इकडे कालसर्प व अग्निपक्षी दोघांची झुंज जंपली होती. ती झुंज पाहूनच पाहाणाराच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहिला नसता. चंद्रवर्माच्या अंगावर शहारे उभे राहाले. अग्निपक्षी आपल्या अणकुचीदार चोचीने कालासर्पाला घायाळ करीत होता. त्याची तोडें रक्तबंबाळ झाली होती. इकडे कालसर्प अग्निपक्ष्याचे पोट किंवा मानगुटीला चावा घेण्याचा प्रयत्न करीत होता. पक्ष्याने एक दोनदां कालसर्पाला आपल्या पंज्यांत घरले, पण कालसर्प पोटाला चावा घेतो की काय या भीतीने त्याने कालसर्पाला सोडून दिले.
अग्निपक्ष्याच्या अंगांतून ज्वाळा येत होत्या. त्यामुळे कालसर्पाचे अंग होरपळून जात होते. पण कालसर्पाने माघार घेतली नाही. त्याच्या तोंडातून येणाऱ्या विषारी वायूनें अग्निपक्ष्याला गुदमरून गेल्यासारखें होत होते. त्याचे पंजे गारठू लागले व अंगांत त्राण उरला नाही.
“या दोघांच्या झुंजीचा आवाज त्या शंखाच्या कानावर पडला तर तो इथे आल्याशिवाय राहणार नाही.” चंद्रवर्मा म्हणाला.
"त्याची काळजी करण्याचे कारण नाही. तो आतां घोरत पडला असेल, अग्निपक्षी त्याचा पाहारेकरी आहे. तो जागेवर असल्यावर शंखाला कसली हि भीति वाटत नाही. सूर्यास्त झाल्याबरोबर तो झोंपतो व सूर्योदयापूर्वी उठतो. मला तें सर्व माहीत आहे." कपालिनी म्हणाली.
इतक्यात अग्निपक्ष्यानं ओरडण्याचा प्रयल केला. परंतु तो ओरडू शकला नाही. कोणी तरी त्याचा गळा आवळला होता. तें कालसर्पाचे काम होते. त्याचे डोके लोंबकळू लागल्यावरच कालसर्पानं आपली पकड सैल केली आणि पुढील हल्ला करण्यासाठी आपल्या तीन हि फणा वर उचलून उभा राहिला.
“जय कालसर्प की...!"
असे ओरडावें असें चंद्रवर्माला वाटले. परंतु तो सावध झाला आणि गुहेच्या बाहेर गंमत पाहायला उभा राहिला. कपालिनीच्या अंगांत देखील एकाएकी कोठून शक्ति आली कोण जाणे, ती देखील बाहेर आली. चंद्रवर्मा व कपाकिनी दोघं ती झुंज पाहायला बाहेर येण्यापूर्वीच अग्निपक्ष्याने मान टाकली होती व तो जमिनीवर लोळत पडला होता. कालसर्पाच्या अंगावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. दोघांनी जवळ जाऊन त्याच्या अंगावर प्रेमाने हात फिरवला. कपालिनी म्हणाली
“कालसर्पा...! आतां तूं शापमुक्त होण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे. तो शंख माझ्या हाती येऊन पडला की तुझें कार्य संपलें समज. तुला पुन्हां मनुष्य रूप मिळेल व तुझ्या सर्व यातना संपतील. नंतर तू तुला वाटेल तिकडे जा."
शंख मांत्रिकाच्या शंखाचें नांव ऐकताच चंद्रवर्माला पूजागृहाची आठवण झाली व त्याच्या अंगावर शहारे उभे राहाले. तरी पण धीर करून तो कपालिनीला म्हणाला
“कपालिनी, सूर्योदयाला आता फार वेळ उरलेला दिसत नाही. त्या शंखाच्या पूजागृहाकडे जातो."
कपालिनीनें पूर्व दिशेकडे पाहिलें, दिशा फांकू लागल्या होत्या. ती म्हणाली
“या वेळी त्या पूजागृहाकडे जाण्यांत शहाणपण नाही. त्या शंखाला वाटेला लावण्याचा दुसराच एक उपाय मी योजला आहे."
"तो काय बुवा!" चंद्रवर्माने विचारले.
“शंख दररोज सूर्योदयाच्या सुमारास त्या पूर्वेकडील टेकडीजवळ जातो. तेथे एका दगडावर उभा राहून स्वतःभोवती प्रदक्षिणा करीत काहीतरी मंत्र पुटपुटतो. तो एक चौरस असा दगड आहे. त्या दगडाजवळ पलीकडे हजार फूटाहून जास्त खोल अशी एक दरी आहे. मी सांगते तसें केलेंस तर त्या दगडा सकट त्या शंखाचा कडेलोट होईल व सुंठेवांचूनच खोकला जाईल." कपालिनी म्हणाली.
“मग सांग तो उपाय. तुला वाटेल ते करायला मी तयार आहे." चंद्रवर्मा म्हणाला.
"थोडा जवळ ये..! सांगते."
चंद्रवर्मा जवळ आल्यावर कपालिनीने काही तरी त्याच्या कानांत सांगितले व म्हणाली
"हें पहा...! सावधगिरीने वाग. जर चुकलास तर आता पर्यंतची सारी मेहनत फुकट जाईल. एवढेच नव्हे, तर तुझा जीव पण धोक्यांत पडेल...! विसरू नकोस...!"
चंद्रवर्मा क्षणभर विचार करीत जागच्या जागी उभा राहिला. नंतर एका उंच झाडावर चढून त्याने पूर्वेकडे पाहिले. खाली उतरून तो कपालिनीला म्हणाला
"कपालिनी ! सूर्योदय व्हायला फार उशीर लागणार नाही. मी आपल्या कामावर जातो. तूं व कालसर्प गुहेत स्वस्थ विश्रांति घ्या."
असे सांगून त्याने आपली तलवार म्यानेंतून बाहेर काढली व झाडींत पार नाहीसा झाला. त्याने वडाच्या पारंब्या भराभर कापल्या आणि त्या जोडून एक लांब दोरी तयार केली. त्या दोरीचे वेटोळे करून ते खांद्यावर टाकले. आणि झपाझप डोंगर चढू लागला. कपालिनीने सांगितल्याप्रमाणे टेकडीच्या टोकाला एका मोड्या शिळेवर त्याला एक चौकोनी दगड दिसला.
त्या दगडाला दोरीचें एक टोंक त्याने घट्ट आवळून बांधले. त्याच दगडावर मांत्रिक शंख येऊन रोज सूर्योदयापूर्वी उमा राहात होता आणि मंत्रोच्चार करीत होता. त्याने दोरीचे दुसरे टोक टेकडीच्या खाली दरीत सोडले. काम पुरे करून चंद्रवर्मा डोंगरावरून खाली आला व कपालिनीला येऊन भेटला.