बालमित्रांनो, कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, अशी त्याची ख्याती होती. प्रतिदिन सकाळी तो स्नानास नदीवर जाई. पाण्यात उतरून सूर्याला अर्घ्य देई. स्नान झाल्यावर परत येत असतांना त्याच्यापुढे जो याचक येई, तो कधीही विन्मुख परत जात नसे.

        एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन  गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता  कर्णाच्या दानशूरपणाविषयी  बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ''कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.'' या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ''श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.'' सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ''ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.''

        पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ''राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.'' धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ''काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?'' सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले.

        त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, "एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?'' असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ''कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?'' त्यावर कर्ण उद्गारला, '' या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?''

        पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली आणि आपल्या त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले.

        मुलांनो, दानशूर कर्णाची गोष्ट आपण पाहिली. आपल्याला आपली छोटीशी वस्तूही देण्याची इच्छा नसते. येथे तर त्याने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली. आपल्यालाही आपल्या वस्तूंचा त्याग करता आला पाहिजे.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel