उस्मानाबाद : स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिलाय. पोतराजांना अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेनं पुढाकार घेतलाय. पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम संघटनेनं राबवलाय.

सामान्यांचं जगणं नाकारणारी पोतराज प्रथा... पुत्रप्राप्तीच्या नवसापोटी देवीच्या नावानं सोडलेला मुलगा म्हणजे पोतराज... कपाळावर हळद, कुंकवाचा मळवट, तोंडाला शेंदूर, कंबरेला विविध रंगांच्या कपड्याच्या चिंध्या... पायात विशिष्ट पद्धतीचा चाळ आणि डोक्यावर वाढलेले केस अशा अवतारात पोतराज आपल्यासमोर येतो... स्वत:च्या अंगावर आसुडाचे फटके ओढत आत्मक्लेश करुन घेणारा असा पोतराज रस्त्यावर आपण अनेक वेळा पाहिला असेल... पण आसुडाच्या फटक्यांमुळे होणाऱ्या जखमाही त्याला पोटभर अन्न देऊ शकत नाही. त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव... देवीच्या कोपाच्या भितीमुळे त्यातून बाहेरही पडता येत नाही... म्हणूनच पोतराज प्रथा मुक्ती कार्यक्रम मानवी हक्क अभियान संघटनेनं राबवलाय. पोतराज निर्मूलनाचे उद्देश, मातंग समजात पोतराज प्रथेच प्रमाण जास्त आहे. त्यानं हे अपमानित जगणं सोडावं म्हणून, या प्रथेतून बाहेर पडावे हाच या पोतराज निर्मुलन अभियानाचा उद्देश आहे, असं संघटनेचे कार्यकर्ते बजरंग ताटे सांगतात.

उस्मानाबादमधल्या मरीबा लक्ष्मण डोंगरेलाही मानवी हक्क अभियान संघटनेनं नवीन आयुष्य दिलंय. खरं तर मरीबाला शाळेची खूप आवड... पण डोक्यावरचे लांबसडक केस पाहून वर्गातली मुलं त्याला चिडवायची... रस्त्यावर येता-जाता त्याला टोमणेही मारायची. त्यामुळे सहावीच्या वर्गातून मरीबानं शिक्षण अर्धवट सोडलं. त्याची कुठलीही चूक नसताना केवळ आई- वडिलांनी देवीला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याला पोतराज म्हणून देवीला सोडलं होतं. 'शाळेमध्ये गेलो की मुले चिडवायची, दगड मारायची. केसं मुळ लाज वाटायची. मग, दोन वर्ष शाळा बुडाली' असं मरीबा डोंगरे सांगतो...

तर, माझ्या पत्नीला या मुलाच्या जन्माच्या वेळी खूप त्रास होत होता, त्यावेळी मी लक्ष्मी देवीला नवस बोलला होता कि जो मुलगा होईल तो देवीला पोतराज म्हणून सोडला जाईल. म्हणून आम्ही मुलाची केस वाढवली आणि पोतराज म्हणून सोडलं, आता केसामुळे त्याला मुले चिडवायची. त्याने दोन वर्षा पासून शाळा सोडली. त्याला तिथं इतर मुलं त्रास देत होती, असं मरीबाचे वडील लक्ष्मण डोंगरे सांगतात.

मानवी हक्क अभियान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मरीबाचं आणि त्याच्या पालकांचं प्रबोधन केलं... आणि त्याचे केस कापले. त्याचं मरीबा नाव बदलून लालासाहेब असं ठेवलं... आज त्याच्या आयुष्याला नवी ओळख मिळालीय. 'आता खूप चांगल वाटतेय, फ्रेश वाटतेय, २ वर्ष बुडालेली शाळा भरून काढणार, अधिकारी होणार' अशी स्वप्न रंगवण्यात लालासाहेब व्यस्त आहे. अशिक्षित, गरीब आणि मागासलेल्या समाजात, अंधश्रद्धा आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत. अंधश्रद्धेचं अस्तित्वच मिटवायचं असेल तर प्रबोधनानं मानसिकता बदलण्याची मोठी गरज आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel