सावळी या सेवेने प्रसन्न झाली. अर्धा शेर दूध देणारी सावळी पाच शेरांचा लोटाभर दूध देऊ लागली. लोकांना आश्चर्य वाटले. वामनभटजी आता दुधावरच राहू लागले. कोणाला औषधाला गाईचे दूध लागले तर तो वामनभटजींकडे येई. कोणाला गाईचे तूप लागले तर तो वामनभटजींकडे येत. तूप कसे पिवळे रसरशीत दिसे!
सावळीचे दूध-तूप ते विकित नसत. गाय आधीच निर्मळ असते; परंतु वामनभटजीही तिला इवलीसुद्धा घाण लागू नये म्हणून जपत. तसेच थंडीच्या दिवसांत तिच्या अंगावर काही घालीत. बैलांच्या गळ्यातील त्या साखळ्या त्यांनी सावळीच्या गळ्यात घातल्या.
एकदा काय झाले, वामनभटजींवर कोठे तरी दूर जाण्याचा प्रसंग आला, कित्येक वर्षांत ते दूर कोठे गेले नव्हते; परंतु काही तरी महत्त्वाचे काम होते खरे. काय होते कुणास ठाऊक! दोन महिने तरी त्यांना तिकडे लागले असते. आता सावळीची काळजी कोण घेणार?
भाऊरावही कोठे दूर गेलेले होते. वामनभटजी जरा चिंतेत पडले. कोठे ठेवायची सावळी? त्या गावात पिलंभटजी म्हणून एक वैदिक होते. वामनभटजींच्या सावळीची ते नेहमी स्तुती करीत असत. त्यांच्याकडे गाय ठेवावी असे वामनभटजींनी ठरविले.
‘पिलंभटजी, मग ठेवाल ना दोन महिने तुमच्याकडे गाय? दुभती आहे-’ वामनभटजींनी विचारले.
‘किती देते दूध?’
‘पाच शेर तुम्हाला होईल. तुमची मुलेबाळे आहेत. जपा मात्र.’
‘बाकी तुमची सावळी म्हणजे रत्न आहे. अशी गाय मी माझ्या सा-या जन्मात पाहिली नाही आणि भाऊरावांकडेसुद्धा ती फार दूध देत नसे. तुम्हा काय खायला घालता?’
‘लोक घालतात तोच चारा. माझ्याजवळ का काही जादूमंत्र आहे? वेळच्यावेळेस तुम्ही तिला पाणी पाजा. चारा द्या. मी येईपर्यंत माझे हे प्राण सांभाळा.’
‘ठीक आहे. माझी चार गुरे आहेत त्यांत तुमची सावळी राहील.’
वामनभटजी घरी गेले. ते सावळीजवळ वेदमंत्र म्हणत उभे राहिले; परंतु पुढे त्यांच्याने म्हणवत ना ते मंत्र. डोळे अश्रुमंत्र म्हणू लागले. सावळीजवळ ते तिच्या पाठीवरून हात फिरवत उभे होते.