एखादा लेखक जर त्याच्या लेखनशैलीसाठी प्रसिद्ध असेल, तर त्या लेखकाला आपली लेखनशैली बदलून दुसऱ्या विषयावर लिहिणे कठीण जाते. यात त्याचा आधीचा एक वाचकवर्ग असतो. त्या वाचकवर्गाला हा बदल कितपत आवडेल हा विचार देखील त्याच्या मनात असतो. 'मिस्टर सिंगल फादर' लिहिताना सुरुवातीला माझ्या बाबतीत देखील असेच झाले. याआधी लिहिलेल्या साय-फाय कादंबऱ्यांमुळे माझा एक वेगळाच वाचकवर्ग तयार झाला आहे. वाचक त्यांच्या प्रतिक्रिया इमेल, whatsapp आणि फोन करून व्यक्त करतात, सोबतच आम्हाला आपल्याकडून आणखी साय-फाय पुस्तकांची अपेक्षा आहे असे सांगायला विसरत नाहीत.

जेव्हा तुमचे एक पुस्तक लोकप्रिय होते तेव्हा तुमच्या पुढील पुस्तकाकडून वाचकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवूनच ह्या पुस्तकाचं लेखन करायला घेतलं आहे. या पुस्तकामध्ये कुठेही सायन्स-फिक्शन नाहीये, पण कादंबरीच्या नायकाने जे केलं आहे ते मानवतेच्या दृष्टीने नक्कीच सायन्स-फिक्शन आहे. 'मिस्टर सिंगल फादर' ही गोष्ट अर्थातच एका वडिलांची आहे. तशा प्रकारच्या वडिलांची, जे स्वप्न मी कधीतरी बघितलं होतं. 'सिंगल फादर' होण्याचं स्वप्न, लग्नाचा विचार नकोसा असल्याने हा चिचार मनात आला होता खरा, पण लग्न झालं आणि 'फादर' सुद्धा झालोच! पण मनात आलेला तो विचार मला आवडला होता. काही काळानंतर माझ्या डोक्यातून हे पुरतंच निघून गेलं होतं आणि काही दिवसांपूर्वी एक गोष्ट घडली आणि या पुस्तकाला आकार येऊ लागला. पुस्तक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी ती घटना आपल्याला सांगावीशी वाटते.

ऑफिसमधून निघालो होतो, शाळांना सुट्ट्या असल्याने बरीचशी मंडळी गावी गेली होती आणि म्हणूनच मला ठाण्याहून डोंबिवलीसाठी रिकामी लोकल मिळाली होती. अगदी मोजकीच माणसं उभी होती, बाकी सर्वांना बसायला व्यवस्थित जागा मिळाली होती. जो तो आपापल्या मोबाईलमध्ये मग्न होता. एक नजर फिरवली तेव्हा कोणी गेम खेळत होतं, तर कोणी सिनेमा, कोणी whatsapp वर, तर कोणी वेब सिरीज बघतंय, मी काही वेगळं करत नव्हतो, मी सुद्धा यु-ट्यूबवर adobe च्या एक्स्पर्टचा सेमिनार ऐकत होतो.

ट्रेन कळवा रेल्वेस्थानकावर पोहोचली आणि एक ७-८ वर्षांची मुलगी भिक मागण्यासाठी ट्रेनमध्ये चढली. तिच्या हातात काहीतरी वाद्य होतं, ते वाजवत ती मध्ये-मध्ये सर्वांपुढे हात पसरत होती. आम्ही सगळे मोबाईलमध्ये बिझी, तिच्याकडे बघण्यासाठी वेळ आहे तरी कुणाकडे? मग ती माझ्याकडे आली. मी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण ती माझ्याइथेच थांबली आणि मी काय बघतोय ते बघू लागली. Adobe च्या सेमिनारमध्ये व्ही.एफ.एक्सचा व्हिडियो कसा एडीट करतात ते दाखवत होते, त्या तांत्रिक गोष्टी तिच्यासाठी उत्सुकतेच्या होत्या. तिची उत्स्कुता बघून गंमत म्हणून मोबाईल थोडा तिच्याजवळ वळवून एका कानातलं इयरफोन मी तिच्या कानात अडकवलं.

मध्येच मी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं, तिला ते सर्व तिच्या डोळ्यात सामावून घ्यायचं होतं. भिक मागायची होती, पण त्या व्हिडियोने तिला भुरळ पाडली होती. ट्रेन रिकामी असल्याने मी थोडं बाजूला सरकून तिला बसायला जागा दिली. ती देखील व्हिडियो बघतच होती. मला गंमत वाटत होती. थोड्या वेळाने त्या व्हिडियोमध्ये काही आकडे आले आणि ती मुलगी साक्षात 'One… Two… Three… Four…' बोलू लागली. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती मुलगी इंग्रजीत आकडे ओळखू आणि बोलू शकत होती.

मी तो व्हिडियो थांबवला आणि तिला प्रश्न विचारू लागलो. त्या मुलीने मला One to Ten, A to Z अगदी न चुकता सांगितलं. ती मुलगी माझ्यासोबत हिंदीत बोलत होती. तिचं पहिलीत जायचं वय होतं, पण ती शाळेत जाऊ शकत नव्हती. तिने उत्तरप्रदेशमधील एका गावाचा उल्लेख केला होता, आणि माझ्या बऱ्याच प्रश्नाचं उत्तर देत होती. थोड्या वेळाने ती घाबरू लागली. तिची भीती घालवण्यासाठी मी तिला माझ्याजवळचा लाडूंचा डबा दिला आणि थोडेसे चिल्लर पैसे दिले. तोवर कोपर स्टेशन आलं होतं. माझ्या मुलीप्रमाणे तिने अगदी लाडात तिच्या कानातील इयरफोन माझ्या कानात घातले आणि हसत निघू लागली. ती नजरेआड होईपर्यंत मी तिच्याकडे बघत राहिलो. नंतर माझ्या लक्षात आलं, माझ्या आजूबाजूला असलेले बरेचजन माझ्याकडे कौतुकाने बघत होते. काही हसत होते तर काही मोबाईलमध्येच होते. मी कुणाच्याही डोळ्यात पाहिलं नाही, कारण मी बघितलं असतं तर माझ्या मनात अहंकार नाहीतर मोठेपणा आला असता. मी तसाच जागेवरून उठलो, लोक माझ्याकडे बघत होते, आणि मी नजर चुकवत होतो. डोंबिवली रेल्वेस्थानकावर गाडी थांबताच मी कुणाकडेही न बघता उतरलो आणि घराच्या दिशेने चालू लागलो. डोळ्यासमोर तीच मुलगी होती, ती हुशार होती, पण शिक्षण घेऊ शकत नव्हती. यात मी काही करू शकत नव्हतो, कारणही तसंच होतं. शक्य असतं तर नक्की तिच्यासाठी काही केलं असतं.

तेव्हा मला माझे आधीचे दिवस आठवले. मी काय करणार होतो ते आठवलं. जे करता आलं नाही ते कादंबरीच्या माध्यमातून आपल्यासमोर नक्कीच मांडू शकतो. म्हणूनच साय-फाय न लिहिता जे प्रत्यक्षात करायचं राहिलं ते कथेच्या रुपात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.

सदर कादंबरीमधील सर्व घटना, पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तविकतेशी कोणताही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. सदर पुस्तकामधून कोणत्याही जात, धर्म किंवा व्यक्तीला दुःख पोहोचवायचा हेतू नसून केवळ वाचकांच्या ज्ञानसमृद्धीसाठी आणि प्रेरणेसाठी हे पुस्तक लिहिले आहे.

लोभ असावा,

आपलाच,
अभिषेक ठमके 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel