त्याला फांद्यांच्या स्ट्रेचरवर घालून शिअर्स निघतो. अखेर दूरवर पूल दृष्टिपथात येतो.
एक रात्र त्यांच्या हातात आहे. योजनेप्रमाणे काम सुरू होते. एका तराफ्यावर सामान टाकून जॉईस पुलाखाली सुरुंग लावण्याच्या कामावर निघतो. रात्रभर धुवांधार पाऊस पडतो. नदीचे पात्र फुगलेले; नदीच्या पलीकडच्या तीरावर एका खडकाआड सुरुंग उडविण्याचे यंत्र ठेवलेले.
त्याचवेळी पूर्ण झालेल्या पुलावर कठड्याला टेकून निकोल्सन चिंतनात मग्न! २८ वर्षांच्या नोकरीतील कारकीर्द डोळ्यांसमोर उभी. तिकडून सायटोही येतो. 'उत्कृष्ट कलाकृती!' म्हणून पुलाची स्तुती करतो. हे मान्य करायला खरं तर मनाला क्लेश होतात; पण सायटो हा काही खलनायक नाही. सर्व कैदी पूल पूर्ण झाल्याच्या जल्लोषात, त्यात गाण्यांचा आवाज, मध्येच पाण्याच्या वाहत्या प्रवाहाचा खळखळाट, पुलावर गस्तीचे आवाज आणि पुलाखाली त्याच्या विध्वंसाची चाललेली तयारी… क्षणभर प्रेक्षकांच्याही काळजाचा ठेका चुकतो.
आपल्या सैनिकांसमोर भाषण करताना निकोल्सन म्हणतो, "आपण घरी जाऊ, तेव्हा अपल्या या कामाचा आपल्याला मनातून अभिमान वाटेल. सैनिक आणि नागरिक, सर्वांना तुम्ही कामाचा आदर्श घालून दिला आहे. कैदेतही तुम्ही ताठ मानेने जगलात; त्यामुळ पराभवातही आपला विजय झाला आहे. मित्रांनो अभिनंदन!"
सकाळ उजाडते. पहिली आगगाडी पुलावरून जाणार – जाईस पूल उडविण्यास सज्ज! पण हाय! आता पाऊस थांबल्याने पाणी ओसरलेले. सुरुंग लावून तीरावर आणलेली वायर स्पष्ट दिसते आहे, वरून कुणाच्या लक्षात आलं तर… सगळ्यांच्या हृदयाचा ठेका चुकतो आणि नेमकं तसंच घडतं.
पुलाची अखेरची पाहणी करायला आलेल्या निकोल्सनच्या नजरेला ती पडतेच. काहीतरी काळंबेरं आहे हे लेक्षत येऊन सायटोला घेऊन तो खाली येतो. वायर हातात घेऊन पैलतीरावर पोहोचतो. आगगाडी पुलावर येऊन ठेपते अन् शिअर्सने लेलेल्या हल्ल्याने लडखडणारा निकोल्सन सुरुंग पेटविण्याच्या दांड्यावर पडतो. ज्या हातांनी पुलाचं स्वप्न साकारलं, त्याच हातांनी एका क्षणात ते छिन्नविछिन्न होतं. पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा स्फोटांच्या आवाजात पूल कोसळतो. केवढी ही दैवदुर्गती! डॉ. क्लिप्टन दुरून हे पाहातोय, विदीर्ण मनाने! तर मेजर वॉर्डन वेगळ्याच भावनेने!
माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे तसेच त्याच्या स्वभावाचे अनेक कंगोरे उत्कृष्टरित्या दाखवणारा हा चित्रपट.