Valentine’s Day निमित्त भरपूर मेसेजेस येत होते, काही शुभेछ्या होत्या, काही प्रेम म्हणजे काय यावर होते तर काही फक्त बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यात प्रेम नसून आईवडील, भाऊ, बहिण, मित्र यांच्यामध्ये सुद्धा प्रेम असते अश्या आशयाचे मेसेजेस होते, मग माझ्या मनात प्रेमाबद्दल लिहाव असा विचार आला आणि लिहित सुटलो.
या विषयावर तसं भरपूर साहित्य लिहिलं आहे. लेख, कथा-कादंबऱ्या, काव्यांमध्ये प्रेमाविषयी भरभरून लिहिलं आहे. प्रेमावर चित्रपट, गाणी, संगीत, नाटकं हि आहेत. तरीसुद्धा आपल्याला प्रश्न पडतो प्रेम म्हणजे काय? आणि त्यावर प्रत्येकाची आपापली मतं असतात.
माझ्या मनाने प्रश्न विचारला प्रेमाची सुरुवात कशी होते?(अर्थात मी प्रियकर आणि प्रेयसी च्या प्रेमाविषयी लिहितोय). प्रेम होण्याआधी एखाद्याला समोरची व्यक्ती किंवा व्यक्तीमधील एखादी गोष्ट आवडायला पाहिजे. मग ती आवड इतकी तीव्र होत जाते आणि आकर्षणात बदलते. इथं बरेच लोक फसतात या आवडीला किंवा आकर्षणाला प्रेम समजतात. म्हणजे लव अॅट फर्स्ट साईट हे फक्त उत्कट आकर्षण असते. मग सुरु होतो प्रवास सहवासाचा गाठी-भेटी होतात, हिंडणे, फिरणे, हॉटेल्स, पिझ्झा वैगेरे वगैरे सुरु होतं, थोडक्यात डेटिंग सुरु होते. गुलाबी दिवस असतात हे, आनंदी-आनंद गडे सारखं. जोडीदाराच्या सर्व गोष्टी आवडायला लागतात. तो आणखी हवाहवासा वाटतो. काही काळ जातो, एकमेकांची सवय झाली असते, त्याच्या/तिच्या व्यक्तीमत्वातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागतात. काही निगेटिव्ह गोष्टी समोर यायला लागतात. याशिवाय अपेक्षा वाढायला लागतात, अॅडजेस्टमेंट करावी लागते. इथं खरी कसोटी असते, जरी निगेटिव्ह गोष्टी असतील, तरी तो व्यक्ती हवाहवासा वाटत असेल आणि त्याच्यासाठी वाट्टेल ते अॅडजेस्ट करायची तयारी असेल तर खऱ्या अर्थाने प्रेमाची सुरुवात व्हायला लागते. जर दोघांना निगेटिव्ह गोष्टी खटकत असतील तर लवकरच ब्रेक-अप होतं. एक जण अॅडजेस्ट करायला लागला/लागली तर त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागतो आणि मग एकतर्फी प्रेम सुरु होतं. जर दोघांना एकमेकांचे निगेटिव्ह पाँइंट मान्य आहेत पण ते परिस्थितीशी अॅडजेस्ट करू शकत नाहीत तरी ब्रेक-अप होतं. खर प्रेम तेंव्हा सुरु होतं जेंव्हा दोघांनाही निगेटिव्ह गोष्टी मान्य असतात आणि ते दोघेही अॅडजेस्टमेंटची तयारी ठेवतात. बरेचसे प्रेमविवाह फेल होतात ते याच कारणामुळे, म्हणून जेंव्हा केंव्हा कोणाला वाटलं कि आपण प्रेमात पडलोय तर त्याने/तिने त्या व्यक्तीला जाणून घ्यायला थोडा वेळ घेतला पाहिजे.
प्रेम हि खूप गुंतागुतीची भावना आहे, ते व्यक्त करण्याच्या पद्धती पण निराळ्या असतात. काहीजण प्रेम शब्दात व्यक्त करतात, चांगल्या गुणांचं कौतुक करतात, स्तुती करतात. काही जण भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात. काहीजण काळजीतून प्रेम व्यक्त करतात, काहीजण आपल्या प्रेमीच्या सहवासात राहणे पसंत करतात. काही जण स्पर्शातून प्रेम व्यक्त करतात. बऱ्याचवेळा ह्या व्यक्त करण्याच्या पद्धतीलाच प्रेम समजले जाते आणि गोंधळ होतो. उदा. एकजण समजा भेटवस्तू देऊन प्रेम करतोय आणि त्याची प्रेयसी मात्र काळजी व्यक्त करून प्रेम करतीये आणि ती त्याला काहीच भेटवस्तू देत नसेल तर त्याला असा वाटू शकते कि ती माझ्यावर प्रेम करत नाही. बरेच जण स्पर्शालाच प्रेम समजतात आणि गफलत होते. प्रत्येक स्पर्श हा प्रेमाचा असतो असं नाहीये. एकमेकांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती जर समजून घेतल्या तर ५०% जोडप्यांचा संसार आणखी सुखी होईल असं मला वाटत.
प्रेम दुसऱ्यांदा होतं का हो? बऱ्याच लोकांना प्रेमभंग अथवा दुसऱ्या कारणामुळे अपेक्षित जोडीदार मिळत नाही. त्यावेळी त्याचं मन खिन्न झालेले असते, अश्या लोकांना मला नेहमी सांगू वाटत घाबरू नको तुला परत प्रेम होईल ह्याच्यापेक्षा चांगली व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल. मनाच्या जखमा कितीपण खोलवर असू द्या, कालांतराने त्या भरतात आणि मन परत फुलू शकते.
एकतर्फी प्रेमवीरांना सांगू वाटतं, ते तुझ्यासाठी मृगजळ आहे त्याच्या मागे कधी धावशील तर हातात काहीच लागणार नाही, उलट त्याच्या मागे न धावता बाकीच्या गोष्टीत लक्ष घाल आयुष्यात प्रगती तर होईलच पुढे जाऊन तुझ्या आयुष्यात एखादी चांगली व्यक्ती सुद्धा येऊ शकते.
मला वाटतंय खूप लिहिलंय प्रेमाबद्दल, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ना हा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.