सावध प्रकरण ११

पाणिनीने आपली गाडी मुख्य रस्त्याला आणून वाहतुकीमध्ये आणेपर्यंत सौम्या त्याच्याशी काही बोलली नाही.

“आता सांगाल का सर काय झालंय?”

“ती हरामखोर सैतानाची अवलाद!”

“म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचे तिने पोलिसांना कळवलं नाही?”

“तिनं नाही कळवलं पोलिसांना. मी मगाशी बघितल त्याच अवस्थेत ते प्रेत अजूनही गॅरेजच्या फरशीवर पडलेल आहे. मगाचच्या आणि आताच्या स्थितीत फरक एवढाच आहे त्या प्रेताच्या उजव्या हाताजवळ एक रिव्हॉल्हर ठेवण्यात आलय”

“म्हणजे सर आत्महत्या भासवण्यासाठी का?”

“हो. आत्महत्या भासवण्यासाठी”

“सौम्या, मी थोडा वेळ गाडी बाजूला लावून थोडा विचार करणारे” पाणिनी म्हणाला

“आपण झालेला हा सगळा प्रसंग विसरून जाऊ शकणार नाही का सर?”

“मला त्याही गोष्टीचा विचार करू दे. हे बघ इथे जरा गाडी लावायला जागा आहे, थांबूया आपण थोडं” पाणिनी म्हणाला आणि आपली गाडी थोडी आडोशाला घेतली आणि गाडीच इंजिन आणि दिवे बंद केले. थोडा वेळ दोघेही शांतपणे बसून राहिले तब्बल दोन ते तीन मिनिटे गेल्यावर सौम्या म्हणाली,

“शेवटी अस आहे सर, मायरा कपाडिया सोडली तर कोणालाही माहित नाही की तुम्ही तिथे होतात आणि ती निश्चितपणे कोणाला बोलणार नाही.”

“नाही सौम्या. कोणीतरी तिला हे असं करण्यासाठी पढवतय कोणीतरी डबल गेम करतय”

“पण तुम्ही तिला व्यवस्थित सूचना दिली होती ना तिने काय करायचे ते?”

“हो सूचना दिली होती. पण वर करण तिने ती सूचना पाळलेली दिसत नाहीये. मगाशी मी प्रेत बघितलं तेव्हा त्याच्या बाजूला रिव्हॉल्हर नव्हतं. सौम्या आपण जरा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम करू.” पाणिनी म्हणाला

“म्हणजे काय नक्की?”

“म्हणजे तुझ्या मनात येतील त्या शंका कुशंका तू मला विचार. मी त्याची उत्तर देईन त्याच्यातून तुझ्या मनात आणखीन काही प्रश्न निर्माण होतील तेही विचार.”

“ठीक आहे समजा सर, तुम्ही हे पोलिसांना सांगितलं नाही तर काय होईल?”

“तसं केलं नाही तर पोलीस केव्हातरी ते प्रेत शोधून काढतील म्हणजे कोणीतरी त्यांना सांगेल की इथे प्रेत पडले आणि मग पोलीस ते शोधून काढतील”

“कोण सांगेल पोलिसाला?”

“बहुदा मायरा कपाडिया हीच सांगेल” पाणिनी म्हणाला

“मला नाही पटत’’

“ती काय करेल तुला सांगतो सौम्या, कुठल्यातरी तिच्या मैत्रिणीला वगैरे घेऊन तिच्या गाडीतून ती तिथे येईल. बहुतेक त्वरिता जामकरला घेऊन येईल”

“मैत्रीणच कशावरून मित्राला कशावरून नाही आणणार?” सौम्यान विचारलं

“कारण तिचा साखरपुडा झालाय. जर तिचं नाव वर्तमान पत्रात आल तर ते तिला परवडणार नाही त्यामुळे ती असं भासवेल की मी संपूर्ण संध्याकाळ मैत्रिणीबरोबर होते.”

“ठीक आहे हा तुमचा तर्क पटणार आहे. पुढे काय?” सौंम्या म्हणाली

“नंतर मायरा त्वरिताला सांगेल गॅरेज उघडायला.त्वरितागॅरेज दार उघडेल. तिच्या गाडीच्या हेडलाईट चा उजेड गॅरेजच्या आत पडेल आणि त्वरिता जामकर एकदम किंकाळी फोडल. मायरा किंचाळेल त्या दोघींना फिट आल्यासारखं होईल म्हणजे त्वरिता जामकरला खरोखरच चक्कर येईल घाबरून आणि मायरा मात्र चक्कर आल्याचं नाटक करेल. आजूबाजूचे लोक ती आरडा ओरडा करून गोळा करेल आणि पोलिसांना कळवेल”

“पोलिसांच्या समोर त्यांचं हे नाटक वठेल?” सौंम्याने विचारलं.

“त्या कितपत चांगला अभिनय करतात त्यावर ते अवलंबून राहील”

“त्या म्हणजे मायरा आणि त्वरिता या दोघी?”

“त्वरिता नाही मायरा आणि आदित्य कोळवणकर म्हणजे या सगळ्याच्या मागे जो सूत्रधार असावा असं मला वाटतंय तो.” पाणिनी म्हणाला

“सर आता मी तुम्हाला आदित्य कोळवणकर बद्दल प्रश्न विचारावे असं म्हणणं आहे का तुमचं?”

“कोणाबद्दलही आणि कशाबद्दलही विचार प्रश्न. मला सौम्या माझ्यावर सरबत्ती कर प्रश्नांची”

“पोलीस तिला विचारणार नाहीत का की हे प्रेत कुणाच आहे? हे तिला माहिती आहे का म्हणून?” सौम्यान विचारलं

पाणिनी ने या तिच्या प्रश्नाचा थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, “होय सौम्या, पोलीस तसे विचारतील आणि तिला हे मान्य करावंच लागेल की ती त्याला ओळखते म्हणून. तिला हे मान्य करावे लागेल की तो तिचा पूर्वीचा नवरा होता मग पोलिसांना हे माहीत करून घ्यायला आवडेल की आत्महत्या करण्यासाठी तिच्या नवऱ्यानं ते गॅरेज का निवडलं आणि लगेच पोलिसांना हा पण संशय येईल की त्याचा मृत्यू म्हणजे खून की आत्महत्या आहे. आणि, अर्थातच ते त्यांच्या रुटीन प्रमाणे प्रेताच्या डोक्यात शिरलेली रिव्हॉल्व्हरची गोळी बाहेर काढतील आणि त्याच पिस्तुलीतून दुसरी गोळी मारून दोन्ही गोळ्यांची तुलना करतील आणि दोन्ही गोळ्या त्याच रिव्हॉल्हर मधून मारल्या गेला आहेत की नाही हे तपासतील. असं केलं की लगेचच त्यांच्या लक्षात येईल की प्रेताच्या हाताजवळ ठेवण्यात आलेली रिव्हॉल्हर ही आत्महत्या आहे हे भासवण्यासाठी ठेवण्यात आली होती.” पाणिनी म्हणाला

“ठीक आहे सर आता मी उलट्या बाजूने विचार करून प्रश्न विचारते, समजा तुम्ही स्वतःहूनच पोलिसांना सांगितलं तर?”

“तर मग मी ह्याच्यात अडकेन सौम्या”

“का? कसं काय?”

“कारण मी मायराला सांगितलं होतं पोलिसांना कळवायला पण तिने कळवलं आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी मी तिथे थांबलो नाही”

“पण यासाठी तुम्हाला जबाबदार धरल जाईल?” सौंम्या ने शंक्स विचारली.

“मी एक सामान्य नागरिक असतो तर जबाबदार धरला गेलो नसतो पण मी वकील आहे म्हणजे कोर्टातला अधिकारी आहे असा कोणाचा मृत्यू झाला म्हणजे प्रेत सापडलं तर ते पोलिसांना मी कळवण अपेक्षित असतं मी स्वतः ती जबाबदारी न घेता मायरा ला पोलिसांना कळवायला सांगितलं त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या माझी जबाबदारी येते”

“यावर मायरा कपाडिया काय म्हणेल?”

“तिचं उत्तर तर आणखीनच अडचणीत आणणार ठरेल. ती तर असाच पवित्रा घेईल की आम्हाला म्हणजे तिला आणि मला असं प्रेत वगैरे काहीच सापडलं नाही आणि मी तिला पोलिसांना कळवायला वगैरे सांगितलं हे सगळं खोटं आहे. हे प्रेत मी आणि त्वरिता जामकर इथे आलो तेव्हाच आम्हाला सापडलं. ती असंही पोलिसांना सांगेल की पाणिनी पटवर्धन त्यांच्या अशीलाला संरक्षण देण्यासाठी माझ्यावर खोटा आरोप करत आहेत.”

“पण तिच्या बोलण्यावर पोलीस विश्वास ठेवतील का?”

“सांगता येत नाही त्यांनी विश्वास ठेवला तर मी चांगलाच अडचणीत येणार. त्यांनी नाही ठेवला विश्वास तरी ते मला प्रश्न विचारून बेजार करणार. कारण प्रेत सापडूनही मी पोलिसांना कळवलं नाही म्हणून. आणि हे पण मी पाहिलं नाही की की पोलीसनी माझ्याशी संपर्क का केला नाही.”

“पण खरंच सर तुम्ही का स्वतःहून संपर्क केला नाहीत पोलिसांना?”

“अग तुला सांगितलं ना त्या विमा कंपनीच्या सगळ्या विषयात मी ते पूर्ण विसरून गेलो. आणि त्याहून महत्त्वाचं असं आहे माझा अंतरमन मला असं सांगतंय की मी अशा कोणाची तरी वकिली घेतली आहे की पोलिसांना कळवून मला त्यात अडकवायचं आहे.” पाणिनी म्हणाला.

“माझे सगळे प्रश्न विचारून झालेत. आणखीन काही प्रश्न सुचत नाहीयेत मला” सौम्या म्हणाली

थोडा वेळ पाणिनी शांत राहिला “.मी अडकलोय सौम्या पण मला उत्तर मिळालय.”

“काय उत्तर आहे?”

“जो कोणी हे सगळं घडवून आणतोय ना सौम्या, तो खूप चतुर आहे. आणि एकच उपाय आहे की ज्यामुळे मी स्वतःला वाचवू शकतो.”

“काय आहे हा उपाय?”

“आपल्याला नेमकं अशील मिळालय”

“मला नाही समजलं तुम्ही फार कोड्यात बोलताय” सौंम्या म्हणाली.

“हे बघ, मायरा कपाडिया हे माझं अशील आहे आणि तिने मला जे काही सांगितलं असेल ते वकील आणि अशील यांच्यातील संवादाच्या गोपनीयतेच्या निकषात बसत म्हणजे पोलीस तिलाही काही विचारू शकत नाहीत आणि मलाही”

“पण तुम्ही जे बघितलं त्याचं काय?”

“जर तिने पोलिसांना ते सांगितलं त्याबद्दल तर त्याचा अर्थ असा होईल की ती माझ्या सल्ल्यानुसार वागत आहे आणि तिने सांगितलं नाही ते तर मी तिथे होतो हे सिद्ध करायला पोलिसांकडे काहीच पुरावा असणार नाही.”

“मला नाही हे पटलं” सौम्या म्हणाली

“पटलं तर मलाही नाहीये पण आपण त्याचा तसा अर्थ काढून स्वतःला वाचवू शकतो. सौम्या आता एक काम कर, तिच्या नवऱ्याच्या म्हणजे कैवल्य कपाडिया च्या पोटगीच्या प्रकरणी मी तिचं वकीलपत्र घेतले असं ऑफिस रेकॉर्ड तयार कर. आणि आता मी तुला घरी सोडतोय.” पाणिनी म्हणाला

(प्रकरण ११ समाप्त)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel