ओरिजिनल डॉन-Relive the sensation

भाग

टाटा स्काय जेव्हा नवीन होतं तेव्हा एक जाहिरात यायची-बॅट्समन एक शॉट मारतो , कॅच घेतला जातो आणि स्लो मोशन मध्ये रिवाइंड करून परत तो कॅच दाखवला जातो आणि "Relive the sensation"म्हणून टायटल येतं.

तसंच फीलिंग

१९७८-७९ च्या गणपतीतली एक रात्र

वेळ साधारण दहाची

ठिकाण -मोती चौक राजगुरूनगर

गजा ढमढेरे, समी प्रसादे या आळीतल्या मित्रमंडळींबरोबर ओट्यावर बसायला जिथं जागा मिळेल तिथं बसून चातकाप्रमाणे पिक्चर सुरू कधी होईल याची वाट बघतोय आणि कुठूनतरी रीळचा डबा एकदाचा येतो आणि "डॉन" सुरू होतो.

पीन ड्रॉप सायलेन्स!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                      

 

"डॉन का इंतजार तो ग्यारा मुलकोंकी पुलिस कर रही है लेकिन सॉनिया ये समझ लो की डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकीन है"

" सोनिया ये तुम जानती हो की ये रिव्हॉल्वर खाली है, मैं जानता हूँ की ये रिव्हॉल्वर खाली है लेकिन ये पु$लिस नहीं जानती की ये रिव्हॉल्वर खाली है"

स्वतःला अमिताभ समजून -एक वेगळंच आणि भन्नाट फीलिंग घेऊन या आणि अशा डायलॉग्सनी आमची पिढी अक्षरशः वेडी झाली होती त्या काळी.आजही ते डायलॉग्स तसेच फ्रेश आणि फाडु वाटतात.

१९७४ सालची एक नेहमीसारखी दमट दुपार होती. चंद्राचा (बारोट) फोन खणखणला-पलीकडून जया (भादुरी) बोलत होती-तिने त्याला संध्याकाळी असलेल्या तिच्या आणि संजीवकुमारच्या "नया दिन नई रात" चित्रपटाच्या प्रीमियरला यायचं आमंत्रण दिलं. अमिताभचा तो खास मित्र होता आणि जयाने तर त्याला भाऊच मानलं होतं.

प्रीमियर सुरू झाला-जो तो संजीवकुमारच्या हरहुन्नरी अभिनयाबद्दल आणि जयाने त्याला दिलेल्या उत्तम साथीबद्दल वाहवा करू लागला.चंद्राला मात्र त्याचं शुभ्र धोती आणि कुडता घालून सतत पानाची पिंक तोंडात ठेवलेलं नाट्यकलाकाराचं पात्र पाहून नवीन चित्रपटासाठी एक वेगळं कॅरॅक्टर सुचलं होतं.

अमिताभला तो म्हणाला"टायगर ह्या कॅरॅक्टर कडं जरा बारीक लक्ष दे,त्याच्या लकबींचा अभ्यास कर-हे आपल्या नवीन चित्रपटातलं तुझं एक महत्त्वाचं आणि वेगळं कॅरॅक्टर असणार आहे."

नरीमन इराणी हा एक उत्कृष्ट सिनियर फोटोग्राफर होता-त्याच्या कामाची झलक त्याने "चौदहवी का चाँद" सारख्या चित्रपटात दाखवली होती.पण "जिंदगी जिंदगी" नावाच्या एक पडेल चित्रपटाची निर्मिती करून त्यानं हात पोळून घेतले होते. बारा लाखाचं कर्ज डोक्यावर येऊन पडलं होतं.

चंद्रा तेव्हा मनोजकुमारच्या "रोटी कपडा और मकान"चा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.

नरीमनकडून तो फोटोग्राफी शिकला आणि तेव्हापासून तो त्याला बापाप्रमाणे मानायचा-बावा म्हणायचा आणि नरीमनही त्याच्यावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करायचा-बच्चू म्हणायचा त्याला.

"रोटी"चं शूट चालू असताना एक दिवस नरीमन त्याच्याकडं आला आणि त्यानं त्याला आयुष्यात पहिल्यांदाच तीनशे रुपये उसने मागितले. काही बोलता चंद्राने ते त्याला दिले.

थोड्याच दिवसांनी परत नरीमन आला आणि त्यानं यावेळी दहा हजार रुपयांची मदत मागितली."हा काही तुला परत देत नाही हे पैसे!" एकजण म्हणाला.

हेच सांगणाऱ्या कल्याणजी आनंदजींकडून त्यानं दहा हजार उसने घेऊन नरीमनला दिले.

बरोब्बर पंधरा दिवसांनी नरीमनने ते पैसे परत केले  तेव्हा टोमणा मारलेला तो माणूस आणि सगळेच चकीत झाले-नरीमन काय चीज आहे आणि चंद्रा त्याला एवढं का मानतो ते सगळ्यांना कळून चुकलं.

त्या काळच्या फिल्म इंडस्ट्रीचे एथिक्स आणि संबंध किती साधे पण स्ट्रॉंग होते हे ह्या प्रसंगातून कळतं.

कथानक सलीम जावेदकडून मिळवण्यासाठी चंद्राने सलीमच्या शेजारी राहणाऱ्या (आजची गॅलक्सि अपार्टमेंट) वहिदा रहेमानचा वशिला लावला.

चंद्राला ते म्हणाले "हेच ते 'डॉन' वालं स्क्रिप्ट, पण हे आजपर्यंत दाखवलेल्या सगळ्या दिगदर्शकांनी रिजेक्ट केलंय."

पण शेवटचं वाक्य ऐकण्यात त्याला रस नव्हता. जवळजवळ झडप घालूनच त्यानं ते स्क्रिप्ट हातात घेतलं.

कलाकार अर्थातच 'रोटी' मधले -अमिताभ, झीनत आणि प्राण -घ्यायचे हे त्याच्या मनात पक्कं होतं.

ओम शिवपुरी ईपटाचा कसलेला कलाकार होता आणि दिशांतर नावाची नाट्यसंस्था दिल्लीत चालवायचा. इंटरपोल ऑफिसर आणि गँगचा बॉस अशा विरोधी छटा दाखवणाऱ्या क्लिष्ट भूमिकेसाठी चंद्राला तोच योग्य वाटला.

डीएसपी च्या भूमिकेसाठी राजेंद्रकुमार इच्छूक होता.कथा ऐकल्यावर त्याने डीएसपी मारला गेल्यावर अमिताभ त्याच्या पुतळ्याला हार घालतो असा सीन घ्या असं काहीतरी भलतंच सुचवल्यावर सलीम वैतागून चंद्राला म्हणाला " ये नहीं जमेगा यार". तसाही ज्युबिलीकुमारचं करियर उतरणीला लागलेलं होतं.

जंजीर मधल्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बघितल्यावर चंद्राला ईफतेकार डीएसपी च्या भूमिकेसाठी योग्य आहे असे वाटू लागले. त्याच्या वार्डरोबमध्ये तसेही पस्तीस पोलीस अधिकारी गणवेष होते.म्हणजे तोही खर्च वाचला.

स्टारकास्ट तर अशारितीने फायनल झालं.

बर्मन दादा (एस डी बर्मन) "मीच संगीत देतो" म्हणून मागे लागले होते.पण कथा ऐकवल्यावर ते स्वतःहून राहुलला (आर डी बर्मन)हे काम द्या म्हणाले.कल्याणजी आनंदजी तेव्हा टॉपला होते त्यामुळं फारसा विचार करता त्यांना संगीताची जबाबदारी देण्यात आली.

जंजीरचं शूटिंग सुरू असतानाच जया आणि अमिताभ प्रेमात पडले आणि अमिताभने तिला जंजीर हिट झाला तर लंडनला फिरायला न्यायचं प्रॉमिस केलं होतं. जंजीर हिट झाला आणि अमिताभ रातोरात अँग्री यंग मॅन म्हणून प्रसिद्ध झाला.हरिवंशराय बच्चन यांच्या आज्ञेनुसार अमिताभने काही मोजक्याच मित्रांच्या साक्षीने विवाह विधी उरकून घेतला.लंडनला हनीमून करायला सोबती आणि गाईड म्हणून चंद्राला बरोबर न्यायचे ठरले.

चंद्राला लंडनची खडानखडा माहिती होती. त्याची बहीण तिथं राहात असल्याने त्याच्या बऱ्याचदा लंडनला चकरा होत.

अमिताभला त्यानं पिकॅडिली सर्कस भागातील एकापेक्षा एक भारी शॉप्समध्ये नेलं. अमिताभची कपड्यांची आवड बघून त्याने ब्रँडेड शर्टसच्या दुकानात त्याला नेलं. शक्य असतं तर अमिताभने सगळं दुकानच खरेदी केलं असतं. त्याला एक पोपटी शर्ट आणि त्याच रंगाचा चौकड्याचा कोट खूप आवडला जो त्यानं "ये मेरा दिल" गाण्याच्या वेळी वापरला.नंतर एक रेबॅनचा गॉगल त्यानं घेतला जो डॉनच्या पहिल्या सीनमध्ये वापरला.

                        

 

सुपरस्टार झाल्यावर परत अस मोकळेपणाने आपल्याला लंडनमध्ये फिरता येणार हे अमिताभच्या गावीही नव्हतं.

एक भन्नाट कल्पना चंद्राच्या डोक्यात लंडनमध्ये फिरताना आली. कॅमेरा सोबत आहे,नवीन कपडे घेतले आहेत, शूटिंग करण्यासाठी आलिशान इमारती,म्युझियम आहेत तर अमिताभचे सोलो सीन्स शूट करून घेतले तर?अमिताभ तर नवीन कपडे लगेच वापरायला मिळणार म्हणून खुशच झाला-लगेच काही चांगल्या स्पॉटसवर चंद्राने काही शॉट्स घेतले.ओळख काढून एकाची स्पोर्ट्स कारही काही वेळाकरता मागून घेऊन त्यातून उतरताना अमिताभचे काही सिन शूट केले.

परत आल्यावर आपल्या गुरूला-नरीमनला जेव्हा त्याने उत्स्फूर्तपणे ते शॉट्स दाखवले तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्याला आपल्या चेल्याच्या चलाखीच कौतुक वाटलं. पण हे शूट आपल्याला ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या पूर्व परवानगी शिवाय वापरता येणार नाही हे स्वानुभवाने त्याने चंद्राला सांगितलं. चंद्रा थोडा खट्टू झाला पण "जाऊ दे" म्हणून पुढे सरकला.

भाग

कुठल्याही चित्रपटाच्या शूटिंगची  सुरुवात  फार महत्वाची असते. कलाकारांना "झीरो टेन्शन"वातावरणात ठेवणं, त्यांची केमिस्ट्री जुळणं-चित्रपट उत्तम बनण्यासाठी थोडा वेळ जाऊ घ्यायला लागतो.चंद्राने "ये मेरा दिल" गाण्याने शूटची सुरुवात करायचं ठरवलं-जेणेकरून कलाकारांना डायलॉग पाठ करायचं टेन्शन राहणार नव्हतं.आणि हे गाणं हेलनवर शूट होणार होतं-जिच्यासाठी अशा गाण्यावर नाचणं

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel