(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) 

यावरून सचिन व संगीता या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले.एवढी महत्त्वाची बातमी सचिनने इतक्या दिवस दडवून ठेवली हे भांडणाचे प्रमुख कारण होते .

दोन दिवसांनंतर दोघांचा संवाद सुरू झाला.सचिनचे म्हणणे असे होते .आईची जबाबदारी आपल्यावर आहे हे मला पूर्ण माहीत आहे. आपण तिघेही परदेशात जावू .आई आपल्याजवळ राहतील.

संगीता म्हणाली आपले ठीक आहे.आपण कामात असू .आपण एकमेकात गुंतलेले आहोत.आपल्याला नवीन मित्र मैत्रिणी मिळतील .नवीन वातावरणाशी परिस्थितीशी आपण सहज जुळवून घेऊ.आपण सहज अमेरिकन होऊ.आईचे तसे नाही .तिची पाळेमुळे इथे खोलवर रुजलेली आहेत.तिच्या मैत्रिणी तिचे नातेवाईक सर्व इथे आहेत . ती परदेशात गेली तर तिला तिथे करमणार नाही.तिचा वेळ आनंदमयी होणार नाही.तिथली हवा तिला सोसणार नाही.आपले झाड परदेशात पाळेमुळे घट्ट धरील फुलेल  फळेल तरारेल तसे तिचे होणार नाही. ते झाड वाळून जाईल .

माझ्यावरील प्रेमापोटी ती सर्व काही सहन करील.परंतु मला तिचे अंतरंग, तिचे मन,तिच्या आवडीनिवडी, तिचा स्वभाव,माहीत आहे.ती कांही बोलणार नाही. तिला दुखवून मला सुख लागणार नाही .मी परदेशात येऊ शकत नाही .आपण आपल्या नात्याला इथेच पूर्णविराम देऊया .आपण चांगले मित्र राहू .तू दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून सुखी हो.माझे मी पाहून घेईन.मी अविवाहित राहायचे ठरविले आहे .कदाचित जन्मभर मी अविवाहित राहीन.भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे कोणालाच माहीत नाही.निदान काही दिवस तरी आपण एकमेकांना भेटल्याशिवाय राहूया.या धक्क्यातून सावरायला मला वेळ पाहिजे .

दुसऱ्या दिवसापासून सचिन यायचा बंद झाला .परदेशी जाण्यावरून दोघांमध्ये वितंडवाद झाला असला पाहिजे हे शोभाने ओळखले. संगीताचा उतरलेला चेहरा ,संगीताची अस्वस्थता ,संगीताची होणारी तडफड ,तिच्या लक्षात आली.जेव्हा दोन व्यक्तींचे एकमेकांवर खरे प्रेम असते त्यावेळी हृदयाची भाषा हृदयाला सहज कळते.शब्द आवश्यक नसतात . दोन तारांना जर सारखाच ताण असेल तर एकातील ध्वनि दुसऱ्यात उमटतो .

शोभाने चार दिवस तसेच जावू दिले.नंतर एक दिवस ती संगीताला म्हणाली.मी काय आज आहे उद्या नाही .तुला तुझे सर्व आयुष्य समोर पडलेले आहे. माझ्यासाठी तू तुझे आयुष्य उध्वस्त करू नकोस.मला माझे नातेवाईक इथे आहेत .माझे भाचे भाच्या आहेत.कुणाकडेही मी आनंदाने राहीन.मी तुझ्याकडे अमेरिकेत येणार नाही असे म्हणत नाही. मी अवश्य येईन.मला माझी नातवंडे बघायची आहेत.मला तुझा सुखाचा संसार पहायचा आहे.परंतु मी तिथे तुझ्याजवळ कायमची राहू शकणार नाही. मला तिथे करमणार नाही.काही दिवस तिथे राहून मी माझ्या मातीत पुन्हा येईन.माझी माती याच मातीत मिसळावी अशी माझी इच्छा आहे.परकी माती ती परकी माती.ती माझी होऊ शकत नाही.

आईचे बोलणे ऐकता ऐकता संगीताला घळाघळा रडू येऊ लागले.आई वरवर जरी हसत हसत समजुतीने शांतपणे धीरगंभीरपणे बोलत असली,मी अतिशय नॉर्मल आहे, जसे कांही झालेच नाही, असे दाखवीत असली, तरी तिचे आक्रंदत  असलेले, जखमी झालेले, भळाभळा रक्त वाहत असलेल हृदय, संगीताला स्पष्ट दिसत होते .ती आईला बरोबर ओळखून होती.माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी ती स्वत:च्या भावना लपवून ठेवीत आहे .मी सचिनला आता येथे येऊ नको, मला भेटू नको, आपला संबंध संपला, हे सांगितल्यापासून माझ्या हृदयाची होणारी तडफड, माझ्या हृदयाला होणाऱ्या वेदना,माझा मूक अश्रुपात ,माझी रात्र रात्र जागरणे,माझे जागरणामुळे सुजलेले डोळे, माझ्या डोळ्याखालील काळी वर्तुळे पाहून, तिच्या हृदयावर दगड ठेवून, माझ्या सुखासाठी आई हे सर्व बोलत आहे ,हे संगीताच्या लगेच लक्षात आले होते .

सचिन रोज दिवसातून दहादा संगीताला फोन करीत होता.तिला बघितल्याशिवाय, तिच्याशी बोलल्याशिवाय, तिचे सांत्वन केल्याशिवाय, त्याला रहावत नव्हते. त्याला तिची समजूतही घालायची असे .आज ना उद्या ती आपले म्हणणे प्रेमापोटी मान्य करील अशी आशा त्याला होती. ती तर फोन उचलत नव्हती.जो संबंध पुढे जात नाही,ज्या संबंधाला आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे, तो पुढे वाढवू नये, तश्या  संबंधातून फक्त दुःखच निर्माण होते.असे संगीताचे मत होते.फोन वाजल्यावर ती फोनच्या स्क्रीनकडे बघत असे .स्क्रीनवर सचिनचे नाव व सचिनची छबी दिसत असे.फोन उचलावा, त्याचा आवाज कानी पडावा, असे तिला उत्कटतेने वाटे .मन कठोर करून ती फोन कट करीत असे.फोन स्विच ऑफ ठेवावा ,फोन चार्जच करू नये ,असे तिला वाटे .परंतु आजच्या जगात फोनशिवाय जगणे कठीण आहे.वेळ घालवण्याचे ते एक उत्कृष्ट साधन आहे .घरबसल्या जगाशी संपर्क ठेवण्याचे ते एक उत्तम साधन आहे .फोनची रिंग वाजे.फोन सचिनचा असे.ती कठोरपणे तो तोडीत असे.

गोष्ट मोठी अवघड झाली होती .त्रिकोणाचे बिंदू एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते .सचिन संगीताशिवाय राहू शकत नव्हता .संगीताला सचिन व आई दोन्हीही पाहिजे होती.शोभा संगीताशिवाय राहू शकत नव्हती.संगीताच्या सुखासाठी, संगीताच्या आनंदासाठी, संगीताचे आयुष्य आनंदात जावे म्हणून,तिने मन घट्ट करून संगीताला तू सचिनबरोबर अमेरिकेत जा म्हणून सांगितले होते.तिला तर अमेरिकेत कायमचे जायचे नव्हते.

कोणाला तरी आपला हट्ट सोडून द्यावा लागणार होता .परस्परांचा त्याग करून कुणीही समाधानी होणार नव्हते .

एक दिवस सचिन संगीताला भेटण्यासाठी घरी आला .बेल वाजल्यावर संगीताने दरवाजा उघडला .ती सचिनच्या तोंडावर दरवाजा बंद करू शकली नाही .तिने सचिनला आपण भेटायचे नाही असे ठरवले होते ना ?असे विचारले.त्यावर सचिन एवढेच म्हणाला मी तुला भेटायला आलो नाही.मी आईना भेटायला आलो आहे.

