चन्द्रवर्माला त्यांतील काहींच माहीत नव्हते, पण त्या माणसाच्या बोलण्यावरून त्याने एवढे ताडले को स्वतःच्या मुलाला कोणा राजाच्या सैनिकांनी पकडून नेलें आहे म्हणून रागात आणि दुखःत आहे आणि तेथे त्याचा छळ होत असला पाहिजे. हे सर्व असले तरी आल्या प्रसंगाला कसे तोंड द्यावे, या विचारांत तो होता.
इतक्यात त्याला एक युक्ति सुचली. तो म्हणाला
"आपण कोण आहांत हे मला माहीत नाही. आणि कोणत्या राजाच्या सैनिकांनी आपल्या मुलाला पळवून नेलें आहे त्यालाहि मी ओळखत नाही. आपण विनाकारण केवळ गैरसमज करून माझ्यावर संशय करीत आहात. ही माझी तलवार घ्या..! ही आपण ठेवा, म्हणजे आपल्याला माझ्यापासून भितीचे कारण राहणार नाही. मग आपण मोकळेपणाने बोलु." चंद्रवर्माने आपली तलवार पुढे करतांच त्या माणसाने ती हिसकावूनच घेतली व म्हणाला
"ठीक आहे आतां...! मागें पण तरी सुद्धा लक्षात ठेवेन, जरा जरी गडबड केलीस तर जिवंत राहाणार नाहीस."
चंद्रवर्माच्या जिवात जीव आला. त्याने मागे वळून पाहिले. त्याच्या समोर एक सत्तर वर्षांचा म्हातारा उभा असल्याचे त्याला दिसले. त्याने केस आणि दाढी अगदी अंबाडी सारखी पांढरी झाली होती. तोंडावर सुरकुत्या पडल्या होत्या. डोळे लाल होते. त्याच्या एका हातांत भाला व दुसऱ्या हातांत तलवार होती.
चंद्रवर्मा आपले सर्व धैर्य एकवटून चेहेऱ्यावर निर्भयता दाखवून म्हणाला
"मी राजसैनिक नाही. उलट एकदा मीच एका देशाचा राजा होतो. पण दैवगतीने आज जंगलात भटकत आहे. आपण म्हणता तसे कोणी व कोणत्या राजाच्या आज्ञेनें आपल्या मुलाला पकडलें आहे?? कोठे आहे त्याचे राज्य..?"
"तूं आतां कोणाच्या राज्यात आहेस हे सुद्धा तुला माहीत नाहीं आश्चर्य आहे...!" म्हातारा म्हणाला.
चंद्रवर्माने नकारार्थी मान हलविली. क्षणभर म्हाताऱ्याने त्याला निरखून पाहिले आणि डोळे विस्फारून व थोडी मान डोलवून तो म्हणाला
"तुझ्या बोलण्यावरून आणि कपड्यावरून खरें वाटते आहे. तू म्हणालास त्याप्रमाणे खरोखरच तुझें राज्य गेले असेल तर ते परत मिळविण्यास मी तुझी मदत करीन. पण तूं मला मदत करशील असे वचन दे."
"माझ्याकडून आपण कशा त-हेच्या मदतीची अपेक्षा करता?" चंद्रवर्माने विचारले.
“रुद्रपुरचा राजा शिवसिंह माझ्या मुलाला पकडून घेऊन गेला आहे. त्याच्या सैनिकांपासून लपत छपतच मी येथे राहात आहे. पण अशा त-हेनें फार दिवस राहू शकेन असें मात्र वाटत नाही. तो मला पकडण्याच्या तयारीत आहे. जर त्याने आत्तापर्यंत माझ्या मुलाला मारून टाकले असेल तर आपण काही करू शकणार नाही आणि जर नसेल तर मी त्याला संतुष्ट करण्यासाठी 'कांशाच्या किल्ला’चा मार्ग दाखवीन." म्हातारा म्हणाला.
"कांशाचा किल्ला"
चंद्रवर्माने आश्चर्याने म्हटले.