मध्ययुगीन भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या २५०० वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक होय. या शिवराज्याभिषेकानंतरच 'स्वराज्यास' एक तात्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ 'मराठ्यांचे बंड' नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले. भविष्यात पाकिस्तानातील 'अटक' शहराच्या पुढेही मराठ्यांचा वारू चौखुर उधळला याची यशस्वीपणे पायाभरणी करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. शिवरायांनी त्यावेळच्या तरूणांना एकत्रित केले. त्यांना आश्वासक नेतृत्व देण्याबरोबरच त्यांची बलस्थाने ओळखून त्यांच्यावर योग्य त्या जबाबदाऱ्या सोपविल्या.
मध्ययुगाच्या आरंभापासून संपूर्ण भारतवर्ष परकीय इस्लामी, जुलमी शासकांच्या प्रचंड अत्याचाराखाली भरडला जात होता. दक्षिण भारतात अल्लाउद्दीन शिलजीच्या स्वारीनंतर पुढील ३०० वर्षात महाराष्ट्राला मोगल, आदिलशहा, निजाम शहा, सिद्धी या परकियांनी गुलाम केले. इ.स. १३१७च्या दिल्ली सुलतान अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड निराशा, पारतंत्र्य, गुलामी, अवहेलना, दु:ख आणि संकटांचा भीषण काळोख पसरला होता. या भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी पेटविली. आणि सह्याद्री पर्वतरांगात असलेल्या अजिंक्य, अभेद्य, बुलंद, बेलाग दुर्गाच्या आश्रयाने, गनिमी काव्याच्या युद्ध तंत्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र ढा आरंभ करुन गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्ररणेने जिवंत बनवली. त्यावेळच्या तरूणांना त्यांनी एकत्र केले. त्यांच्यासोबत जसे तरूण होते तसे वर्षानुवर्षे परकीयांच्या सेवेत असलेले नामवंत सरदारही होते. मात्र या सर्वांसमोर त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी आपलेसे केले, वचक बसवला, प्रसंगी शिक्षा दिल्या आणि प्रेमही दिले. स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्तीमध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रुंचे अडथळे शिवाजी महाराजांनी केले होते. त्यांचे शत्रुही त्यांच्यापेक्षा कित्येक पट बलशाही होते. त्यात केवळ हिदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक एकचे विशाल आकारमानाचे मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील भक्कम आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या जोडीलाच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेचे इंग्रज, फ्रेंच, जंजिऱ्याचे सिद्धी, कोकणातील छोटी छोटी राज्ये आणि यांच्या जोडीलाच स्वकीयांचेही शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते. पण शिवाजींनी आपल्या प्रत्येक शत्रुचा संपूर्ण शास्त्रशुद्ध अभ्यास करुन त्याच्या बलस्थानाबरोबरच दुर्बल स्थानांचाही विचार करुन आपल्या उत्कृष्ट सेनापतीत्वाखाली सर्व शत्रुंना नामोहरम करुन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या या कार्यात त्यांच्या जीवाभावाचे सखेसोबती, हजारो मावळ्याच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झालीच व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले. स्वराज्याच्या या स्वतंत्र, सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने व स्वकीयांच्या प्रचंड आग्रहामुळे किल्ले रायगडवरती प्राचीन 'राज्याभिषेका'च्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व बलाढ्य शत्रुंनाही वचक बसविण्यासाठी त्यांनी ६ जून १९७४ रोजी स्वत:स मोठ्या वैभवात राज्याभिषेक करुन घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची द्वाही फिरवली. स्वराज्य निर्माण करुन त्यांनी जर राज्याभिषेकच केला नसता तर ते एक मराठ्यांचे यशस्वी बंड ठरले असते.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. पूर्वीची मुसलमानी पद्धतीची लेखनपद्धती बदलून हिंदु पद्धतीची लेखनपद्धती विकसित करून लेखनप्रशस्ती, राज्यव्यवहारकोष हे मराठीतील ग्रंथ निर्माण करून घेतले. परकियाच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीही मराठी नावे दिली व आपल्या लोककल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारत-जगभरात पोहोचविण्यासाठी राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधिशाविरुद्ध आक्रमणे, मोहिमांचा धडाका आरंभ केला.
हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे. या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन, विविध उपक्रमाने साजरा केला जातो. इतक्या वर्षानंतरही तरूण पिढीला हा राजा आपला वाटतो. आता गरज आहे ती खऱ्या अर्थाने विचार समजून घेण्याची. शिवरायांनी केवळ मैदानावरच्या लढाया खेळल्या नाहीत तर आपल्या लेखणीने आणि वाणीने अनेक लढाया जिंकल्या हे समजून देण्याची वेळ आली आहे.
By... प्रा. धीरज शिंदे