अग्निप्रवाह पार करून चंद्रवर्मा एका फळांच्या बागेत पोचला. अंधार पडल्यानंतर तो एका झाडाच्या फांदीवर झोपला असता राक्षसी गफट पक्ष्यांच्या पंखाच्या वाऱ्याने तो खाली पडला. पण सुदैवाने तो एका पक्ष्याच्या पंखावर पडला. तेथे शंख मांत्रिकाचा अभिपक्षी आला व त्याने त्या गरुड पक्ष्यांजवळ कपालिनीला उचलून आणण्यासाठी मदत मागितली. त्यांनी मदत देण्याचे कबूल केलें. 

अग्नीपक्ष्याचें गरुड पक्ष्यांशी जे बोलणे झाले तें सारे बोलणे पक्ष्यांची भाषा कळत असल्याने चंद्रवर्माला कळलें. तो जास्त उत्सुकतेने त्यांचे बोलणे ऐकू लागला. गरुड पक्षी शंख मांत्रिकाच्या डोंगरावर जाणार आहेत हे समजल्यावर त्याने विचार केला की, या पक्ष्यांच्या पंखाला जर मुंगीसारखा बिलगून राहालो तर मी सहजी शंख मांत्रिकाच्या डोंगरावर जाऊन पोहोचेन. शंभर योजन भयंकर जंगलांतून चालत जाण्याचे श्रम टळतील व जीव धोक्यांत पडण्याची भीति राहणार नाही. हा तरी एक गमतीदार अनुभव आपल्याला मिळेल. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. केव्हां उजाडते आहे आणि केव्हा हे पक्षी उड्डाण करत आहेत असे झाले त्याला. शंभर योजन काही तासांत उडायला मिळणार...!

त्याच्या मनांत कपालिनीचा विचार देखील आल्याशिवाय राहिला नाही. तिला उचलुन आणण्याचा घाट घातला आहे का या शंखनें ! पण ती काही इतकी मूर्ख नाही...!! या पक्ष्यांच्या पंज्यांत सापडायला..? या पक्ष्यांना धरून ती कालसर्पाच्या स्वाधीन करील, झाले आणि त्याच्या तोंडांत सापडल्यावर कोण सुटणार??? चंद्रवर्माच्या डोक्यांत रात्रभर हेच विचार घोळत होते. त्याला झोप आली नाही. पूर्व दिशा फांकल्या आणि गरुड पक्ष्यांनी डोळे उघडले. एक विचित्र तन्हेचा आवाज काढून ते ओरडले आणि एकदाच आपले पंख फडफडवून त्यांनी अकाशांत उड्डाण केलें.

चंद्रवर्मा त्यांच्या पंखांत खोल शिरून बसला होता म्हणून त्याला थंडी वारा कांहीं लागत नव्हता. पक्षी उत्तर दिशेकडे उडत चालले आहेत हे पाहून त्याच्या मनाला समाधान वाटले. पाहता पाहतां ते कित्येक पर्वत, दरी-खोरी, नद्या व जंगलें पार करून एका डोंगराजवळ पोचले. त्यांच्या बोलण्यावरून त्याला कळलें की तोच डोंगर शंख मांत्रिकाचा डोंगर आहे, आणि त्याला तर तेथेच जावयाचे होते.

ज्या पक्ष्याच्या पंखांत चंद्रवर्मा बसला होता त्याने दुसऱ्या पक्ष्याला असे म्हणत एकाएकी सुरकांडी मारली

“मित्रा, पाहिलेस का ते सरोवर? पहा, त्यांत केवढी मोठी एक हत्तीच्या आकारासारखी मगर आहे. मगरीचे मांस खाऊन किती दिवस झाले."

असे म्हणत बाणासारखा तो त्या तलावाकडे अधोमुख होऊन उडत होता. पक्ष्याने इकड़े सुरकांडी मारली आणि हत्तीसारख्या त्या मगरीला दोन्ही पंज्यांनी उचलुन पुन्हां त्याने आकाशात उड्डाण केलें. हे किती एका क्षणार्धातच घडले असावे

या गडबडीत चंद्रवर्माच्या हाताची पकड सैल झाली व तो तोल सांवरता न आल्यामुळे खाली तलावांत जाऊन पडला. गरुड पक्ष्याला हे कळलें देखील नाही की त्याच्या पंखांत कोणी बसले होते आणि आता ते तलावांत पडले. त्याची नजर फक्त त्या अजस्त्र मगरीवर होती. भीतिमुळे अर्थातच चंद्रवर्माची नजर पण त्या मगरीवर होती. परंतु मगरीला गरुडाने उचलुन नेले आणि मग चंद्रवर्माचा हाथ सुटून तो तलावांत पडला. तलावांत दुसरी मगर नसेल कशावरून? ही धास्ती त्याच्या मनाला वाटत होती.

हे सर्व घडायला फार वेळ लागला नाही. क्षणार्धात सर्व गोष्टी घडल्या म्हटले तरी चालेल, ती ताडाएवढी मगर, पण ती सुद्धा त्या राक्षसी गरुड पक्ष्याच्या पंज्यांत असहाय होऊन तडफडत होती. चंद्रवर्मा ते दृश्य पाहूं शकला नाही. भयभीत होऊन त्याने डोळे घट्ट मिटून ठेविले. डोळे उघडून पाहिले तेव्हां त्याला तलावांतल्या मगरी घाबरून जाऊन आपापला जीव वाचविण्यासाठी पळत असलेल्या दिसल्या. त्याच्याकडे पहावयास एकाहि मगरीला वेळ नव्हता.

चंद्रवर्मा ते दृश्य एक क्षणभरच पाहु शकला असेल. नंतर तो पाण्यात बुडी मारून थोडा वेळ शांत पडून राहिला. पण पाण्यांत बुडी मारून तो किती वेळ राहू शकणार ! वर यावेच लागलें, वर येऊन पाहातो तो मगरी वाट फुटेल तिकडे पळत असलेल्या त्याला दिसल्या. पाण्यात मोठमोठ्या लाटा येत होत्या. त्याने विचार केला, हे सर्व ईश्वर कृपेनेच घडले. मी पाण्यात पडलों काय आणि या मगरी भिऊन पळत आहेत काय? नाहीतर ह्यांनी माझ्या अंगाचे लचके तोडून खाले असते. परंतु फार वेळ तलावांत पडून राहाण्यांत हि अर्थ नाही.

मगरी आतां घाबरल्या असल्या तरी थोड्या वेळानें स्थिर स्थावर झाल्यावर त्या माझ्यावर चारी बाजूनी तुटून पडतील. म्हणून शक्य तितक्या लवकर किनारा गाठला पाहिजे. किनाऱ्यावर झाडी होती आणि त्यांत लपून छपून पुढला मार्ग काढता येणे शक्य आहे. किनारा सुमारे दहावीस फुटावर होता. त्याला वाटत होते अगदी तसेच झाले. एकाएकी पाणी हलायला लागले व एक मोठी मगर तोंडाचा आ वासून त्याच्याकडे पोहोत येत असलेली त्याला दिसली.

चंद्रवर्मा भ्याला. काय करावे त्याला सुचेना. तो जोराने ओरडला. पण त्याचा बचाव करायला तेथे कोण येणार नाही, आपल्याला मरावयाचे नाही, असा मनाचा निर्धार करून त्याने सारी शक्ति एकवटून पोहण्यास सुरवात केली आणि एका मिनिटांत तो किनाऱ्यावर येऊन पोचला. मगरीने त्याला धरण्याची शिकरत केली. पण तिच्या हातची शिकार सुटली. तरी तिनें किनाऱ्यावर येऊन काही अंतर चंद्रवर्माचा पाठलाग केला, पण चंद्रवर्मा इतक्या जोराने पळाला की तिच्या हातांत किंवा जबड्यात सांपडला नाही. शेवटी निराश होऊन ती परतली.

चंद्रवर्मा दमल्यामुळे धापा टाकीत होता. एका झाडाच्या खोडाला टेकून त्याने थोडा वेळ दम घेतला. त्याला त्याच्या तलवारीची आठवण झाली. गरुड पक्ष्याच्या पंखांतून खाली पडत असतां नदीत तर नाही ना पडली? त्याने आपल्या म्यानेला हात लावून पाहिला. तलवार थोडी बाहेर आली होती. पण म्यानेंतच होती. म्यानेंत पाणी भरले होते. ते त्याने काढून टाकले आणि तलवार बाहेर काढून पुन्हां आंत ठेवली.

आतापर्यंत नशिबाने मला मदतच केली आहे. शंभर योजनांचे अंतर कष्टाशिवाय मी पार करून आलो. तलावांत पडलो पण मगरीचे भक्ष्य होण्यापासून मला नशिबाने वांचविले, आत्मरक्षणासाठी माझ्याजवळ ही जी एक तलबार आहे. ती सुद्धा तलावांत पडली नाही. बरें आतां पुढले काम, तो उठून उभा राहिला. त्याने समोरची झाडी बाजूला सारून एकदा तो प्रदेश पाहिला. समोर दूर त्याला एक डोंगर दिसला. त्याचे शिखर निमुळते व उंच होते, जणुकाही एकादा भोवराच कोणी उलटा करून ठेवला आहे. हिरवळ व झाडे-झुडपे पाहून त्याच्या मनाला फार आनंद झाला. एकूण तो प्रदेश नैसर्गिक सौदर्याच्या दृष्टीने रमणीक होता. याच पर्वतावर तो मांत्रिक राहातो म्हणावयाचा.

मी किती जवळ पोचलो आहे त्याच्या...?? तो शंख आणावयाचा आहे मला. तो त्याच्या घरच्या देव्हाऱ्यात आहे, एका सांपाच्या गळ्यांत त्याने घालुन ठेवला आहे. तो चोरून आणावयाचा आहे आणि त्या कपालिनीला द्यावयाचा आहे. त्यानंतर तिच्या कृपेनें आपण सूटणार आहोत. आतापर्यंत सर्व काही ठीक झाले, पण पुढे काय वाढून ठेवलाय कुणास ठावूक....!!! तो शंख आणावयाचा कसा?? आणि मिळाल्यावर कपालिनीला नेऊन दयावयाचा कसा? त्याने एक सुस्कारा सोडला. कपालिनीचा निरोप घेऊन तो निघाला तेव्हा त्याच्या समोर तें शंभर मैलांचे अंतर कापून कसे जावयाचे हा प्रश्न होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel