उन्हाचा ताव खूपच वाढला होता. डबा घेऊन घरी येईपर्यंत आम्ही घामाने पुरते चिंब झालो होतो. रूमवर येऊन जेव्हा फॅनखाली पाच मिनिटे बसलो, तेव्हा आम्हाला स्वर्गसुख मिळाल्याचा भास झाला. थोडं फ्रेश होऊन आम्ही आमचे डबे उघडले आणि जेवणावर तुटून पडलो. जेवणाबद्दल मी एक मत बनवून ठेवलं आहे - जेवण चवदार किंवा बेचव असा काही प्रकार नसतो. असते ती तुमची भूक!! भूक नसेल, तर मिष्टान्नही तुम्हाला जाणार नाही आणि खूप भूक असेल, तर भाजी भाकरीतदेखील तुम्हाला पंचपक्वान्ने दिसतील!!
थोडा वेळ खाल्ल्यानंतर आमची भूक थोडी शमली आणि मग अल्फाने बोलण्यास सुरूवात केली,
"तुला मी एक एक गोष्ट क्रमवार सांगतो, म्हणजे माझ्या विचारशृंखलेमध्येही थोडी सुसूत्रता येईल."तो म्हणाला, "तो मनुष्य गुरुवारच्या रात्री आपल्याला भेटला आणि शनिवारी रात्री उशिरा त्याची बॉडी पाण्यावर तरंगताना आढळून आली. बुडालेल्या देहाला पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यासाठी साधारणपणे एक ते दीड दिवस लागतो. याचा अर्थ त्या व्यक्तीला शुक्रवारी रात्री पाण्यात बुडवून मारण्यात आले असावे. मधला वेळ तो कुठे होता, हे आपल्याला त्याच्या चपलांवरून निश्चितपणे सांगता आले असते ; पण त्या पाण्यात भिजल्यामुळे बहुतांश खुणा पुसल्या गेल्या आहेत. पण जितक्या खुणा बाकी आहेत, त्यावरून थोडाफार अंदाज आपण नक्कीच लावू शकतो. हे फोटो पहा. "
त्याने त्याच्या मोबाईलवर काढलेले फोटो मला दाखवले.
"यांच्या तळव्यावर थोडंसं घट्ट झालेलं सिमेंट लागलं आहे. जेव्हा एखादा रस्ता नवीन बांधतात, तेव्हा त्यावरचे डांबर वाहनांच्या चाकांना चिकटू नये, म्हणून त्यावर कोरडे सिमेंट पसरवतात. ते चपलांना लागून राहू शकतं आणि त्याला थोडंसं पाणी लागलं, तर ते घट्ट होऊन बसू शकतं. म्हणजेच, आपला मित्र अशा एखाद्या ठिकाणी गेला होता, जिथे नवे रस्ते बांधणे सुरू आहे - सांगली कोल्हापूर हायवे!! शंभर फूटी रस्त्यावरून थेट पुढे गेलो, की आपण सांगली- कोल्हापूर हायवेवरच जाऊन पोहोचतो. म्हणजे आपल्याला भेटल्यावर तो सरळ चालत सांगली- कोल्हापूर हायवेवर जाऊन पोहोचला, असे म्हणायला हरकत नाही. आता हे पाणी कुठून आलं? कोल्हापूरच्या दिशेने सगळा कोरडा ओसाड प्रदेश आहे, त्यामुळे तो पुन्हा सांगलीच्या दिशेनेच आला असणार. तेथून पहिला लागतो तो मारूती चौक आणि तिथे सतत ड्रेनेजचा काहीतरी प्रॉब्लेम सुरू असतो. त्यामुळे ते पाणी चपलांना तिथंच लागलं असणार. आता तेथून पुढे हे महाशय कुठे गेले, हे काही सांगता येत नाही. कदाचित तेथील लोकांना विचारल्यावर काही माहिती मिळेल. पण हे इथेच संपत नाही. आणखी एक सूचक निशाण त्यावरती आहे. "
मी तो फोटो झूम करून पाहिला.
"याच्या एका चपलेच्या टाचेच्या बाजूला कसलेतरी काळपट निशाण आहे. "
"करेक्ट!! " अल्फा म्हणाला, " ते निशाण पाहून मी थोडासा गोंधळात पडलो होतो. ते एखाद्या प्री-पेंट सोल्यूशनसारखे होते. लाकूड रंगवताना त्याचा वापर करतात. 'वूड स्टेन' हे त्यांचं कमर्शियल नाव. पण मला त्याबद्दल खात्री नव्हती. मग तो मुद्दा मी तात्पुरता बाजूला ठेवून दिला.
पुढे. त्याच्या शर्टाचा फोटो पहा. त्यावर मध्यभागी आडव्या रेषेत दोन-तीन निशाण आहेत - साधारण काळपट असे. हे कशामुळे तयार होऊ शकतील?? हे एखाद्या दोरखंडाचे निशाण आहेत, ज्याने खूनीने त्याला बांधले असावे.
त्यानंतर आपण गेलो शवागारात. तेथे तुला सांगितल्याप्रमाणे काहीच मिळालं नाही. आता शेवटची आशा होती, ते म्हणजे काळ्या खणीचे तळे.
तेथे अपेक्षेप्रमाणे बऱ्याच खाणाखुणा माझ्या नजरेस पडल्या. पहिली म्हणजे, उतारावर एका ठिकाणचे दगड त्यांच्या जागेवरून थोडेसे सरकले होते - तेही तळ्याच्या दिशेने. याचा अर्थ कोणीतरी त्यावरून खाली उतरले होते. मग त्याच पट्ट्यात मी वर आणि खाली तपासणी केली. थोडी थोडी झाडेही तुडवली गेली होती. तेथे केलेल्या निरीक्षणावरून मी पुढीलप्रमाणे अनुमान काढले - नंबर एक - या खूनप्रकरणात एकापेक्षा जास्त लोकांचा समावेश आहे. याचे कारण म्हणजे, त्या उतारावरचे समांतर अंतरावरील दोन बाजूचे दगड जागेवरून सरकले आहेत. म्हणजे दोन व्यक्तींनी दोन बाजूंनी धरून त्याला पाण्याच्या दिशेने नेले असावे. उताराच्या वरच्या अंगाला त्यांना सावध करण्यासाठी एकजण उभा असण्याचीही शक्यता आहे. म्हणजे दोन अथवा तीन लोक त्या वेळी तळ्यापाशी हजर होते.
नंबर दोन - या दगडांवरून खूनी व्यक्तीच उतरल्या आहेत कशावरून?? दुसरे कोणीही उतरले, तरीही ते दगड सरकणारच. त्याचे उत्तर मी ते दगड किती प्रमाणात दबले आहेत यावरून काढले आणि त्यासाठीच मी तुला वर येताना दगडांवर पाय ठेवून येण्यास सांगितले. तुझ्या वजनाने ते दगड जितके खाली दबले, त्याच्या जवळपास तिप्पट खोल ते पहिले दगड दबले गेले होते. असे का?? साहजिकच त्यावरून चालणारा जो कोणी होता, तो बरंच वजन अंगावर घेऊन चालत असावा. ते वजन म्हणजे अर्थातच आपल्या मित्राचे शरीर असणार!! शिवाय या दोन्ही व्यक्तींमधला एकजण बराच गलेलठ्ठ असावा, असाही माझा अंदाज आहे.
नंबर तीन - मी रस्त्याच्या कडेला, त्या खुणा उतारावर ज्या ठिकाणी सापडल्या, त्याच्या बरोब्बर वर टायर्सचे निशाण मिळतायत का, ते पाहिले. तेथे मला चार वेगवेगळ्या टायर्सचे निशाण मिळाले. एका संपूर्ण दिवसात तेथून बऱ्याच गाड्या जाणे साहजिकच आहे. पण तो भाग रस्ता सोडून बाजूला असल्याने तिकडे फार गाड्या जाणार नाहीत, अशी माझी खात्री आहे. या चारपैकी आपल्याला हवे असलेले कोणते, हे आपण नंतर पडताळून पाहू.
नंबर चार - हे सर्वात महत्त्वाचे आहे- खाली तळ्यापाशी मला अगदी अस्पष्ट असा बुटाचा ठसा मिळाला. ओली जमीन म्हणजे आमच्यासारख्या शोधकांचा मित्रच. आणि तळ्याकाठी थोडी ओली जमीन असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे अस्पष्ट का होईना, पण मला ठसा मिळाला. आता या ठशावरून मी बूट नक्कीच ओळखू शकतो आणि ते घालणारी व्यक्तीही..!
नंबर पाच- दगडांवरती आणि काही प्रमाणात झाडांवरदेखील, मला लाकडाचा भुसा चिकटलेला आढळला. पुढचा फोटो पहा. "
मी फोटो पाहिला. फारच अल्प प्रमाणात पिवळ्या रंगाचे कण दगडावर लागून राहिलेले मला दिसले.
"म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पाहिलेले चपलेवरचे डाग वुड स्टेनचेच आहेत, हे नक्की झाले. हे डाग आणि हा लाकडाचा भुसा, या दोन्हींची जर आपण सांगड घातली, तर हेच सिद्ध होते, की हा मनुष्य तळ्याकडे येण्याआधी टिंबर एरीयात कुठेतरी होता. कारण तिथे लाकूडकामाचा धंदा करणाऱ्यांची खूप दुकाने आहेत. अशा प्रकारचा भुसा तुला तिथेच मिळू शकेल. थोडक्यात काय, तर आपल्या कोड्याचे उत्तर आपल्याला टिंबर एरीयात मिळणार आहे. कारण खून करणारी व्यक्ती तिथलीच आहे. असा सगळा या प्रकरणाचा लेखाजोखा आहे!! "
अल्फाच्या निरीक्षणे ऐकून क्षणभर माझी विचारशक्तीच काम करेनाशी झाली.
"मांईंड ब्लोईंग!!" मी नकळतच उद्गरलो.
"आता पुढचे काम आहे, ते म्हणजे मिरजेच्या मेंटल हेल्थ हॉस्पिटलच्या डॉक्टरांना भेटणे.. "अल्फा म्हणाला, " तेथून या वेड्याची काही माहिती मिळाली, तर टिंबर एरीयातील बरेच काम वाचेल. त्याने पाहिलेला खून कोणता आहे, हे कळालं तर झालंच आपलं काम म्हणून समज!! मला हे प्रकरण फारच रोमांचक ठरणार, असं वाटायला लागलंय आता. "
"या प्रकरणापेक्षा तू ज्या पद्धतीने त्याचा छडा लावतो आहेस, तेच जास्त रोमांचक आहे.. "मी बोललो. तो खुर्चीतून उठला.
"माझं जेवण झालं. आता मी पळायला सुरूवात करतो. तू थांब रूमवर. रात्री जेवून घे. मला किती वेळ लागेल सांगता येत नाही. मी आलो की बोलूच यावरती. "
"हो चालेल. मी बोअर होणार असं एकूणच दिसतंय. पण हरकत नाही. माझे आणखीही मित्र आहेत इथे." मी कपाटातील पुस्तकांकडे पहात म्हणालो.
"मित्र नव्हे, गर्लफ्रेंड आहेत त्या तुझ्या!! " तो खिदळत म्हणजे म्हणाला, " एंजॉय युवरसेल्फ!! "
अल्फा निघून गेला आणि मी एकटाच रूमवर उरलो. दुपारचा वेळ पुस्तकांसोबत घालवणं मला प्रचंड जड गेलं. माझ्या डोळ्यांसमोर सतत त्या वेड्याचा शवागारात पाहिलेला थंड चेहरा येत होता. कोणाचा हात असेल त्याच्या मृत्यूमागे?? एखाद्या वेड्यालाही मारण्याची वेळ यावी, असं कोणतं गुपित आणि कोणाच्या पोटात लपलेलं असावं?? या प्रश्नांची उत्तरे केवळ अल्फाच शोधू शकत होता.
रात्री उशिरा अल्फा रूमवर परतला. चेहऱ्यावरून तो थोडा चिंतातूर दिसत होता.
"जेवलास का??" मी विचारले.
"होय.. आत्ताच जेवलो. मला शंकाच होती, इतक्या रात्री मला जेवणाचे ठिकाण मिळेल की नाही. पण नशीबाने एक खानावळ सुरू होती. तेथे जेवून आलो."
"अच्छा." मी हातातील पुस्तके बाजूला सारत म्हणालो. अल्फाने जोरात फॅन लावला आणि त्याखाली खुर्ची टाकून तो बसला. मी थोडा वेळ जाऊ दिला आणि मग विचारले.
"तपासात काही प्रगती?? "
"थोडीफार. " तो म्हणाला, " तो मनुष्य - थांब.. आपण आता मृत व्यक्तीला 'तो वेडा', 'तो मनुष्य' म्हणणे थांबवूया. हॉस्पिटलमध्ये मला माहिती मिळाली, की त्याला तेथे सगळे 'जीवन' म्हणायचे. आपणही त्याला 'जीवन'च म्हणूया. तर हा जीवन शुक्रवारी संध्याकाळी सांगलीच्या गणपती मंदीरापाशी होता, असे मला कळाले. मारूती चौकापासून हे मंदिर जवळ आहे. म्हणजेच तो सांगली - कोल्हापूर हायवेवरून मारूती चौक आणि तेथून गणपती मंदिर अशा मार्गाने भटकला. गणपती मंदिरापासून सरळ चालत गेलास, की तू बरोबर टिंबर एरीयात जाऊन पोहोचतोस. म्हणजे टिंबर एरीयाबाबतचा आपला अंदाज खरा आहे, असे मानायला हरकत नाही. हा त्याच मार्गाने गेला असणार आणि खूनीच्या कचाट्यात अडकला असणार.
त्यानंतर मी कार्पेंटरी मध्ये वापरल्या जाणाऱ्या 'वूड स्टेन' ची चौकशी केली. आपल्या भागात सर्वसाधारणपणे तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे वूड स्टेन्स वापरले जातात. जीवनच्या चपलेला लागलेला वूड स्टेन चांगल्या प्रतीचा आणि थोडा महाग आहे. या कंपनीचा स्टेन कोणत्या दुकानात वापरतात, याचा आता शोध घ्यायला हवाय. शिवाय त्या भागातील लाकूड वखारींमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था मी करून आलोय, जेणेकरून आपल्याला त्यांच्या टायर्सचे निशाण तळ्यापाशी मिळालेल्या सर्व निशाणांशी जुळतात का, ते पाहता येईल. "
"चांगलंय ना मग. सर्व बाजूंनी आपण खूनीच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. कुठे ना कुठे तरी धागा नक्कीच जुळेल ना!! " मी म्हणालो, " हे सर्व होऊनदेखील तुझ्या चेहऱ्यावरती तेरा का वाजलेत, हे मला समजेनासं झालंय. "
"कारण या प्रकरणात तेवढीच मोठी गोची आहे!! " अल्फा म्हणाला," मी मिरजेच्या मेंटल हेल्थ केअर सेंटरमध्ये गेलो होतो, जेथून हा पेशंट पळाला होता. तेथे डॉक्टरांना भेटलो आणि जीवनची चौकशी केली. तेव्हा मला तेथे काहीतरी विचित्रच गोष्टी समजल्या. "
"काय समजलं तुला? "
"हा पेशंट सतरा वर्षांपूर्वी त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.. आणि तेव्हापासून तो तेथील अतिदक्षता विभागात आहे!!" अल्फा म्हणाला," आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की गेल्या कित्येक वर्षांत हॉस्पिटलच्या आवाराबाहेर कुठेही त्याला सोडण्यात आलेलं नाहीये!! "
मी ते ऐकून चक्रावलोच.
"मग त्याने खून होताना पाहिला कधी?? आणि कुठे?? "
"तुझ्याप्रमाणे मलाही असं वाटत होतं, की हा जो कोणता खून त्याने पाहिला आहे, तो काही दिवसांपूर्वी किंवा फारतर काही महिन्यांपूर्वी झाला असावा. पण मला वाटतंय, की आपली ही समजूत चुकीची आहे. "
"म्हणजे?? तुला म्हणायचंय की तो खून सतरा वर्षांपूर्वी झाला होता?? " मला धक्काच बसला.
"दुसरी कोणती शक्यताच दिसत नाहीये. " अल्फा म्हणाला, " डॉक्टर म्हणत होते, की तो पेशंट म्हणजे एक मोठीच गुंतागुंतीची केस आहे. तो आलाय तेव्हापासूनच 'मी खून होताना पाहिला आहे' असं बडबडत आहे. फार प्रयत्नांनी त्याला काही प्रमाणात नॉर्मल करण्यात त्यांनी यश मिळवलं होतं. पण मधून मधून त्याला तीव्र झटके येतच होते. गेल्या आठवड्यात तेथील सेक्युरीटी गार्डच्या एका छोट्या चुकीमुळे तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. थोडक्यात काय, तर आपण जीवनच्या खूनामागचं जे कारण शोधतो आहे, ते म्हणजे कदाचित सतरा वर्षांपूर्वी घडलेला एक खून आहे!! "
"माय गॉड!! " मला तर विश्वासच बसत नव्हता. अल्फाने माझ्याकडे खिन्नपणे पहात भुवया उंचावल्या.
"मग आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू?? "मी अल्फाला विचारले.
"सध्या तरी आपल्या मार्गाने जात रहायचं. " अल्फा खुर्चीवर बोटांनी वाजवून ताल धरत म्हणाला, " एरवी कसं असतं, एखाद्या गुन्ह्यामागचं कारण प्रथम कळालं, की गुन्हेगाराला पकडणं सोपं होऊन जातं. पण या केसमध्ये ते कारण पहिला शोधणं शक्य वाटत नाहीये. आपल्याला प्रथम उपलब्ध पुराव्यांच्या आधारे गुन्हेगाराला पकडायला हवं. तेव्हाच ते कारण समजेल."
"हं... खचितच विचित्र आहे हे.. " मी म्हणालो, " पण अल्फा, सतरा वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यातील गुन्हेगाराला त्याच वेळी शिक्षा झालेली असू शकते ना?? ते प्रकरण तेव्हाच मिटले असेल कदाचित. मग तू अंधारातच चाचपडत आहेस, असंही होऊ शकतं. "
"नाही प्रभू, माझ्या मित्रा.. ते प्रकरण तेव्हाच मिटले असते, तर जीवनचा खून झालाच नसता. ते रहस्य कोणाला कधी उलगडलेलेच नसावे. आणि जीवनच्या माध्यमातून ते इतक्या वर्षांनी बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणून तर त्याचा खून करण्यात आला. " अल्फा ठामपणे म्हणाला, " मी पैजेवर सांगतो प्रभू. सतरा वर्षांपूर्वी जे काही घडले, ते काहीतरी जबरदस्त असणार आहे आणि त्याच्यामागे कोणीतरी शक्तिशाली व्यक्तीचा हात असणार आहे. इतकी वर्षे एक व्यक्ती एखादे प्रकरण दडपवून ठेवू शकते, त्याचा अर्थ स्पष्टच आहे. त्या व्यक्तीच्या हातात पैसा आहे, शक्तीही आहे. ती कोण आहे, हे शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आत्ता अंधारात चाचपडतोय, पण ते चाचपडणेच आपल्याला अंधारातून बाहेर पडण्यासाठी मदत करणार आहे. "
"निश्चितच.. " मी अल्फाला प्रोत्साहन देत म्हणालो, " मग?? उद्याचा कार्यक्रम?? "
"आखलेला आहे. " अल्फा म्हणाला, " मी तुला एखादवेळेस मदतीसाठी फोन करून बोलावू शकतो. तुला यायला जमेल का? तुझे कॉलेज आहे ना पुन्हा उद्यापासून?? "
"बिनधास्त फोन कर. सगळेजण गॅदरींगच्याच धुंदीत असणारेत आणखी दोन दिवस. त्यामुळे माझ्या मदतीची चिंता नको. "
"गुड." अल्फाचा चेहरा उजळला, "चला आता झोपूया. उद्या झोपेचे वांधे होण्याची दाट शक्यता मला वाटतेय. अरे वा!! माझाही बेड झोपण्यासाठी तयार करून ठेवला आहेस की काय तू?? क्या बात है!! मित्र असावा तर तुझ्यासारखा बघ प्रभू.. गुड नाईट..!! "
तो आल्यापासून झोपेसाठी आसुसलेला दिसत होता. तो बेडवर पडताच झोपी गेला. मीही सावकाशपणे दिवा बंद केला आणि माझ्या बेडकडे निघालो.