मूर्तीचा वा अन्य कोणत्याही प्रतीकाचा उपयोग उपासकाचे वा साधकाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी होतो. मनाची एकाग्रती साधण्यासाठी उपास्य दैवताचे स्वरूप जास्तीत जास्त स्पष्टपणे दर्शवणारी तसेच त्या देवदेवतेचे कार्य, शक्ती व गुण यांची जाणीव करुन देणारी मूर्ती समोर असल्यास साधकाची साधना लवकर सफल होऊ शकेल, हा विचार प्रतिमाविद्येत प्रेरक ठरतो.
या विचाराचे पुढचे पाऊल म्हणजे, उच्च कोटीच्या साधकाला प्रत्यक्ष मूर्ती समोर असण्याची जरूर भासत नाही. मूर्तीच्या विविध अंगांचे वर्णन ऐकून वा वाचूनच त्याच्या मनःचक्षूंसमोर ते रूप उभे राहते व त्याच रूपावर त्याला चित्त एकाग्रही करता येते. तथापि प्रतिमाविद्येचा गाभा किंवा मूळ बैठक म्हणजे एक दोन साधकांना घडलेले मूर्तीचे दर्शन नव्हे, तर प्रत्येक देवदेवतेचे स्वरूप, कार्यक्षेत्र इत्यादींविषयी निर्माण झालेल्या परंपरा वा धर्मशास्त्र होत.
या परंपरा एकदम किंवा एकाच काळात निर्माण होत नाहीत आणि एकदा निर्माण झाल्यावरही त्यांचे रंगरूप उत्तरोत्तर पालटतही जाते. या परंपरांची नोंद पुराणे, महाकाव्ये, आख्यायिका तसेच सर्व प्रकारचे धार्मिक वाङ्मय इत्यादींमध्ये झालेली असते. त्यात समाविष्ट झालेल्या कथा, देवदेवता, त्यांचे अवतार व कार्य हाच प्रतिमाविद्येचा वर्ण्य विषय होय. ठिकठिकाणी पसरलेल्या व विखुरलेल्या या गोष्टी आणून मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीने त्यांची पद्धतशीर मांडणी केली, की प्रतिमाविद्येची संहिता तयार होते.