( ही कथा काल्पनिक आहे कुठे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)
सागर व सारिका यांची मंदा ही एकुलती एक लाडकी मुलगी होती .सागर व सारिकाने आज त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते. मंदा व सुबोध यांचा प्रेमविवाह होता.दोनही घरच्या मंडळींच्या संमतीनेच हे लग्न झाले होते. मंदा व सुबोध ही आज लग्न झाल्यावर त्याच्या कुटुंबीय मंडळीसह फुलांनी सजविलेल्या मोटारीतून नुकतीच रवाना झाली होती. मुलींची बिदाई केल्यावर काही प्रमाणात खिन्नता येणे स्वाभाविक होते .आनंद व उदासी यांचे एक मिश्रण सागर व सारिका यांच्या मनात दाटून आले होते. पाहुणे मंडळीनी मंडप भरलेला असूनही रिकामा वाटत होता. मुलगी हे परक्याचे धन ती आज ना उद्या लग्न होऊन सासरी जाणारच याची जरी पहिल्यापासून कल्पना असली, तरीही मुलगी सासरी जाताना खिन्नता व आनंद या भावना संमिश्रपणे आईवडिलांच्या मनाला व्यापून टाकतातच .
सुबोध ओळखीचा होता. सुबोध चांगला मुलगा होता.सुबोध व मंदा यांचा प्रेमविवाह होता.मंदाच्या संमतीने चांगल्या सुसंस्कृत कुटुंबात तिचा विवाह होत असल्यामुळे सागर व सारिका सुखी व समाधानी होती. तरीही एकुलती एक लाडकी मुलगी सासरी गेल्यामुळे दोघेही किंचित उदास व किंचित आनंदी अशा मिश्र मन:स्थितीत दमून भागून खुर्चीत बसली होती .रात्रीचे जवळजवळ बारा वाजले होते .सकाळी लग्न, नंतर भोजन समारंभ व संध्याकाळी स्वागत समारंभ,यामुळे दोघेही दमून गेली होती .त्यांचा मुलगा वसंता त्याची ताई सासरी गेल्यामुळे थोडा उदास होता .त्याने सागर व सारिका यांच्या पुढय़ात बसून त्यांचे हात आपल्या हातात घेतले.केवळ स्पर्शातून त्याने आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवल्या .
एवढ्यात कुणीतरी हाक मारल्यामुळे तो उठून तिकडे गेला. नातेवाईक मंडळींची मांडवात गडबड चालली होती . गावातील मंडळी सागर व सारिकाचा निघताना निरोप घेत होती.परगावची मंडळी निरोप घेऊन आपापल्या गाडीनुसार किंवा त्यांच्या स्वतःच्या गाडीतून प्रयाण करीत होती. जिकडे तिकडे एकच कोलाहल माजला होता .
सागरला यातील काहीच ऐकू येत नव्हते तो स्वतःच्या विचारातच गुरफटला होता .सागरला मंदाच्या लहानपणापासूनच्या सर्व घटना आठवत होता .
मंदा त्यांच्या कुटुंबाचा एक घटक झाली त्या दिवशी तो ऑफिसमधून घरी जात होता. त्याचे वडीलही त्याच्याबरोबर होते .झेब्रा क्रॉसिंगवर त्याची गाडी थांबली होती .डाव्या बाजूला एक कोरी करकरीत मोटार येऊन थांबली होती .त्याचे सहज त्या गाडीकडे लक्ष गेले.नंबर प्लेट परराज्यातील होती .त्या अर्थी बहुधा मंडळीही परराज्यातील असावीत.त्या गाडीत मागच्या सीटवर एक तीन चार वर्षांची मुलगी बसलेली होती. उघड्या खिडकीतून बाहेर डोके काढून ती इकडे तिकडे कुतूहलाने पाहत होती. सिग्नल नुसार गाडय़ांची ये जा होत होती.एवढ्यात एक गाडी प्रचंड वेगाने नियंत्रण गमावल्यासारखी वेडीवाकडी होत आली आणि त्या कोऱ्या करकरीत गाडीवर आदळली .क्षणात ती कोरी करकरीत गाडी होती की नव्हती झाली. प्रचंड प्रमाणात चेंगरली गेली.पुढच्या सीटवर बसलेली दोघेही क्षणात मृत पावले असावेत.मागील मुलगीही वाचण्याची शक्यता फारच कमी होती .
अपघातामुळे एकच हलकल्लोळ उडाला होता .चेंगरलेल्या गाडीतून धूर येऊ लागला होता.काही क्षणात त्या गाडीला आग लागून तिचा स्फोट होण्याची शक्यता होती .स्फोटात उडणाऱ्या तुकड्यांमुळे पादचारी व इतर गाड्या या सर्वांनाच धोका होता.प्राप्त परिस्थितीत कुणीच काहीही करू शकत नव्हते.प्राप्त परिस्थितीत जे आहे ते पहाणे आणि भोगणे याशिवाय काहीही करता येणे शक्य नव्हते.
एवढ्यात सागरचे लक्ष अॅक्सिडेंटमध्ये सापडलेल्या गाडीत मागे बसलेल्या मुलीकडे गेले. ती मुलगी आश्चर्यकार्यकारकरित्या अपघातातून वाचली होती.ती जखमी झाली असावी . ती रडत होती .कोणत्याही क्षणी स्फोट झाला असता आणि ती मुलगीही त्यात मेली असती .
सागर मोटारीतून उतरला आणि तो त्या अपघातात सापडलेल्या गाडीकडे विद्युत वेगाने पळत गेला .गाडीची अर्धी काच लावलेली होती त्या फटीतून मुलीला बाहेर काढणे शक्य नव्हते.सागर ज्युडो चॅम्पियन होता त्याने मूठ वळून ती काचेवर मारली .फुटलेल्या काचेचे बारीक बारीक तुकडे खाली पडले .हात घालून त्याने मुलीला उचलले अाणि बाहेर काढले तेवढ्यात प्रचंड स्फोट होऊन ती मोटार आकाशात उडाली. स्फोटाबरोबर सागरही हवेत उडाला परंतु त्याने त्या मुलीला सोडले नव्हते .त्या लहान मुलीला घट्ट धरलेल्या स्थितीत आपण हवेतून उडत जात आहोत हीच त्याची शेवटची स्मृती होती.
शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता.एक लहान मुलगी त्याच्या कॉटजवळ बसलेली होती .जवळच त्याचे आई वडीलही होते .तो दोन दिवसांनी शुद्धीवर आला होता .स्फोटा बरोबर उडाल्यानंतर जमिनीवर पडताना त्याचा एक हात फ्रॅक्चर झाला होता .डोक्याला जखम झाली होती .डोक्याला पडलेल्या मारामुळे त्याची शुद्ध गेली होती. ऑफिसातून परत येताना त्याच्याबरोबर मोटारीत त्याचे वडीलही होते .त्यांचा स्वतंत्र व्यवसाय होता आणि त्या व्यवसायात सागर त्यांना मदत करीत होता.पुढे मागे त्यालाच तो व्यवसाय सांभाळायचा होता. एवढेच नव्हे तर त्याचा विस्तारही करायचा होता.
सागरच्या वडिलांनी त्या मुलीला आणि त्याला लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते.मुलगीही बेशुद्ध होती.तिला विशेष लागले नव्हते.ती शॉकमध्ये जास्त होती.सागरला हॉस्पिटलमध्ये जवळजवळ दोन तीन आठवडे राहावे लागले.सागरच्या वडिलांनी त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला . मोटारी बरोबरच तिचे आई वडीलही जळून गेले होते.वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन झाली .हिंदी इंग्रजी पत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली.पोलिसांमार्फतही प्रयत्न करण्यात आला . त्या मुलीच्या नातेवाईकांचा शोध लागला नाही .
त्या मुलीला तिचे वडील व सागर यांच्यात काय साम्य आढळले ते त्या मुलीलाच माहीत.ती सागरलाच बाबा बाबा म्हणून सारखी म्हणत होती.
ती अपघातातून बरी झाली तरी सागरला सोडून घरी जायला तयार नव्हती.हॉस्पिटलमध्ये ती सर्वत्र फिरत असे .ती गोड मुलगी सर्वांची आवडती झाली होती .पेशंट डॉक्टर्स सिस्टर्स सर्व तिचे कौतुक करीत असत.तिला कुठेही फिरण्याला मुभा होती.हॉस्पिटलच्या स्टाफला ती अनाथ आहे हे माहीत होते.पेशंटना ही गोष्ट माहीत असण्याचे कारण नव्हते.छत्तीस नंबरच्या पेशंटची मुलगी म्हणूनच सर्व तिला ओळखत असत .ज्याना सागरचे नाव माहीत होते ते तिला सागरची मुलगी म्हणून ओळखत.
सागर हॉस्पिटलमध्ये आला त्यानंतर दोन दिवसांनी एक हाय बीपीचा पेशंट हॉस्पिटलमध्ये आला .प्रथम त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते .नंतर त्यांना स्पेशल रुममध्ये हलविण्यात आले .त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी सारिका होती.सागरला ज्या खोलीत ठेवले होते त्याच खोलीच्या जोडखोलीमध्ये सारिकाच्या वडिलांना ठेविले होते .दोन्ही खोल्यांना जोडणारा दरवाजा होता.
( क्रमशः)
३१/१२/२०१९©प्रभाकर पटवर्धन