तो तडक आईना भेटायला गेला.त्यांनी अमेरिकेत यावे, कायमचे तिथे राहावे, म्हणून त्यांची समजूत घालीत होता.तिथे महाराष्ट्रीय मंडळी आहेत .तिथेही गणेशोत्सव, दिवाळी आणि इतर सण साजरे होतात.हळदी कुंकू पाडवा थाटामाटात साजरा केला जातो .आपली देवळे तिथे आहेत .प्रवचन कीर्तन चालू असते .आपले खाद्यपदार्थ तिथे मिळतात. तुम्हाला तिथे मैत्रिणी मिळतील.तुम्ही थोड्याच दिवसांत तिथल्या होउन जाल.मला आई वडील नाहीत.दुर्दैवाने त्यांचा मृत्यू  अपघातात काही वर्षांपूर्वी झाला.आता तुम्हीच माझ्या आई आहात. तुम्ही संगीताला समजावून सांगाल तर संगीता ऐकेल. 

त्याच्या बोलण्यावर आई म्हणाल्या .मी इतके दिवस हीच गोष्ट संगीताला समजून सांगत आहे .मी अमेरिकेला यायला तयार आहे .मी तिथे काही काळ राहीन.तुमच्याजवळ कायमची राहणार नाही .तुम्ही सांगता ते मला समजत आहे .माझी पाळेमुळे येथे घट्ट रुजलेली आहेत.तिथे मी कायम राहिले तरी मी वठून जाईन.आईच्या या बोलण्यावर बोलण्यासारखे काहीच शिल्लक रहात नव्हते . 

आईंचा निरोप घेऊन सचिन संगीताला भेटायला गेला.तिने आईचे सर्व बोलणे ऐकले होते.आई आपल्या सुखासाठी हे सर्व सांगत आहे हे तिला जाणवत होते .ती सचिन आला म्हणून चहा करून तयार होती .आई संगीता व सचिन यांनी मुख्य विषय सोडून इतर विषयांवर गप्पा मारल्या.

एक नवीन त्रिकोण झाला होता .कुणीही आपला हट्ट सोडायला तयार नव्हता.सचिन अमेरिकेला जाण्याचा हट्ट ,संगीता आईचे मन जाणून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा हट्ट,आई अमेरिकेला कायम राहणार नाही अशा प्रकारचा हट्ट ,कुणीतरी आपला हट्ट सोडल्याशिवाय हे कोडे उकलणार नव्हते. शोभाचा व संगीताचा हट्ट परस्परांवरील प्रेमापोटी होता.सचिनचा हट्ट केवळ अमेरिकेच्या आकर्षणापायी होता 

संगीताला सचिनच्या प्रेमापेक्षा आईचे प्रेम जास्त महत्त्वाचे वाटत होते.

सचिनला संगीताच्या प्रेमापेक्षा अमेरिकेवरील प्रेम जास्त  महत्त्वाचे वाटत होते.  

शोभाला अमेरिकेपेक्षा भारतात राहणे जास्त सुखावह वाटत होते.शोभाची संध्याकाळ जवळ आली होती.

वयाबरोबर लवचिकता कमी होत जाते.जुळवून घेणे (अॅडजस्टमेंट) कमी होत जाते.जुळवून घेतले तर ते नाइलाजाने असते .त्यातून कळत नकळत थोडे किंवा जास्त दुःख निर्माण होते.

दुसऱ्या दिवशी सचिनचा फोन आला .यावेळी संगीताने फोन घेतला.आईजवळ झालेले बोलणे तो सांगत होता.आई अमेरिकेला जायला तयार आहेत एवढेच तो बोलला .फक्त काही काळ हे तो मुद्दामच बोलला नाही.संगीताने आई सचिनजवळ जे काही बोलली ते ऐकले होते.सचिनजवळ ती जे  काही बोलली ते ती अगोदरच संगीताजवळ बोलली होती.

आता आई मी तुमच्याजवळ कायमची राहायला येते असे जरी म्हणाली असती,तरी ती केवळ मुलीच्या सुखासाठी त्याग करीत आहे  हे संगीताच्या लक्षात आले असते.तिला आईचा त्याग नको होता .तीच आपल्या सचिनचा त्याग करायला तयार झाली होती .

आता चेंडू सचिनच्या कोर्टात होता.

दुसऱ्या दिवशी संगीताच्या मोबाइलवर सचिनने अमेरिकेतील हॉस्पिटलला पाठविलेल्या  राजीनामापत्राची कॉपी होती.  

(समाप्त)

२१/६/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel