(ही कथा काल्पनिक आहे वास्तवाशी साम्यआढळल्यास तो योगायोग समजावा)

दादा व नाना राजूला घेऊन बागेत आले होते .दोघेही शेजारी शेजारी राहत असत .राजूचे नाना हे आईचे वडील,व  दादा हे वडिलांचे वडील होते .दादांच्या डोक्यावर डाव्या बाजूला जखमेची एक मोठी खूण होती .राजू दादांना नेहमी ही खूण कसली असे विचारीत असे . जिन्यावरून धावत असताना मी खाली पडलो त्याची ही खूण असे नेहमी दादा सांगत .राजू धावायला लागला की नेहमी ते आपल्या डोक्याकडे बोट करीत .राजूच्या लगेच लक्षात येईल आपण जोरात धावता कामा नये .नाहीतर दादांसारखेच आपले डोके फुटेल.जखम होईल. हॉस्पिटलमध्ये जावे लागेल.इंजेक्शन घ्यावे लागेल.दादांचा मूड असला तर ते आपण कसे धावत होतो, आपल्या मागे कोण होते, पाय कसा घसरला . जिन्यावरून आपण गडगडत कसे गेलो ,मग त्यांना हॉस्पिटलमध्ये कसे नेले, वगैरे सर्व गोष्टी खुलवून सांगत असत .

राजूचा वेळ जात नसला की तो दादांना तुमच्या डोक्याला काय झाले म्हणून विचारीत असे .आणि दादाही नेहमी खुलवून गोष्ट सांगत असत .

आजही राजूने बागेत आल्यावर दादांना तुमच्या डोक्याला काय झाले म्हणून विचारले .त्यावर दादानी हसून आज वेगळे उत्तर दिले.ते  म्हणाले या तुझ्या नानाला विचार .तुझ्या नानाने मारले त्याची ही खूण आहे.दादा आपली गंमत करीत आहेत हे राजूने ओळखले तो हसून आपल्या मित्रांबरोबर  खेळण्यासाठी धावला.

दादा असे म्हणाल्यावर नानांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला .दादा नानांकडे निरखून पाहात होते .नाना विचारात गढून गेले होते.दादाही  जुन्या कटू आठवणीमध्ये बुडाले.

दादा चव्हाण व नाना जाधव यांची घरे शेजारी शेजारी होती.डोंगरापासून कोळीवाड्यापर्यंत सलग लांबलचक जमिनीचा पट्टा त्यांच्या मालकीचा होता. हल्ली गावापर्यंत  मोटारीचा रस्ता झालेला आहे एवढेच काय कोळीवाड्यातूनही  मोटारीचा रस्ता गेलेला आहे .फार पूर्वी मोटारीचा रस्ता गावापासून पाच सहा किलोमीटरवर होता .त्या वेळी कोळीवाडय़ातून तसेच गावातूनही लोकांना पाच सहा किलोमीटर चालल्यावर मोटारीपर्यंत जाता येत असे.त्यावेळी  कोळीवाड्यातील सर्वजण दादा व नाना या दोघांच्या इस्टेटीच्यामधून गेलेल्या रस्त्यावरून जात असत .या रस्त्याला ~बांधावरील रस्ता~ असे म्हटले जाई.हा रस्ता संपल्यावर नंतर एक डोंगर चढून व उतरून जावे लागे.तेव्हाच बसस्टॅण्ड येत असे .फार पूर्वी जेव्हा मोटारी नव्हत्या व बैलगाडीतून प्रवास करावा लागे तेव्हा देखील या बांधावरील रस्त्याचा उपयोग केला जाई.दादासाहेब चव्हाणांच्या पूर्वजानी हा बांधावरील रस्ता बांधला होता .हा रस्ता दादासाहेबांच्या मालकीच्या इस्टेटीत होता.तो सार्वजनिक नव्हता.जुन्या काळी इस्टेटीला कंपाऊंड बांधताना हा बांधावरील  रस्ता मोकळा सोडून नंतर कंपाउंड बांधण्यात आले होते .

नानासाहेबांच्या बाजूला मात्र पक्के कायमस्वरूपी कंपाऊंड नसून दरवर्षी तात्पुरते काटेरी कुंपण केले जाई.पावसामध्ये पाणी भरल्यावर या बांधावरील रस्त्यावरून जाणे कठीण होई.त्यामुळे त्याकाळी दादासाहेबांच्या पूर्वजानी दोन फूट उंच धक्का बांधून त्यावरून हा रस्ता तयार केला होता.हा रस्ता रुंदीला तीन फूट होता .म्हणजेच दादासाहेबांची एक किलोमीटर लांब व एक मीटर  रुंद एवढी जमीन पिकविता येत नव्हती .काही जणांनी दादासाहेबांना असे सुचविले होते की तुम्ही हा रस्ता तुमच्या कुंपणात घ्या .कोळीवाड्यातील लोक लांबच्या रस्त्याने जातील .आज ना उद्या कोळीवाड्यात रस्ता होईल तेथे बस मोटारी येऊ लागतील .अशा वेळी चव्हाणानी कुंपण करण्याचे बंद केले की सर्व जमीन त्यांच्या मालकीची होईल .दादासाहेब हसून ती गोष्ट सोडून देत असत .त्या वेळचे त्यावेळेला बघू कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय मी होऊ देणार नाही.त्यांना खूप लांबून जावे लागेल .

काही काळाने  लोक म्हणत होते तसेच झाले. कोळीवाड्यात रस्ता झाला तेथे बस येऊ लागली.कालमानानुसार लोकांची परिस्थिती सुधारली. मोटारसायकल स्कूटर मोटारी कोळीवाड्यातील लोकांनी विकत घेतल्या.कोळीवाड्यात एक थ्री स्टार हॉटेलही  आले.बांधावरचा रस्ता आता कुणी वापरत नाहीसे झाले .

नाना चव्हाणांनी कुंपण घालण्याचे बंद केले.आता दादासाहेबांचे कुंपण अायतेच नाना चव्हाणांना मिळाले.फक्त उंच बांध सपाट करून टाकला की काम झाले.नाना चव्हाणांनी बांध सपाट करण्याचे काम सुरू केले .नानांनी अर्थातच त्याला विरोध केला .ही तीन फूट जागा माझी आहे मी आता कुंपण त्यापलीकडे घालणार आहे असे त्यांनी नानाना सांगितले .ही जागा कुणाची असा वाद निर्माण झाला .तलाठ्याला आणण्यात आले जागा मोजण्यात आली.जागा दादासाहेबांची आहे असे निश्चित झाले .दादांनी जुने कुंपण काढून टाकून बांधापलीकडे  नवीन कुंपण घालण्यासाठी मजूर बोलाविले.  जागा कुणाची हे निश्चित झालेले असूनही नानानी आडमुठेपणा केला. कुंपण घालण्याला अटकाव केला.जोर जबरदस्ती केली .जमिनीची मोजणी होऊनही अरेरावी केली .हम करे सो कायदा अशी वृत्ती दाखविली .शेवटी मी मी तू तू झाले.नानांनी शेजारीच पडलेली एक काठी घेऊन ती दादांच्या डोक्यात हाणली .जखम खोल व वर्मी झाल्याने दादा तिथेच बेशुद्ध पडले .एवढ्यात दादांकडच्या एका माणसाने नानानाही एक काठी मारली.नानाना मामुली जखम झाली.नानांनी खुनाचा प्रयत्न केला म्हणून पोलीस केस करा असे काही जणांनी सुचविले .परंतु दादांनी तसे काही केले नाही .उगीचच नाना अडकेल म्हणून दादानी तसे काही केले नाही.एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारू नये असे त्यांचे प्रांजळ मत होते. दोघांनाही एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच वॉर्डमध्ये एकाच खोलीत अॅडमिट करण्यात आले .

ही बातमी दोघांच्याही मुलांना समजली .दादांचा मुलगा पुण्यात नोकरीला होता तो लगेच गावी आला.नानांचा मुलगा मुंबईत होता मुलगी पुण्यात शिकत होती .दोघेही नानांना भेटण्यासाठी आले.दादांच्या मुलाचे लग्न व्हायचे होते.हॉस्पिटलमध्ये दादा व नाना दोघेही दहा दिवस होते.त्या काळात दादांचा मुलगा प्रणव व नानांची मुलगी सुरभी दोघांचीही दाट मैत्री झाली.

पुण्याला गेल्यावर तीच मैत्री पुढे सुरू राहिली .एक वर्षाने सुरभीचे शिक्षण पुरे झाले.दोघांनीही लग्न करण्याचे ठरविले .दादा व नाना यांना पटवायचे कसे असा प्रश्न होता . बांधावरील रस्त्यावरून झालेले महाभारत दोघांनाही माहीत होते .दोघेही आई वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करायला तयार नव्हती.आई वडिलांचे आशीर्वाद पाहिजेत असा दोघांचा आग्रह होता .आणि ते बरोबर होते .मोठ्यांच्या विरोधात जाउन केलेले कार्य मंगल कसे होणार?दोघांच्या आयांचा प्रश्नच नव्हता.त्यांना हे लग्न पसंत होते .या निमित्ताने भांडण संपावे असे त्यांना वाटत होते .नाना व दादा उगीचच भांडतात यावर दोघींचेही ठाम मत होते.दादा फक्त आपला हक्क मागीत होते.मागीत होते म्हणण्यापेक्षा हक्क बजावण्याचा त्यांचा आग्रह होता आणि तो चुकीचा नव्हता . उलट नानाच दादांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत होते.

नाना स्वभावाने तसे वाईट नव्हते .असे दादांचे मत होते .तर हे सांब भोळे आहेत असे त्यांच्या बायकोचे मत होते. मित्रांच्या चिथावणीला बळी पडून ते दादांशी भांडण्याला तयार झाले

होते.हेही दादांचेच मत.

त्या दिवसापासून दोघांमधून विस्तव जात नव्हता .दोघेही अंतर्यामी धुमसत होते .

दादांचे एक मन त्यांना सांगे की इतके दिवस ती जमीन तुझी कुठे होती?तुझ्या पूर्वजांनी ती इतरांसाठी सोडलीच होती ना ?मग तू उगीचच शेजाऱ्यांशी कशाला भांडतो ?त्यावर दादांचे दुसरे मन म्हणे मी उगीचच भांडत नाही. माझा हक्क मला पाहिजे.  

नानांचे मन त्यांना मुळातच खात होते .दादासाहेब बरोबर आहेत .ती जमीन त्यांचीच आहे .तलाठी मोजणीतही ते सिद्ध झाले आहे .उगीचच भांडत बसू नकोस शेजाऱ्याशी वैर चांगले नाही .आपले चुकत आहे आणि पूर्वीही चुकले हे त्यांना मनोमन कळून चुकले होते.शिवाय घरातून पत्नीही त्यांना अधूनमधून उपदेशाचे डोस पाजीत असे .

एक दिवस प्रणवने दादांजवळ विवाहाचा विषय काढला.

त्यावर दादा म्हणाले अरे मी तुला केव्हाचा लग्न कर म्हणून सांगत आहे परंतु तूच मला जरा स्थिर होऊ दे असे सांगत आला आहेस .अरे लग्नानंतरच स्थैर्य येते .

त्यावर हसून प्रणव म्हणाला दादा मला आता तुमचे म्हणणे पटले आहे.

दादा:  मुलगी कुठची आहे ?

प्रणव:शेजारचीच आहे .

दादा:मी तुझ्याकडे पुण्याला येतो तेव्हा मला तर कुठे दिसली नाही ?

प्रणव:पुण्याची नाही इथलीच शेजारची आहे .

दादा थोडा वेळ विचारात पडले आणि नंतर त्यांच्या लगेच लक्षात आले .

ते हसून म्हणाले तो नान्या तयार होईल का?

प्रणव:त्याला पटवायचे काम सुरभी करील

दादा:आणि तू मला पटवीत आहेस का ?

प्रणव:दादा नाही तुम्ही मनापासून हो म्हटले तरच आम्ही लग्न करू .

दादांचा तर प्रश्नच नव्हता त्यांनी लगेच होकार दिला.

नानांकडून ग्रीन सिग्नल आला .

शेवटी दोघांचे थाटात त्यांच्या गावीच लग्न झाले. 

आता कुंपण कुठे घालायचे हा प्रश्न राहिलेला नाही .

कुंपणाचा मधला भाग काढून टाकलेला आहे तिथे एक मोठे प्रशस्त फाटक बसवलेले आहे .

प्रणवची प्रमोशनवर मुंबईला बदली झाली आहे .

राजू आता सहा वर्षांचा झाला आहे .

*दादा व नाना जेव्हा मुंबईला येतात तेव्हा त्याला घेऊन शेजारच्या बागेत फिरायला जातात .*

*मुले जेव्हा गावाला येतात तेव्हा राजूला घेऊन दोघेही समुद्रावर बांधावरच्या रस्त्याने फिरायला जातात .*

*चव्हाण जाधव कुटुंबीय त्यांची मित्रमंडळी त्यांच्याकडे आलेले पाव्हणे जेव्हा समुद्रावर फिरायला  जातात तेव्हा बांधावरच्या रस्त्याचा वापर करतात.*

* दादांच्या डोक्यावरील जखम कशी झाली असे राजू केव्हा केव्हा विचारतो.*

*जिन्यावरून पडल्यामुळे हे त्याचे उत्तर राजूला पाठ आहे .* 

१२/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel