पूर्वीपासून सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई, ती आजही होतेच आहे. या मनाच्या खेळात आपला शाश्वत पाठीराखा कोणी असावाच, ही भावना मग भावाजवळ येऊन थांबते, ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतच. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते. याला जात-धर्म-पंथाला छेद देत इतिहासही साक्षी आहे. हे संदर्भ लक्षात घेऊन "राखी' बांधली तर बांधून घेणारा आजन्म कृष्णासारखा होतो. म्हणूनच दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भ, संस्कार महत्त्वाचा, हेच या दिवसाचे माहात्म्य आहे.
"राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.