( ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
सागरला ज्या खोलीत ठेवले होते त्याच खोलीच्या जोडखोलीमध्ये सारिकाच्या वडिलांना ठेविले होते .दोन स्पेशल खोल्याना जोडणारा एक दरवाजा होता . तो दरवाजा बऱ्याच वेळा उघडा ठेवीत असत.पेशंटला त्यामुळे एकाकी न वाटता सोबत वाटत असे .डॉक्टर्स नर्सेस यांनाही एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटकडे चटकन जाता येत असे. काही वेळा एखाद्या पेशंटबरोबर कुणी तिथे राहू शकत नसे.अश्या वेळी ओळख झाल्यामुळे एका पेशंटकडे असणारी व्यक्ती दुसऱ्या पेशंटकडे लक्ष देऊ शकत असे.
सागरच्या आई वडिलांपैकी तिथे कुणीतरी सतत राहणे कठीण होते.सागरच्या वडिलांना त्यांचा व्यवसाय बघायचा होता तर त्याच्या आईला घरी मदत करण्यासाठी कुणी नव्हते . मंदावर विसंबून राहणे तिच्या लहान वयामुळे शक्यच नव्हते.किंबहुना मंदाकडेच पाहण्यासाठी कुणाचीतरी गरज होती .
मंदा बाबांना(सागरला) सोडून घरी येण्याला मुळीच तयार नव्हती.अश्या वेळी सारिकाचा सागरच्या आईला मोठा आधार वाटला. सारिकाने बाबांच्या आजारपणासाठी रजा काढली होती.तिच्या घरून कुणीतरी डबा घेऊन येत असे.त्यामुळे ती सतत तिथे राहू शकत असे.मंदा हा सारिकाला मोठा विरंगुळा होता.मोबाइलवर दोघी गेम खेळत. सारिकाला मुलांची आवड होती. ती निरनिराळ्या गोष्टी सांगून मंदाला रिझवत असे .मंदामुळे सारिकाची सागरशी ओळख झाली.सागरला ती मंदाचे बाबा म्हणून ओळखत होती. सागरशी गप्पा मारणे हा तिला एक विरंगुळा होता.दोघेही समवयस्क व समविचारी असल्यामुळे त्यांचे चांगले जुळत असे . त्यांना परस्परांबद्दल प्रेम व आपुलीक वाटू लागली होती.
एक दिवस बाथरूममधून येत असताना सागरचा पाय घसरला आणि तो जमिनीवर आपटला.एक हात मोडलेला आणि अशक्तपणा यामुळे त्याला उठता येईना.जवळपास सिस्टर वार्डबॉय कुणीही नव्हते.सारिका पटकन धावत आली. तिने हात देऊन त्याला उठण्यासाठी मदत केली. तेव्हापासून त्यांची मैत्री दाट व्हायला सुरुवात झाली .
गप्पा गप्पा मारता मारता दोघांनाही आपले स्वभाव जुळतात असे लक्षात आले .प्रेम जुळण्यासाठी स्वभाव जुळले पाहिजेत असे नाही .असे काय घटक आहेत की त्यामुळे दोन माणसांचे प्रेम जुळते हे सांगणे मोठे कठीण आहे .डोक्यात घंटी वाजली पाहिजे हेच खरे .किंवा आपण असे म्हणूया कि विवाह स्वर्गात ठरविले जातात आणि इथे भेट झाल्यावर दोघानाही आपला तो किंवा आपली ती भेटली असे वाटते .पसंत करण्यामागे काही तर्कशास्त्र असते असे नाही .पसंती अगोदर होते.आम्ही दोघेही अनुरूप कसे आहोत याची मांडणी दोघेही नंतर करतात.तात्पर्य दोघेही एकमेकांना आवडू लागले होते .सागरला मुलगी आहे हाच एक अडथळा होता.तिला तो अडथळा वाटत नव्हता कारण तीही मंदावर प्रेम करू लागली होती.
मंदा नावाचीही एक गंमत होती .मंदा शुद्धीवर आल्यावर तिला तिचे नाव विचारले .तिने बोबड्या उच्चारात दंदा असे सांगितले.त्यावरून बहुधा तिचे नाव मंदा किंवा नंदा असावे असे ठरविण्यात आले.मंदा नाव शेवटी निश्चित करण्यात आले.
सागरला भेटण्यासाठी त्याची पत्नी का येत नाही असे कुतूहल सारिकाला होते .त्याचा बहुधा घटस्फोट झाला असावा असा तिचा अंदाज होता .कदाचित काही कारणाने ती अंथरुणाला खिळलेली असेल आणि म्हणून ती येत नसेल असा आणखी एक अंदाज होता .त्याबाबतीत सागरला स्पष्ट विचारण्याचे धैर्य सारिकेला होत नव्हते . एक दिवस तिने मंदाला तुझी आई कुठे आहे म्हणून विचारले .मंदा काही उत्तर न देता रडू लागली .शेवटी सारिकाने तो विषय डोक्यातून काढून टाकला.घटस्फोट असो किंवा मंदाची आई मृत्यू पावलेली असो. मंदा पोरकी आहे हे निश्चित . आईची आठवण मंदाला वेदना देत होती .
सागरचा उमदा स्वभाव सारिकाला खूप आवडला .सागर घटस्फोटीत असो किंवा त्याची पत्नी मृत असो, त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही असे तिने मनोमन ठरविले होते .ती त्याच्या प्रेमात पडली होती .मंदाचा तिने मनोमन स्वीकार केला होता. सागरच्या मनाचा मात्र थांग लागत नव्हता .
सारिकाचे बाबा बरे होऊन घरी गेले.तरीही सारिका रोज एकदा सागरला भेटण्यासाठी हॉस्पिटलवर येत असे. सारिका सून म्हणून त्याच्या आई वडिलांना पसंत होती.मंदाने सर्वांना एवढा लळा लावला होता की तिला आपली नात म्हणून त्यांनी स्वीकारले होते .सागरही तिला आपली मुलगीच समजत होता .सागर घरी आल्यावर कायदेशीररीत्या दत्तकविधान करून त्याने तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला.
सागर पूर्णपणे बरा होऊन घरी गेला .सागर व सारिका यांची प्रेमकहाणी पुढे सुरूच राहिली .दोघांनाही एकमेकांना प्रत्यक्ष भेटल्याशिवाय चैन पडत नसे.दिवसातून किमान एकदा फोनवर भेट होतच असे .सारिकेला बऱ्याच वेळा असे वाटे की पुरुषानेच प्रपोज केले पाहिजे असे का ?आपल्याला सागर पसंत आहे तर आपणच त्याला प्रपोज करावे .पण तिला मनातून भीती वाटे ,आशंका वाटे, तो नाही म्हणाला तर ?
दोघांचे कोर्टींग त्या अपघातानंतर जवळजवळ एक वर्ष चालले होते.सागर भेटायला येतांना काही वेळा मंदाला बरोबर आणीत असे .सागरला सारिकाने मंदाचा पूर्णपणे स्वीकार केला आहे कि नाही त्याची खात्री करून घ्यायची होती . मंदा अपघाताने त्याच्याकडे आलेली मुलगी आहे कि त्याची सख्खी मुलगी आहे हे त्याने कधीच स्पष्ट केले नाही . मंदा आपली मुलगी आहे अशा परिस्थितीत दोघांचाही प्रेमाने जी स्वीकार करील तिलाच पत्नी म्हणून स्वीकारायचे हे सागरने निश्चित केले होते .
शेवटी एक दिवस सागरने सारिकाला मागणी घातली. गावाबाहेर डोंगरावर फिरायला गेलेले असताना त्याने सारिकाला तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे ते तू पूर्ण करशील का? मंदाची तू आई होशील का ?असे विचारले.
सारिकाने तितक्याच तत्परतेने उत्कटतेने तन्मयतेने त्याला होकार दिला .याच दिवसांची ती कितीतरी महिने उत्कंठतेने वाट पाहात होती .
दोन्ही कुटुंबांचा प्रश्नच नव्हता .या दोघांच्या मैत्रीचा शेवट विवाहामध्ये होणार याची सर्वांना कल्पना होतीच .
सारिकाने सागर घटस्फोटीत आहे की त्याची पत्नी मृत झाली आहे याची चौकशी केली नाही .त्याबद्दल कुणीच उच्चार केला नाही .
मंदाचा मुलगी म्हणून तिने पूर्णपणे स्वीकार केला होता .विवाहानंतर तिला सागरची ती मुलगी नाही. ती त्याला कशी मिळाली त्याची हकिकत कळली.तो घटस्फोटीत किंवा विधुर नाही हेही तिला कळले .
विवाहानंतर दोन वर्षांनी वसंताचा जन्म झाला . त्याला मंदा ही आपली थोरली बहिण ताई असेच वाटत होते .तेवढ्याच उत्कटतेने त्याने तिच्यावर प्रेम केले .सागर व सारिकाची आपण मुलगी असेच मंदा समजत होती.या तिच्या समजुतीला तडा जाईल असे कुणीही काहीही केले नाही .
मंदा मोठी झाल्यावर तिला सत्य सांगावे असे एकदा सागर व सारिकेला वाटत होते .परंतू विचारांती त्यांनी तो बेत रद्द केला. विचारांती त्यांनी ते रहस्य तसेच ठेवावे असे ठरविले.
पाहुणे मंडळीनी गजबजलेला असूनही रिकामा वाटणार्या मंडपात बसून भगभगणाऱ्या प्रकाशाकडे व निरनिराळ्या रंगांचा प्रकाश सोडणाऱ्या माळांकडे पहाताना सागरच्या मनात हा सर्व पट उलगडत होता.
त्याला त्याचा व सारिकाचा प्रेमविवाह आठवत होता. मंदा वसंत सागर व सारिका या चौकोनाची आठवण होत होती.
वसंता कितीतरी वेळ बाबांकडे पाहात होता. शेवटी त्याने येऊन बाबांना हाक मारली.
ताई गावातच आहे .आपण केव्हाही तिच्याकडे जाऊ शकतो. ती आपल्याला नेहमी भेटेलच.उगीच उदास होऊ नका. चला आपण घरी जाऊ या असे त्याने सुचविले.
वसंताच्या शब्दांनी सागर भानावर आला .स्मित हास्य करीत , वसंत व सारिका या दोघांच्याही हाताचा आधार घेत वसंत उठला आणि चौघेही आता रिकाम्या पडलेल्या मंडपाकडे पाहात मोटारीतून आपल्या बंगल्याकडे रवाना झाले .
(समाप्त)
३१/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन