सकाळी मला जाग आली, ती अल्फाच्या फोनच्या आवाजाने. मी सावकाशपणे डोळे उघडून पाहिलं. मला वाटलं, की माझ्याप्रमाणेच अल्फाही डोळे चोळत उठणार आणि जांभई देत फोन उचलून 'हॅलो' म्हणणार. पण जेव्हा अंघोळ करून, नीटनेटके कपडे घालून बाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या अल्फाने फोन उचलला, तेव्हा खऱ्या अर्थाने माझी झोप उडाली.

"हॅलो.." तो बोलला,  "हो मीच बोलतोय.. चेक झाले का??.. ओह.. नाही नाही.. ऐका तरी माझं.. पोस्ट मॉर्टमचे रिपोर्ट येईपर्यंत थोडा धीर धरा... हो मला पूर्ण खात्री आहे... शंभर टक्के... हो हो... ठिक आहे.. हॅव अ गूड डे!!"

फोन ठेवताना त्याचा चेहरा त्रासलेला होता.

"कोण रे?? " मी विचारले.

"इन्स्पेक्टर देसाई!! " तो उत्तरला.

"काय म्हणत होते ते?? "

" 'कपडे आणि चपलांवर कोणतेही फिंगरप्रिंट्स मिळाले नाहीत. तू आता आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना त्रास द्यायचं बंद करतोस की नाही??'" अल्फाने त्यांची नक्कल करून दाखवली. मी हसलो.

" देसाईंकडे एखादे काम समजून घेण्याची क्षमता आहे. पण त्यावर कृती करण्याची अक्कल मात्र नाही!! " तो म्हणाला, " काहीपण म्हण प्रभू. गुन्हेगार जबरदस्त चालाख आहे. आणि त्यामुळेच मला हे प्रकरण हाताळताना जाम मजा येतेय!! चल, मी निघतो. फोन सुरू ठेव.."

तो कुठे जातोय, हे मी विचारण्याआधीच रूमचा दरवाजा बंदही झाला होता. पण तो टिंबर एरीयातच गेला असावा, असे मला खात्रीशीरपणे वाटत होते. मी आवरून कॉलेजमध्ये गेलो. दिवसभर माझे लक्ष अल्फाच्या फोनकडेच होते. पण दिवसभर काही त्याचा फोन आला नाही. संध्याकाळी मी रूमवर येतो न येतो, तोच माझा फोन खणाणला - अल्फा.

"प्रभू, अर्ध्या तासात टिंबर एरीयात पोहोचू शकतोस का??  कॉलेज कॉर्नरच्या चौकात मी तुझी वाट पहात थांबलो आहे."

मी हो म्हणताच त्याने फोन ठेवून दिला. मी घड्याळात पाहिले. सहा वाजत आले होते. मावळत्या सूर्याची किरणे रूमच्या खिडकीवर पडत होती आणि त्यांमुळे आमची रूम लाल रंगाने न्हाऊन निघाली होती. मी पटापट आवरले आणि स्टॉपवरून रिक्षा पकडली. माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती.  रिक्षा थेट टिंबर एरीयात नेऊन थांबली. बाजूलाच एका टपरीपाशी अल्फा उभा होता. त्याने मी दिसताच हात केला आणि माझ्यापाशी आला.

"वेळेत आलास." अल्फा म्हणाला, "आता ऐक. मी दिवसभर फिरून या भागाची खडानखडा माहिती मिळवली आहे. येथील प्रत्येक वखारीत जाऊन मी बऱ्यापैकी माहिती गोळा करून आलोय. आपण बांधलेल्या अंदाजांवरून तीन लाकूड वखारी अशा आहेत, जिथे माझी नजर खिळून राहिली आहे. मला खात्री आहे, की यांपैकी एका ठिकाणीच जीवनला त्या रात्री आणले गेले होते. मला असे, का वाटते, ते नंतर सांगतो. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेव, की आपण टिंबर एरीयातील वखारींचा सर्व्हे करण्यासाठी आलो आहोत आणि आपल्याला वखारीच्या मालकाला भेटायचे आहे. तू फक्त वही पेन हातात घेऊन काहीतरी लिहील्यासारखं कर. "

"कॉपीड, सर. " मी मिश्कीलपणे म्हणालो. तो हसला. आम्ही निघणार, तेवढ्यात त्याचा फोन वाजला.

"देसाई!! " अल्फाने फोन उचलला, " बोला सर. पोस्ट मॉर्टममध्ये मृत व्यक्तीच्या शरीरात क्लोरोफॉर्मचा अंश मिळाला हेच सांगण्यासाठी फोन केला होता ना??.. मला कसं कळालं, ते जाऊ द्या.. आता यावरून हे सिद्ध होतंय, की मरण्याआधी मृत व्यक्तीला क्लोरोफॉर्म वापरून बेशुद्ध करण्यात आलं होतं आणि याचाच अर्थ असा,की त्या व्यक्तीचा खून झालेला आहे... मी तुम्हाला एक मेल केलाय, ज्यामध्ये मी या केसचं संपूर्ण स्पष्टीकरण लिहिलेलं आहे त्यावरून एकदा नजर फिरवा, म्हणजे तुम्हाला या प्रकरणाचा गाभा पटकन दृष्टीस पडेल... आणि हो, वाचून झाल्यानंतर थेट टिंबर एरीयात या. आपला गुन्हेगार तेथेच दडलेला आहे. मी लोकेशन पाठवेन... हो मी इथेच आहे.. ठेवतो. "

आम्ही चालू लागलो होतो.

"मला ठाऊक होतं, की देसाईंची ट्यूब उशीराच पेटणार. " अल्फा जोराने पावले टाकतच म्हणाला, " तळ्याच्या काठी कोणतेही झटपट झाल्याचे निशाण नव्हते. म्हणजेच जीवनला पाण्यात टाकण्याआधी बेशुद्ध केलं गेलं असणार - म्हणजेच पोस्ट मॉर्टममध्ये क्लोरोफॉर्म मिळणं नक्की. चला, शेवटच्या क्षणी का होईना, पण पोलीस आपल्या पाठीशी उभे राहिले. हे पहा आलोच आपण."

आम्ही पहिल्या वखारीत शिरलो. गेटमधून थेट समोर ऑफिसची छोटी खोली होती आणि डाव्या बाजूला मोकळी जागा होती, जिथे लाकडाचे ओंडके रचून ठेवले होते. आम्ही ऑफिसमध्ये शिरलो. तेथे एक लठ्ठ, गोरा आणि काहीसा बुटका माणूस खुर्चीवर बसून काहीतरी लिहीत होता. आम्ही आत शिरताच त्याने आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.

"नमस्कार. आम्ही मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहोत आणि टिंबर एरीयाचा सर्व्हे करत आहोत. सकाळी येऊन गेलो, पण तुम्ही भेटला नाही. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत."

त्याच्या चेहऱ्यावर त्रासाची एक लकेर उमटली.

"बसा." नाखुशीनेच तो म्हणाला. आम्ही टेबलासमोरील खुर्चीवर जाऊन बसलो. अल्फाने माझ्या हातात एक छोटी वही दिली आणि आपल्या खिशातून एक प्रश्नावली काढली. हे सर्व करताना अल्फाची बारीक नजर त्या खोलीवरून फिरत होती, हे मला जाणवले. त्याने त्या माणसाला एकामागून एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तो माणूस अतिशय निरुत्साहीपणे आणि तुटकपणे त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. अल्फाने मधुनच कागद खाली पाडला. मग अचानक त्याचा फोन वाजला. त्याने ती प्रश्नावली माझ्या हातात दिली आणि तो खिडकीपाशी फोनवर बोलत गेला. वखारीचा मालक त्याचे हे सगळे उद्योग हताशपणे पहात होता. अखेर थोडा वेळ आम्हाला सहन केल्यानंतर शेवटी तो म्हणाला,

"बरं तुम्ही आता लवकर आवरतं घेतलं तर बरं होईल. मला दुसरी महत्त्वाची कामं आहेत."

"हो झालंच आमचं. अजुन काही प्रश्न आहेत, पण ते काही फार महत्त्वाचे नाहीयेत. तुमचा कामाचा वेळ घेतला, त्याबद्दल सॉरी. निघतो आम्ही."

अल्फाने त्याचं दुकान गुंडाळलं आणि आम्ही तेथून सटकलो. त्या माणसाच्या चेहऱ्यावर 'कोण हे मूर्ख येऊन गेले' असे भाव मला दिसले.

अल्फाने आतमध्ये काय पाहिले, हे विचारायला मला सवडच मिळाली नाही. कारण बाहेर पडताच अल्फा तरातरा पुढच्या वखारीकडे निघाला. थोडे अंतर चालून गेल्यावर अल्फा एका गेटमधून आत शिरला आणि मीही त्याच्या मागोमाग गेलो. येथे गेटला लागूनच ऑफिस होते आणि मागील बाजूला लाकडे ठेवण्याची जागा होती. आम्ही त्या खोलीतून आत डोकावलो. आतमधे दोन माणसे बसली होती. ते दोघेही साधारण पन्नाशीतले होते, मध्यम बांध्याचे होते आणि दिसायला बऱ्यापैकी सारखेच होते. ते दोघेही भाऊ असावेत, असा मी अंदाज बांधला. आम्ही सर्व्हेचे कारण सांगताच त्यांनी आपले काम बाजूला ठेवले आणि आम्हाला बसून मोकळेपणाने प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यांच्या हसतमुख चेहऱ्यामुळे आणि दिलखुलास बोलण्यामुळे मला बरे वाटले, पण त्याउलट अल्फाच्या चेहऱ्यावर थोडी निराशा दिसली. त्याने त्यांना मोजकेच प्रश्न विचारले आणि तेथून काढता पाय घेतला. त्याला हवे असलेले अजुनही त्याला मिळाले नाहीये , हे माझ्या लक्षात आले.

आम्ही बाहेर पडलो, तेव्हा अंधार पडायला लागला होता. आम्ही आणखी पुढे चालत गेलो. मुख्य रस्त्यापासून आम्ही आता बरेच आत आलो होतो. इथे रस्त्यावर खूप अंतर ठेवून दिवे असल्यामुळे तो भाग तसा अंधारलेलाच होता. शिवाय रहदारीही तुरळकच होती. पाच मिनिटे चालल्यानंतर आम्ही एका वखारीपाशी येऊन उभे राहिलो. त्या वखारीला लाकडी कुंपण होते आणि ती खुपच जुनाट वाटत होती. टिंबर एरीयाच्या एका कोपऱ्यात ती वसली होती. रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश सोडता आजुबाजुला थोडा अंधारच होता. या वखारीतले ऑफिसही गेटपासून बरेच आत होते. गेटपाशी उभा राहून अल्फाने त्या ऑफिसकडे एक नजर टाकली.

"बेटा इथे तर तू मला सापडायलाच हवा आहेस.." अल्फा पुटपुटला. आम्ही आत प्रवेश केला. गेटपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत आतून दोघंजण बाहेर येत होते. बहुधा ते लोक ऑफिस बंद करण्याच्या तयारीत होते.

"कोण रे तुम्ही??" त्यांतल्या एकाने विचारले. परसदारात अंधार असल्यामुळे आम्ही त्यांचे चेहरे पाहू शकत नव्हतो.

"शुभसंध्या, सर. आम्ही मॅनेजमेंट कॉलेजचे विद्यार्थी आहोत. एका प्रोजेक्टसाठी आम्ही या भागातील वखारींचा सर्व्हे करत आहोत. तुमची दहा मिनिटे हवी आहेत." खरोखरीच एखादा मॅनेजमेंटचा विद्यार्थी वाटावा, अशी सभ्यता दर्शवित अल्फा म्हणाला.

"हे बघा. आम्ही आता ऑफिस बंद करतोय. तुम्हाला जे काही विचारायचे असेल, ते उद्या सकाळी येऊन इथल्या कामगारांना विचारा. जा आता. " अल्फाच्या सभ्यतेएवढेच उद्धट उत्तर आम्हाला मिळाले.

"कामगारांना आज सकाळीच भेटून झालंय. तुम्ही संध्याकाळी इकडे येता हे कळालं, म्हणून थांबलो. थोडंसं सहकार्य करा. मोठा प्रोजेक्ट आहे. " अल्फा म्हणाला.

"आत्ता नाही. संध्याकाळी फार वेळ आम्ही येथे थांबत नसतो. उद्या थोडं लवकर या. पाच वाजता." तो पठ्ठ्या काही ऐकायला तयार होईना. पण अल्फाही चांगलाच हट्टी होता.

"उद्या कॉलेजमध्ये रिपोर्ट द्यायचा आहे. प्लीज सर. घड्याळ लावा हवं तर. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेणार नाही. "

"बरं विचार पटापट. सांगतो. लवकर आवरून टाकू. " तो माणूस म्हणाला. आम्हाला ऑफिसच्या आत घेण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती, हे सरळसरळ दिसत होते.

"सर, या रिपोर्टमध्ये आम्ही या भागातील सर्वात मोठ्या अशा तीन वखारी निवडल्या आहेत, ज्यामधील एक तुमची आहे. आपली प्रश्नोत्तरे व्यवस्थित झाली, तर आम्ही रिपोर्टही नीट पब्लिश करू शकू. त्यातून होणाऱ्या मार्केटिंगचा फायदा तुम्हालाच होणार आहे. त्यामुळे आतमध्ये बसून आपण हा कार्यक्रम करू शकलो, तर फार बरं होईल. शिवाय माझ्या मित्राला टिप्पणीही पद्धतशीरपणे लिहिता येतील. "

त्या दोघांनी एकमेकांकडे क्षणभर पाहिले, मानेने काही इशारे केले आणि त्यातला एकजण म्हणाला,

"ठिकाय. या आत. "

अल्फाने मारलेला बाण बरोबर निशाणावर बसला आणि अखेर आम्हाला त्या ऑफिसमध्ये प्रवेश मिळाला.

ऑफिसही बाहेरच्या कुंपणाप्रमाणेच जुनाट होते. कोणी ऑफिसच्या स्थितीकडे फारसे लक्ष देत नसावे. खिडकीतून आणि दरवाजातून आत आलेला लाकडाचा भुसा पायांत पसरला होता. कसलातरी विचित्र कुबट वास तेथे भरून राहिला होता. लाकडी फळ्या टाकून वरचे छत बनवले होते आणि त्याला आधार देण्यासाठी एक खांब त्या खोलीमध्ये उभा होता. आम्ही खुर्चीवर बसलो. आमच्या समोर दोन जण होते. त्यातला एकजण काळ्या वर्णाचा, भरघोस दाढी-मिशी असणारा, हातांत कडे घातलेला आणि धिप्पाड असा होता. तो एखाद्या तमिळ फिल्मचा खलनायक शोभला असता. दुसरा थोडासा सडपातळ, चापून बसवलेल्या केसांचा, थोडा उजळ, पण चेहऱ्यावरून चालाख वाटेल, असा होता.

"सुरू करूया?" अल्फाने विचारले. त्याचे पाणीदार डोळे समाधानाने चमकत होते. मी मनातून समजून गेलो. मासा गळाला लागला होता.

"आपलं नाव सांगाल का??"

"मी विश्वजित साठे आणि हा असिफ मुल्ला." दोघांतील धिप्पाड असणारा मनुष्य म्हणाला.

"तुम्ही या वखारीचे मालक आहात??" अल्फा.

" नाही. आम्ही येथील मॅनेजर आहोत. मी वखारीचा कारभार पाहतो आणि हा आर्थिक व्यवहार पाहतो."

"वखारीचे मालक कोण आहेत?? "

" सलीम शेख. मोठे असामी आहेत. नाव ऐकलं असेलच तुम्ही. " मुल्ला म्हणाला.

"सॉरी, पण नाही ऐकलं." अल्फा निर्विकारपणे म्हणाला, " मला सांगा, तुम्ही या ऑफिसचा वापर कशासाठी करता?? "

"कशासाठी म्हणजे?? कामासाठी!! " साठे म्हणाला. आता त्याच्या आवाजात थोडी चीड आली होती.

"अच्छा. आणि ऑफिसमधील या खांबाचा उपयोग होतो का तुम्हाला कधी??"

तो प्रश्न ऐकून साठे जागेवरून उठलाच. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता.

"हे असले फालतू प्रश्न विचारण्यासाठी थांबायला लावलंय का तुम्ही आम्हाला?? आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, नाहीतर एकेकाला उचलून फेकून देईन!! "

ते ऐकून माझ्या छातीत धस्स झाले. तो माणूस इतका धिप्पाड होता, की मनात आणलं, तर तो खरंच आम्हा दोघांना उचलून फेकू शकला असता. मी अल्फाकडे पाहिले. त्याचा चेहरा मात्र मघासारखाच शांत आणि निश्चल होता.

"जसं तुम्ही शुक्रवारच्या रात्री एका माणसाला काळ्या खणीच्या तळ्यात फेकलं होतं, तसंच का??" अल्फा थंडपणे म्हणाला. ते वाक्य ऐकून मात्र त्या दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. भीतीयुक्त नजरेने त्यांनी एकमेकांकडे पाहिले.

"कुठले तळे? कोणाला फेकलं?? काय बडबडताय तुम्ही?? " मुल्ला सटपटून म्हणाला.

" सांगतो ना. अगदी व्यवस्थित पहिल्यापासून सांगतो." अल्फा खुर्चीवरून पुढे होत म्हणाला, "सर्वप्रथम तुमच्या मालकाने तुम्हाला एका माणसाला पकडायला सांगितले. तो एक भटका आणि वेडसर माणूस होता. तुम्ही कोणाला कळणार नाही, अशा बेताने त्याला रस्त्यावरून उचलले आणि 'कामासाठी' वापरल्या जाणाऱ्या या ऑफिसमध्ये आणले. त्याला या खांबाला बांधून ठेवले. मग तुमचा बॉस शेखचे त्याच्यासोबत काही खाजगी बोलणे झाले आणि त्याने तुम्हाला त्या माणसाला मारून टाकण्यास सांगितले. तुम्ही त्या व्यक्तीला बेशुद्ध केले आणि रात्री उशिरा गाडीतून नेऊन काळ्या खणीच्या तळ्यात फेकून दिले. विषय संपला. तुमच्याकडे यापेक्षा वेगळं काही सांगण्यासारखं असेल, तर सांगा. "

"ए खुळखुळ्या.. जास्त वाजू नकोस!! कशावरून बोलतोयस हे तू?? काय पुरावा आहे तुझ्याकडे?? " साठे गुरकावला.

"हे बुटाचे ठसे पहा. " अल्फाने आपल्या मोबाईलवरचा फोटो दाखवला, " तळ्याच्या काठाशी मिळाले आहेत. तुमच्या बुटांशी अगदी तंतोतंत जुळतील. शिवाय मृत व्यक्तीच्या चपलांना लागलेला लाकडाचा भुसा आणि आपल्या पायांत आत्ता पसरलेला भुसा सारखाच आहे, हे सिद्ध करणेही फार अवघड नाही. याहीपुढे, त्याच्या शर्टावरील काळपट डाग हे कोपऱ्यात पडलेल्या त्या दोरखंडाचे आहेत ज्याने तुम्ही त्याला बांधले होते, हे एखादा मूर्खही सांगू शकेल. आणखी हवेत का पुरावे तुम्हाला?? "

"नको. इतके पुरावे पुरेसे आहेत. " मुल्ला संथपणे आपल्या जागेवरून उठत म्हणाला. तो दरवाजाकडे चालत गेला आणि त्याने आतून दरवाजा लावून घेतला, " बरेच पुरावे आपण मागे सोडले, नाही का साठे?? पण हरकत नाही. आम्ही पुन्हा ही चूक करणार नाही. तुमच्या खूनाचा एकही पुरावा मागे राहणार नाही, याची आम्ही हमी देतो."

माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. समोर उभारलेल्या साठेने आमच्याकडे पाहत कुत्सित हास्य केले. आम्हा दोघांसाठी तो एकटाच पुरेसा होता. मुल्ला दाराला कडी लावणार, तितक्यातच तो दरवाजा धाडकन परत मागे आला आणि भिंतीवर आपटला. आम्हा चौघांच्याही नजरा तिकडे वळल्या. बाहेरून 'दबंग' स्टाईल एंट्री करत इन्स्पेक्टर देसाई खोलीत प्रकट झाले.

"महाशय, थोडं आमच्याकडेही लक्ष द्या!!" ते म्हणाले. पोलीसांना पाहताच ते दोघेही भिऊन मागे सरकले. "केव्हापासून बाहेर निमंत्रणाची वाट पाहतोय आम्ही. आम्हाला आत बोलवायचं सोडून दरवाजा लावून घ्यायला निघाला होता होय!! " देसाई म्हणाले, " जाधव, बेड्या ठोका यांना. "

त्यांच्या सोबत आलेल्या पोलीसांनी साठे आणि मुल्लाला जेरबंद केले.

"आम्ही.. आम्ही काही केलेलं नाही.. शेखसाहेबांनी आम्हाला तसं करायला सांगितलं होतं.. आम्हाला सोडा.. प्लीज साहेब.. " हातांत बेड्या पडल्यावर मात्र त्या दोघांचं अवसान पुरतं गळालं.

" शेखसाहेबाने शेण खायला सांगितलं, तर खाशील काय रे ए जाड्या!! " आयतेच सावज हातात सापडल्यामुळे देसाई रंगात आले होते,  "तुझा साहेब कुठे राहतो सांग. त्यालाही खडी फोडायला पाठवायचं आहे. "

"ते मागच्या गल्लीतच राहतात. त्यांना विचारा हवं तर.. आमचा काहीच दोष नाहीये यात... " ते दोघेही देसाईंच्या हातापाया पडू लागले. पण त्यांना न जुमानता देसाईंनी त्यांना गाडीत बसवून पोलीस ठाण्यात पाठवून दिले.

"तू म्हणजे खरंच कमाल आहेस अल्फा!! " अल्फाकडे पाहत देसाई म्हणाले, " तुझा मेल वाचला मी. किती सूक्ष्म निरिक्षणावरून तू गुन्हेगारांचा अचूक माग काढलास!! तुझ्या बुद्धीला खरंच दाद द्यायला हवी.."

"धन्यवाद, देसाईसाहेब.. या स्तुतीबद्दलही आणि वेळेत इथे येऊन आम्हाला वाचवल्याबद्दलही!! " अल्फा म्हणाला.

"अरे ते काही फार मोठं काम नव्हतं. तू जे लोकेशन पाठवलंस, त्याच्या आधारेच मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. बरं, आता घाई करूया आणि त्या शेखला अटक करूया. म्हणजे आपलं काम फत्ते .. खरंतर या शेखला मी ओळखतो. बडा व्यापारी आहे तो. बोलण्या - चालण्यावरून सभ्य दिसतो. तो हा असा काही कारभार करून ठेवेल, असं वाटलं नव्हतं. असो. चला. "

आम्ही देसाईंच्या गाडीत बसलो आणि शेखच्या घराकडे निघालो. मी माझे कुतूहल शमविण्यासाठी अल्फाला प्रश्न विचारला,

"अल्फा, टिंबर एरीयातील इतक्या साऱ्या वखारींतून तू बरोबर या तीन कशा निवडल्यास? कशावरून तुला वाटलं, की यांपैकी एक कोणीतरी निश्चितपणे गुन्हेगार आहे??"

"हं.. थोडंसं अवघड काम होतं खरं हे." अल्फा सुस्कारा टाकत म्हणाला, "जीवनच्या चपलाला लागलेलं वूड स्टेन कोणकोणत्या ठिकाणी वापरतात, हे प्रथम मी पाहिलं. ते थोडंसं महाग आणि भारी प्रतीचं आहे आणि या पूर्ण भागातील साधारण चाळीस दुकानांपैकी आठ ठिकाणीच हे उपलब्ध आहे. त्यामुळे बाकीच्यांचा विचार करण्याची गरज नाही. या आठ वखारींमध्ये एखादी बंदीस्त जागा आहे का, हे मी पाहिले, जेणेकरून जीवनला पकडून आणल्यानंतर त्याला कोणालाही न दिसता डांबून ठेवता येईल. या आठमधील काहींना ऑफिस होते, तर काहींना नव्हते. ज्यांना नव्हते, त्यांचा विचार सोडून दिला आणि बाकींवर मी माझे लक्ष केंद्रित केले. जीवनला एखाद्या ऑफिसच्या खोलीतच बांधून ठेवले गेले असणार होते. आता या ऑफिसेसमध्ये जाऊन मी तेथील मॅनेजर अथवा मालकांना भेटलो आणि त्यांच्या पायांत मला हवे असलेले बूट दिसतायत का, ते पाहिले. मला जे भेटले, त्यांच्या पायांत असे बूट मला दिसले नाहीत आणि तीन वखारी अशा होत्या, ज्यांचे मॅनेजर मला भेटलेच नाहीत. आता साहजिकच, या तीनपैकी एक कोणीतरी खूनी असायलाच पाहिजे होता आणि त्याच्या पायांत ते बूट मिळायला हवे होते. ती वखार म्हणजे आपल्या शोधातील शेवटची वखार निघाली. "

अल्फाच्या उत्तराने केवळ मीच नाही, तर देसाईदेखील प्रभावित झाले.

"अल्फा, आमच्या शोधकार्यात तुला प्रत्येकवेळी समाविष्ट करून घ्यायला पाहिजे, असं मला वाटू लागलंय. वाघमारे साहेब उगाच तुझ्यावर आग पाखडत असतात. असा तंत्रशुद्ध विचार करणाऱ्याची आम्हाला खरंच गरज आहे. "

"मला तुम्हाला मदत करायला नेहमीच आवडेल, सर!!" अल्फा खुष होऊन म्हणाला. आम्ही शेखच्या बंगल्यापाशी पोहोचलो. बऱ्यापैकी मोठा आणि नवीन बांधणीचा बंगला होता तो. आम्ही दरवाजापाशी गेलो आणि बेल वाजवली. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अल्फाने पुन्हा एकदा बेल वाजवली. पुढच्याच क्षणी दार उघडले आणि आतमधून एक माणूस येऊन आमच्या अंगावर जवळपास पडलाच.

"स.. स्.. साहेब.." तो अस्पष्टपणे म्हणाला. त्या अनपेक्षित स्वागताने आम्ही सगळेच क्षणभर बावचळून गेलो.

"त्याची शुद्ध हरपतेय.. कोणीतरी पाणी आणा!!" अल्फा ओरडला. आमच्यासोबत असलेल्या हवालदाराने आतमध्ये जाऊन पाणी आणले आणि त्याच्या तोंडावर शिंपडले.

"ठिक वाटतंय का तुला?? काय झालं??" देसाई चिंतातूर होऊन म्हणाले. त्याने आपला हात हळूवार उचलत वरच्या मजल्याच्या दिशेने दाखवला. हॉलमधूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या होत्या. आम्ही धावतच वरच्या मजल्यावर जाऊन पोहोचलो. डाव्या बाजूला एकच खोली होती, जिचे दार उघडे होते. आम्ही आतमध्ये पाहिले आणि जागीच खिळून राहिलो.

आतमध्ये एक पन्नाशीतला माणूस गळफास लावून लटकला होता!!

माझ्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारीच आली. देसाई आणि अल्फा आतमध्ये गेले. त्यांचा आवाजही मला कमी कमी ऐकू येत होता. मी मागे सरकून भिंतीचा आधार घेतला, तेव्हा माझे डोके थोडेसे ताळ्यावर आले.

"प्रभू.. प्रभू!! प्रभव??" मला जाणवले, की अल्फा मला हाक मारत होता.

"हां बोल.." मी माझ्या कपाळावरचा घाम पुसत म्हणालो.

"पोलीस ठाण्यात फोन लाव आणि त्यांना पटकन इकडे यायला सांग. आणि तू इथे थांबू नकोस. खाली वाट पहा. आम्ही थोड्या वेळात येतो."

मला तेथे क्षणभरही थांबण्याची इच्छा नव्हती. मी लगेच खाली आलो, पोलीस स्टेशनला फोन लावला आणि खालीच हॉलमध्ये वाट पहात बसलो.

माझे डोके सुन्न झाले होते. वरती लटकलेल्या माणसाचा चेहरा वारंवार डोळ्यांसमोर येत होता आणि त्यामुळे डोके गरगरत होते. तो माणूस म्हणजेच सलीम शेख होता का?? आणि तो खाली धडपडत आलेला माणूस कोण होता मग?? वरती नक्की काय घडले होते?? शेखने गळफास लावून आत्महत्या केली होती का??

मी फार विचार करू शकलो नाही. माझ्या मेंदूची विचार करण्याची क्षमताच नष्ट झाली होती जणू. सुमारे अर्धा तास मी तसाच बसून राहिलो. अंगात विलक्षण थकवा जाणवत होता. असे मला आधी कधी झाले नव्हते. कदाचित माझ्या मनाला ते दृश्य अगदीच अनपेक्षित असावे आणि त्यामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे माझे संतुलन बिघडले असावे.

दरम्यानच्या वेळेत पोलीस वरती गेले. वरून खाली आले. बऱ्याच हालचाली झाल्या. साधारण तासभर गेला आणि अल्फा खाली आला.

"सॉरी प्रभू.. मघाशी फार बोलू शकलो नाही. तुला बरं वाटतंय ना? मघाशी तुला चक्कर येत असल्यासारखं मला वाटलं."

"हो मी ठिक आहे. ते दृश्य अचानक समोर आल्यामुळे एकदम डोळ्यांसमोर अंधारी आली रे." मी म्हणालो,  "काय झालंय वरती??"

"सलीम शेखने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली आहे. " अल्फा हताशपणे म्हणाला, " खाली धडपडत आला तो त्याचा घरगडी होता. त्यानेच सर्वप्रथम मृतदेहाला पाहिले आहे. "

"आत्महत्येचं कारण कळालं का?? " मी विचारले. अल्फाने पॉलिथीनच्या लहानशा पिशवीत ठेवलेली चिठ्ठी मला दाखवली. त्यावर लिहिले होते –

 

काळ्या खणीत रविवारी पहाटे सापडलेल्या मनोरुग्णाच्या मृत्यूला मी जबाबदार आहे. त्याने आत्महत्या केली नसून मी माझ्या हस्तकांकरवे त्याचा खून केला आहे. यामागे काही व्यक्तिगत कारणे आहेत, जी मी जगाला सांगू इच्छित नाही आणि या घटनेमुळे होणाऱ्या मानहानीला तोंड देण्याचे बळही माझ्यात नाही. त्यामुळे पोलीसांना माझा माग लागला आहे, हे कळताच मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये.

सलीम शेख

मी ते वाचून अल्फाकडे पाहिले. तो खूपच निराश दिसत होता.

"खूपच टोकाचा निर्णय घेतला या शेखने." तो म्हणाला, "शेख गेला आणि त्याच्यासोबत जीवनच्या खुनामागचे कारणही गेले."

मीदेखील तो मजकूर वाचून हळहळलो.

"आता काय करणार आहे आपण?" मी अल्फाला विचारले.

"मला इथे थांबून आणखी थोडा तपास करायचा आहे. जोपर्यंत मला खात्री होत नाही, की शेखने आत्महत्याच केली आहे, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. "

"म्हणजे?? त्याच्या मृत्यूमागे आणखीही काही आहे, असं तुला म्हणायचंय का??" मी भुवया उंचावल्या.

"ते आता तपास केल्यानंतरच कळेल. " अल्फा म्हणाला," तू एक काम कर. वरती कांबळे म्हणून हवालदार आहेत, जे थोड्या वेळाने विश्रामबागला जायला निघणार आहेत. मी त्यांना तुला सोबत घेऊन जायला सांगितले आहे. ते तुला रूमवर सोडतील. तू जाऊन जेव आणि विश्रांती घे. फारच दमलेला दिसतोयस तू. माझी वाट पाहू नकोस. मला उशीर होईल यायला."

"ठिक आहे." मी म्हणालो. अल्फाने माझा निरोप घेतला आणि तो पुन्हा वरती गेला. मी खालीच कांबळेंची वाट पहात थांबलो. मला खरेच विश्रांतीची गरज होती. तेथील मरणप्राय वातावरणातून कधी एकदा बाहेर पडतो, असे मला झाले होते. कांबळे खाली येईपर्यंत मी माझे मन रमविण्यासाठी हॉलमधले फोटो पाहू लागलो.

हॉलमध्ये शेखचे बरेच फोटो होते. स्टेजवरती सत्कार स्वीकारतानाचे, उद्घाटन करतानाचे, नेत्यांसोबत हसऱ्या मुद्रेतले. देसाईंनी त्यांच्याबद्दल जे सांगितले होते, ते फोटो पाहिल्यानंतर मला लगेच पटले. प्रथम पाहणाऱ्याला शेख अतिशय सभ्य माणूस वाटला असता. तो खून वगैरे काही करू शकेल, असे त्याच्या चेहऱ्यावरून वाटत नव्हते.

भिंतीवर ओळीने लावलेले फोटो पाहता पाहता मी कपाटापशी आलो. ते एक लाकडी कपाट होते आणि त्याचा एक ड्रॉवर अर्धवट उघडा होता. त्यातून एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो बाहेर डोकावत होता. मी तो हातात घेणे योग्य आहे का, याचा क्षणभर विचार केला आणि लगेच पुन्हा ठेवून देऊ, या विचाराने तो फोटो मी हातात घेतला.

तो एक धुळकटलेला, फाटायला आलेला एक जुनाट फोटो होता. त्यामध्ये नीटनेटका पोषाख केलेले चौघे उमदे पुरूष उभे होते. सर्वजण सव्वीस - सत्तावीस वर्षांचे वाटत होते. त्यातील एकाला तर मी लगेच ओळखले. तो तरूण सलीम शेख होता. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीकडे मी निरखून पाहिले. याला मी निश्चितच पाहिले होते - अगदी अलिकडेच. त्याच्या चेहऱ्याची ठेवण पाहून मला एकदम तो चेहरा आठवला - हा तोच चेहरा होता जो मी शवागारात पाहिला होता - जीवन!!

माझ्या छातीचे ठोके वाढल्याचे मला जाणवले. शेख आणि जीवन यांच्यात खूपच जुने संबंध होते, हे या फोटोवरून दिसून येत होतं. मी त्या फोटोतले आणखी कोण ओळखीचे दिसतेय का, ते पाहू लागलो. फोटोत सर्वात उजवीकडे उभारलेला मनुष्य थोडा प्रौढ वाटत होता आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कडेवर एक वर्षभर वयाचा छोटा मुलगाही होता. त्या मुलाकडे पाहून मी चमकलो. मला का कोणास ठाऊक, पण असे वाटले, की त्या मुलालाही मी कुठेतरी पाहिलंय. ते डोळे माझ्या अगदी रोजच्या पाहण्यातले आहेत, असं मला वाटू लागलं. पण त्याला नक्की कुठे पाहिलंय, हे मात्र काही केल्या आठवेना. मी या प्रकरणातील हरएक व्यक्तीचा त्या मुलाच्या डोळ्यांशी संबंध लावून पाहिला. पण नाही!! मला तो कोण होता, हे निश्चित करणे शक्य झाले नाही.

मी तो फोटो पाहत असताना मागून मला हाक ऐकू आली. मी तो फोटो चलाखीने लपवला आणि मागे वळलो. ते कांबळे होते.

"तुला घरी सोडायचे आहे ना?" त्यांनी विचारले.

"अं हो.. निघायचं का??" मी विचारले.

"हो निघूया. बराच उशीर झालाय."

आम्ही त्यांच्या गाडीवरून रूमकडे निघालो. तो फोटो माझ्या खिशातच होता. पूर्ण प्रवासात मी त्या छोट्या मुलाचाच विचार करत होतो. माझी स्मरणशक्ती इतकी कमकुवत कशी काय असू शकते?? मला तो मुलगा कोण आहे, हे का ओळखता येत नाहीये???

मी मेसपाशीच उतरलो आणि जेवण करून रूमवर आलो. रात्रीचे दहा वाजायला आले होते. मी आमच्या खोलीतील खुर्ची दिव्यापाशी ओढली आणि तो फोटो माझ्या समोर ठेवला. ते डोळे!! जणू तो माझा बालपणीचा हरवलेला मित्र होता!! हा फोटो या केसचे कोडे सोडवण्यात खूपच महत्त्वाची भूमिका बजावणार होता, हे मला कळत होतं. बस्स तो मुलगा कोण हे आठवायला हवं होतं. बराच वेळ गेला. मी आता जवळपास हट्ट्लाच पेटलो होतो. हे एका गणितासारखं होतं. तुम्ही शेवटच्या पायरीपर्यंत आला आहात. तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा, हेही ठाऊक आहे. पण तुमची आकडेमोड चुकतेय आणि उत्तर येत नाहीये!!

खूप वेळ त्या फोटोकडे एकटक पाहिल्यानंतर माझ्या मनात एक अविश्वसनीय विचार तरळून गेला. पहिला तर मी स्वतःलाच झटकले. छे छे!! हे कसं काय असू शकतं... पण मला खात्री करून घ्यावीशी वाटू लागली. अखेर बळ एकवटून मी जागेवरून उठलो. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. मी अल्फाच्या कपाटापशी गेलो आणि त्यातून त्याचा लहानपणीचा अल्बम काढला. कापऱ्या हातांनी मी त्याची पाने पलटली. त्यामध्ये त्याचे लहानपणीचे अनाथाश्रमातील फोटो होते. मी शेखच्या घरातून आणलेला फोटो त्या अल्बमच्या बाजूला ठेवला आणि दोन्ही फोटो एकदम पाहिले. क्षणभर मला वाटलं, की माझं हृदय थांबून गेलंय...

तो अल्फा होता...

मी तो अल्बम आणि फोटो दोन्ही बाजूला टाकले आणि मिनिटभर बेडवर बसलो. मला स्वतःला शांत करणं फारच अवघड होत होतं. हे कसं शक्य होतं?? मी पुन्हा पुन्हा ते फोटो पाहिले. तो अल्फाच होता. या लोकांशी त्याचा काय संबंध होता? ते खूप जुन्या फोटोत एकत्र कसे काय?? अल्फाला कडेवर घेऊन उभे असलेले त्याचे वडील होते का?? आणि या सगळ्याची अल्फाला काही कल्पना होती का??

विचार करून करून माझे डोके दुखायला लागले. आम्ही समजत होतो, की आम्ही जीवनच्या खूनाचा रहस्यभेद केला आहे. गर्द अंधारात प्रकाश टाकत सत्य शोधले आहे...

पण तो आमचा फार मोठा गैरसमज होता.

हे तर अंधारातील पहिले पाऊल होते...!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel