बारिसाल म्हणून बंगालमध्यें प्रसिध्द जिल्हा आहे. एकदां त्या जिल्हयातील हिंदुमुसलमान शतकरी हजारोंच्या संख्येनें तगाई मागण्यासाठी सरकारकडे निघाले. वाटेंत मुस्लीम लीगचे लोक आले. ते मुसलमानांस म्हणाले, '' हिंदुबरोबर तुम्ही कां जाता? '' हिंदुमहासभेचे लोक आले व हिंदूंस म्हणाले, '' त्या मुसलमानांबरोबर तुम्ही कां जाता? '' परंतु ते हिंदुमुसलमान शेतकरी म्हणाले, '' आम्ही हिंदु नाहीं, आम्ही मुसलमान नाहीं, आम्ही श्रमजीव आहोंत. आणि हिंदु असो, मुसलमान असो; जमीनदार आम्हांला पिळून काढीत आहेत. '' जा तुम्ही. धर्माच्या नांवानें कांही दिवस जनता भुलेल, परंतु ती एक दिवस शहाणी झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि गुंड म्हणजे मुसलमानच असतात असें नाहीं. छळणारे सारे गुंडच. हिंसा नानाप्रकारे जगांत चालू आहे. कोणी तरवारीनें मान कापतो, कोणी लेखणींनें कापतो. कोणी एकदम गोळी घालतो, कोणी तीळतीळ मारतो. आपणांस प्रत्यक्ष सोटयाची, प्रत्यक्ष सु-या-खंजिरांची हिंसा दिसते. परंतु ती हिंसा इतर अप्रत्यक्ष हिंसेच्या मानानें अल्प आहे. कोटयवधि कुटुंबात सुख नाहीं, अन्न नाहीं, वस्त्र नाहीं, औषध नाहीं, ज्ञान नाही, अंथरूण नाहीं, पांघरूण नाहीं, घरदार नाहीं, हे विराट दु:ख का मुसलमान गुंडांनीं निर्माण केले आहे? श्रमणा-या जनतेची जगभर चालणारी विटंबना कोणी केली, कोणी चालविली? वसंता.... तूं ही जगभर चालणारी विटंबना पहा. हिंदुस्थानातील गरिबांची विटंबना जगतांत सर्वत्र चाललेल्या गरिबांच्या विटंबनेशीं जोडलेली आहे, हें ध्यानात धर.
एखादा आडदांड मनुष्य रस्त्यांत जर जाणारा-येणा-यांस कोपरखळी मारूं लागला तर आपण त्याला गुंड म्हणतों. त्याला कदाचित् तुरुंगांतहि पाठवूं. मग पैशाच्या नांवावर, पैशावर आधारावर गरिबांना जे छळतात, त्यांना कां तुरुंगांत पाठवूं नये? शारीरिक शत्त्कीचादुरुपयोग करणारा ज्याप्रमाणे गुंड व पुंड ठरतो, त्याप्रमाणें आर्थिक सत्तेचा दुरुपयोग करणाराहि गुंड व पुंड समजला गेला पाहिजे. परंतु ही आर्थिक पुंडगिरी अद्याप जगाला, भोळया जनतेला कळायची आहे.
हिंदुस्थानांत जे कांही मुसलमानांचे अत्याचार होत असतील, त्यापेक्षां हे सत्ता व मत्तावाल्यांचे अत्याचार सहस्त्रपटीनें सर्वत्र होत आहेत. काँग्रेस हळूहळूं का होईना, या अत्याचारांस आळा घालण्यासाठी झटत आहे. आणि म्हणूनच तिच्यावर सर्व श्रेष्ठांचा व वरिष्ठांचा राग आहे. मुस्लिम लीगचा व हिंदुमहासभावाल्यांचा दोघांचा राग काँग्रेसवर आहे. कारण ती हळूहळू परंतु निश्चितपणें सर्व गरिबांची बाजू घेऊन उठणार आहे. मग छत्रीचे नबाब व हिंदुनबाब दोघे तिच्याविरुध्द ओरडणार नाहींत तरच आश्चर्य. हिंदु रावराजे व मुस्लिम नबाबजादे सारे गरीबांची बाजू घेणा-या काँग्रेसवर उठतील.