्या विरोधात अन्यायावर बोला पण केल्यावर त्याचे परिणाम असे होतील हे माहिती असतं तर मी तिथेच आणि तशीच बरी होते. माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया असतील ज्यांना आज देखील (सुशिक्षित असून देखील )अशा त्रासाला सामोरे जावे जावं लागतं. मला नेहमी असं वाटतं की स्त्रियांसाठी कायदे करून उपयोग नाही. त्यांना कुठलेही प्रशिक्षण देऊन उपयोग नाही. त्यापेक्षा मुलांना कसं वागायचं हे शिकवलं पाहिजे. स्त्रियांचा सन्मान कसा करायचा हे त्यांना शिकवलं पाहिजे. सन्मान तर सोडा, बायकोच्या डोळ्यात पाणी येणार नाही इतके जरी नवऱ्याने सांभाळलं तरी खूप झालं. इतकं बोलून ती धाय मोकलून रडू लागली आणि समीर जागेवर सुन्न होऊन बसून राहिला.