अल्फासोबत राहून मी आयुष्यात कधी कल्पनाही करणार नाही, असे अनुभव गेल्या आठ-दहा महिन्यात घेतले होते. आजचा शवागार पाहण्याचा अनुभव हा त्याच यादीतला पुढचा!! सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील बाजूस हा विभाग होता. आम्ही देसाईंचे नाव सांगताच आम्हाला आत जाण्यास परवानगी मिळाली. सोबत तिथला ऑपरेटर होता. आत शिरताच मला माझे रक्त गोठते की काय असे क्षणभर वाटून गेले. तेथील थंड वातावरण, मरणप्राय शांतता आणि हवेतील उदासीनता तेथे असलेल्या मृत शरीरांच्या अस्तित्वाची जाणीवच करून देत होते. तेथे मोठी कपाटे होती, ज्यांमध्ये अतिशीत तापमानात मृत शरीरे निपचित पडली होती. ऑपरेटरने आम्ही सांगितलेल्या व्यक्तीचा ड्रॉवर नंबर पाहिला आणि त्या कपाटाच्या दिशेने आम्हाला तो घेऊन गेला. मी सबंध वेळ जीव मुठीत धरूनच होतो. त्याने त्या कपाटाच्या कप्पा सरकवला. आतमधील बॉडी बाहेर आली आणि त्यासोबत तेथे वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा उग्र वास आमच्या नाकात शिरला. अल्फाने त्या बॉडीवर झाकलेले कापड हटवायला सांगितले. ऑपरेटरने तसे करताच मला तो ओळखीचा चेहरा दिसला.

त्याचा चेहरा भावहीन होता. शरीर निश्चल होते. अल्फाने त्याला पाहताच हातात हँडग्लोव्हज घातले आणि तो त्या शरीराची बारकाईने तपासणी करू लागला त्याने पायांपासून सुरूवात केली. तळवे, मग पायांची नखे, मग पोटरी, गुडघे. काही उपयोगी किंवा सूचक दिसले, की तो फोटो काढत होता. हातांच्या मनगटाचे आणि चेहऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी त्याने बराच वेळ घेतला, असे मला जाणवले. मला तेथून कधी एकदा निघतो असे झाले होते. दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अल्फा म्हणाला,

"ठिकाय. आपण आता निघूया."

त्याने त्या ऑपरेटरचे आभार मानले. बाहेर आल्यानंतर त्या विभागाचे इन-चार्ज असणाऱ्या डॉक्टरांशी दहा मिनिटे चर्चा केली आणि अखेर आम्ही बाहेरच्या लख्ख सूर्यप्रकाशात येऊन दाखल झालो. अल्फाचा चेहरा फारसा आशावादी दिसत नव्हता.

"कठीण आहे." तो म्हणाला, " बाह्य अंगावर शून्य निशाण आहेत."

मला त्या निशाण नसण्याच्या दुःखापेक्षा शवागारातून बाहेर पडल्याचे सुख जास्त महत्त्वाचे वाटत होते. पण अल्फाचा चेहरा पाहून मला राहवले नाही.

"तुला कोणते निशाण अपेक्षित होते?" मी विचारले.

 "मला त्याच्या मनगटावर किंवा चेहऱ्यावर एखादा ओरखडा जरी दिसला असता ना, तर मी आत्ता भलताच खूश असतो. या माणसाचा खून झालाय असं आपण म्हणतोय, तर त्याला पाण्यात टाकण्याआधी त्याला कोणीतरी धरलं असणार. ओरडू नये म्हणून तोंड दाबलं असणार. हात एकतर बांधले असणार किंवा पकडून ठेवले असणार. मग या सगळ्या उद्योगांत एखादी तरी खूण अंगावर बाकी रहायला हवी होती. हो ना?? पण महाशय अगदी कोरे करकरीत आहेत.

"मग?? आता?? " मी स्वाभाविकपणे विचारले.

"सगळंच थोडं गोंधळात पाडणारं आहे. " अल्फा चिंताग्रस्त चेहऱ्याने म्हणाला, " देसाईंसमोर आपण मोठ्या मोठ्या बाता करून आलोय खरं.. पण यातून काहीच मिळालं नाही, तर चांगलंच तोंडावर पडू आपण. मला खात्री आहे, की त्याचा निश्चितपणे खून झालेला आहे. पण हे पक्के करणारे पुरावेही पुरेशा प्रमाणात आपल्याला मिळायला हवेत. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग - ही घटना जेथे घडली, ते ठिकाण. एखाद्या रहस्याचा उलगडा करण्यात नव्वद टक्के याचा वाटा असतो. कारण गुन्हेगार सोडता गुन्ह्याचे तेच एक जिवंत साक्षीदार असते. तर, आता आपले इष्टस्थळ - काळ्या खणीचे तळे!! "

"ओकेऽऽ.. चलो काळ्या खणीचे तळे!! " मी जोरात किक मारली आणि मग आम्ही तेथून सुटलो.

 

खण हा तळ्यासाठी वापरला जाणारा स्थानिक शब्द. काळी खण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एक विस्तीर्ण असे साधारण अर्धा किलोमीटर व्यासाचे तळे होते. त्याला खण एवढ्यासाठी म्हणायचे, की ते दुर्लक्षित आणि कुप्रसिद्ध असे तळे होते. त्या तळ्याचा भोवतालचा भाग काटेरी झुडुपांनी व्यापला होता. आजुबाजुच्या वस्तीमधील सांडपाणी त्या तळ्यात येऊन मिसळत होते. त्या तळ्याच्या स्थिर पाण्याकडे पाहताना एक उदास अशी भावना मनात उत्पन्न होत होती. आम्ही जेव्हा त्या खणीपाशी उतरलो आणि मी दुरून त्या ठिकाणावरून नजर टाकली, त्यावेळी माझ्या मनात विचार येऊन गेला - याच्याकडे थोडे लक्ष दिले आणि काम केले, तर हे तळे निश्चितच शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल!!

अल्फा गाडीवरून उतरला आणि पाण्याच्या दिशेने चालू लागला. मुख्य रस्ता सोडून काही अंतरापर्यंत मातीची जमिन होती आणि मग तळ्याकडे उतार सुरू होत होता. या उताराला झाडा-झुडुपांनी आच्छादून टाकले होते. मध्ये मध्ये काही दगडधोंडेही होते. उताराच्या अखेरीस तळ्याचे पाणी सुरू होत होते. मीही सावकाशपणे अल्फाच्या पाठोपाठ निघालो आणि उताराच्या वरच्या टोकाला येऊन पोहोचलो. पोलिसांकडून आम्ही जिथे प्रेत मिळाले, ते ठिकाण जाणून घेतले होते.

"बाभळीचे मोठे झाड असेच सांगितले ना त्यांनी?? " अल्फा एका जागी थबकून म्हणाला. आमच्या समोर बाभळीचे बऱ्यापैकी मोठे असे झाड होते. आजुबाजुला छोटीमोठी झुडपे होती. त्या झाडालगतच खाली झुडुपांमधून पाण्याकडे उतरून जाण्यासाठी पायवाट होती.

"इथून त्याची बॉडी बाहेर काढली होती त्यांनी. " अल्फा म्हणाला, " आता आपण गृहीत धरलंय की त्याने आत्महत्या केलेली नाही. म्हणजे साहजिकच त्याला कोणीतरी तळ्यात फेकून दिलेलं असलं पाहिजे. हे जे फेकण्याचे ठिकाण आहे, तेच आपल्याला शोधून काढायचं आहे. मला खात्री आहे, की तिथे काही ना काही नक्की मिळेल. "

अल्फा अज्ञात खाणाखुणांचा मागोवा घेत सगळीकडे फिरू लागला. मी नुसताच त्याच्याकडे पाहात उभा राहिलो. रस्त्याच्या कडेला जमिनीवर बरेच टायर्सचे निशाण होते. अल्फाने तिकडे दुर्लक्ष केले आणि झुडुपांवर लक्ष केंद्रित केले. कालपासून बऱ्याच गाड्या तिथे येऊन गेल्या असल्यामुळे टायर्सच्या निशाणांकडून फारशी अपेक्षा नव्हती. अल्फा बाभळीच्या झाडापासून हळूहळू खाली उतरला. त्याची नजर बाजुच्या उतारावरील दगडधोंड्यांवर होती. आमच्या पायाखालील झुडुपे बऱ्याच प्रमाणात तुडवली गेली होती आणि दगड जागेवरून सरकले होते. अर्थातच मृतदेह पाण्यातून काढताना लोकांची ये जा तेथून झाली असणार होती.

त्याने आपला मोर्चा आजुबाजुच्या झाडीवर वळवला.

"माझ्या बरोब्बर मागे ये. इकडेतिकडे अजिबात जाऊ नकोस. माझ्या पावलांवर पाऊल. समजलं??"

त्याने मागे न पाहताच मला बजावले. मी चूपचाप मान डोलावली. तो वाट सोडून अलगदपणे झाडांत शिरला. त्याने आपले भिंग काढले आणि तो जवळपास खालीच बसला. खुरट्या झाडांची पाने आणि दगड यांना अगदी नाक टेकेल इतक्या अंतरावरून न्याहाळू लागला. या ठिकाणी कोणी आले गेले असल्यास त्याच्या खुणा मिळणे बरेच सोपे होते. कारण अशा काट्याकुट्यांच्या आणि त्यात चांगलाच तिरका असणाऱ्या उतारावर फार कोणी येत असावं, असं मला वाटत नव्हतं. त्यामुळे खुणा पुसून जाण्याची शक्यता खचितच नव्हती.

अल्फा बराच वेळ शोधत राहीला. मीही माझ्या सुमार नजरेतून काही सुगावे सापडतायत का, ते पाहत राहिलो. काही वेळ जाताच एकदम अल्फाचा आवाज आला - "थांब!!"

"काय झालं?" मी दचकलोच.

"हलू नकोस जागचा.. आहेस तिथेच थांब." तो ओरडला. दबक्या पावलांनी पुढे जाऊन तो थेट गुडघ्यांवर बसला. त्याने तेथे खाली काहीतरी निरखून पाहण्यासाठी खूप वेळ डोके घातले. मग तसेच गुडघ्यावर रांगत आजुबाजुची जागा तपासली. दगड सरकवून पाहिले. फोटो घेतले. तसाच तो खाली तळ्याकाठी गेला. तिथेही काही फोटो घेऊन आला. मग विरुद्ध दिशेने वर गेला. मी आपला आज्ञाधारक मुलासारखा एकाच जागी खिळून उभा होतो. उगाच आगाऊपणा केला आणि महत्त्वाचे निशाण मिटवले, तर अल्फाच्या शिव्या खाव्या लागल्या असत्या. म्हणून मी त्याचे मन भरेपर्यंत तसाच पोझ दिल्यासारखा उभा राहिलो. अखेर वरून अल्फाने मला हाक मारली,  "प्रभू, ये वरती. आणि हो, येताना दगडांवर पाय ठेवत ये. जमिनीवर काटे आहेत."

"हो." मी तोल सांभाळत वरती चढून आलो.

"गुऽऽड!!" तो उत्साहाने म्हणाला, " आता एक काम कर. गाडीपाशी जाऊन उभा रहा. मी आलोच."

त्याच्या अचानक बदललेल्या वागण्याचा अर्थ मला ठाऊक होता. त्याला काहीतरी जबरदस्त असा पुरावा मिळाला होता.

दोन मिनिटांत तो पुन्हा वर आला. मी त्याच्या प्रज्वलित चेहऱ्याकडे पाहत विचारले,

"काय शेरलॉक होम्स.. आजच संपवून टाकताय की काय हे प्रकरण?? "

तो हसला.

"छे रे!! अजून तर बराच दूर आहे मी या प्रकरणाच्या निकालापासून. पण आता आपण देसाईंसमोर तोंडावर पडणार नाही, असे तरी निदान मी ठामपणे म्हणू शकतो." अल्फा म्हणाला, "त्या वेड्याचा खूनच झालाय प्रभू."

त्याने मोठा श्वास घेतला. तळ्यावरून येणारी वाऱ्याची झुळूक आमच्या अंगांवर आदळली आणि त्याचबरोबर तेथील झाडांच्या पानांचा सळसळाट झाला.

"आणि हा खून घिसाडघाईने नाही, तर अतिशय थंड डोक्याने झालेला आहे. "

माझे मन सुन्न झाले होते. क्षणभर मला ते बोलणे स्विकारता आले नाही. त्या वेड्याचा भेदरलेला चेहरा माझ्या समोर आला. त्याचा थंड डोक्याने, अतिशय काळजीपूर्वक खून करण्यात यावा, इतके काय मोठे गुपित त्याला ठाऊक होते??

"तिकडे खाली उतारावर तुला काय मिळालंय? "मी अल्फाला विचारले.

"या ठिकाणावर आपल्याला प्राथमिक अंदाज बांधता येतील इतके तरी धागेदोरे मिळाले आहेत. त्याबद्दल मी तुला घरी गेल्यावर खुलासेवार सांगतो. आधी आपण आपल्या रूमवर जाऊया. जेवणाचा डबा मेसवरून घेऊन जाऊ, म्हणजे आपल्याला रूमवर जेवता जेवता निवांत बोलता येईल. तेथून मला पुढच्या मोहीमेवर जायचे आहे, जिकडे तू येण्याची गरज नाही. आता एक दोन दिवस भरपूर काम करावे लागणार आहे, असं दिसतंय. "

मला अल्फाचे अप्रूप वाटले. कोण होता तो वेडा आमच्यासाठी?? फक्त पाच मिनिटे, तेही अपघातानेच भेटलेला एक अनोळखी मनुष्य. पण त्याच्या मृत्यूचे कोडे उलगडण्यासाठी अल्फा स्वतःला झोकून देण्याची तयारी दाखवत होता. आजकाल लोक ओळखीच्या, जवळच्या लोकांसाठीही काही करत नाहीत. आणि इथे माझा मित्र एका अनोळखी व्यक्तीला न्याय मिळवून द्यायला निघाला होता. मला त्याचे कौतुक वाटले आणि अभिमानही वाटला. मी त्याच्याकडे पाहून हसलो.

"मला खात्री आहे, तुला यात लवकरात लवकर यश मिळेल." मी म्हणालो. त्याने मान तुकवून माझे आभार मानले. आम्ही आमच्या उसन्या गाडीवर स्वार झालो आणि रूमकडे निघालो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel