कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, त्यातून समोरच्या बाजूने त्याच प्रकारे तीव्र प्रतिक्रिया येण्यास प्रारंभ होतो. सृष्टीचा हा नियम आहे. पुरोगामी विचारसरणी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या संदर्भातही सध्या असेच होत आहे. या विचारसरणीचा सध्या अतिरेक होत आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, पुरोगामी मंडळींचा समान अधिकारासाठीचा अतिरेक, कृत्रिम तलावांत (डबक्यात) मूर्ती विसर्जनाची बळजोरी, ही त्यातील काही ठळक उदाहरणे. यांवर हिंदु भक्तांच्या प्रतिक्रिया न उमटल्यासच नवल ! केरळ सरकारच्या अधिपत्याखालील त्रावणकोर देवस्वम् मंडळाने शबरीमला येथील भगवान अय्यप्पाच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यास नकार दिल्यावर येथील हिंदु भाविकांनी या देवस्वम् मंडळाच्या मंदिरांत अर्पण न करण्याचा निर्णय घोषित केला आहे. हे अशा प्रतिक्रियांपैकी एक ताजे उदाहरण आहे.
पुरोगामी महिलांची अतिरेकी मानसिकता !

केरळमधील भक्तांनी जे अस्त्र उगारले आहे, यातून विविध सूत्रे लक्षात येतात. त्यांच्या निर्णयातून त्यांचा देवाप्रतीचा भाव दिसून येतो. याउलट तृप्ती देसाई आणि इतर समानतेचा डांगोरा पिटणारे यांचा देवापेक्षा घटनेविषयी अधिक विश्‍वास आहे, हे दिसून येते. ज्यांना देवापेक्षा घटना अधिक श्रेष्ठ वाटते, त्यांनी देवळात जाण्याचा प्रयत्न तरी कशाला करायचा ? तृप्ती देसाई यांच्यासारख्या महिला कार्यकर्त्यांची अतिरेकी मानसिकताही येथे दिसून येते. ऋषि विश्‍वामित्र यांचा तपोभंग करण्यासाठी स्वर्गातून मेनका ही अप्सरा आली होती, त्याप्रमाणे ब्रह्मचारी अय्यप्पा यांचे मंदिर भ्रष्ट करण्यासाठीच जणू या महिला कार्यकर्त्या तेथे प्रवेश करण्याच्या इरेला पेटल्या आहेत. याच महिला कार्यकर्त्यांनी शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर प्रवेश केला; पण शनिदेवाच्या खर्‍या भक्त अजूनही चौथर्‍यावर जात नाहीत. या भक्तांनी शनीची कृपाही अनुभवलेली असते आणि कोपही अनुभवलेला असतो. त्यामुळे त्या भावापोटीच तेथील नियम कोणतीही बळजोरी नसतांना पाळतात. तृप्ती देसाई यांनी 'पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळाच्या अध्यक्षांना चोप देऊ', अशी धमकी दिली आहे. अशी अतिरेकी विचारसरणीची व्यक्ती कधी कुठल्या देवाची भक्त होऊ शकते का ?
त्रावणकोर देवस्वम् मंडळाने क्रियमाण वापरावे !

त्रावणकोर देवस्वम् मंडळाचे अध्यक्ष पद्माकुमार यांनी न्यायालयाच्या निर्णयावर बोलतांना 'या मंदिरात महिला कार्यकर्त्या येतील खर्‍या महिला भक्त येणार नाहीत', असे म्हटले आहे; पण महिला कार्यकर्त्यांना तरी प्रवेश देऊन पद्माकुमार ब्रह्मचारी अय्यप्पाचा कोप का ओढवून घेत आहेत ? हा प्रश्‍न आहे. पुरोगाम्यांचा पाप-पुण्यावर विश्‍वास नसतो. असे असले, तरी त्याच्याकडून जेे पाप घडत आहे, ते त्यांना कधीतरी भोगावेच लागणार; पण देवस्थान मंडळांनी हे पाप रोखण्यासाठी त्यांचे क्रियमाण न वापरल्यास देव त्यांनाही  क्षमा करणार नाही. त्रावणकोर देवस्वम् मंडळाने फेरविचार याचिका प्रविष्ट करणे; हा त्यांचा क्रियमाण योग्यरित्या वापरण्याचाच भाग ठरेल.
देवस्थानचे नियम पाळणाराच खरा भक्त !

देवस्थानचे सर्व नियम हे त्या देवस्थानची पार्श्‍वभूमी, पौराणिक संदर्भ विचारात घेऊन बनवलेले असतात. सर्वांनीच ते पाळणे आवश्यक आहे. देवस्थानने कोणतेही नियम घातले, तरी ते पाळणारा हाच खरा भक्त असतो. देवाला कोणती फुले वाहावीत ? त्याची आरती कशी करावी ? तेल वापरावे कि तूप ? कोणती स्तोत्रे म्हणावीत ? कोणत्या क्रमाने देवाची पूजा करायची, याचेही नियम आहेत. उद्या कोणी म्हणेल की, तिळाचे तेल किंवा तूप महाग आहे, म्हणून केरोसीनचा दीप दाखवा आणि ते वाचलेले पैसे गरिबांना द्या, तर ते चालेल का ? प्रत्येक देवतेची षोडषोपचार पूजा, तिचे वार्षिक उत्सव, या गोष्टींविषयी नियम आहेत, तसेच दर्शनाचेही नियम असणारच; परंतु स्वतःला पुरोगामी, बुद्धीवादी म्हणवणारे या कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याच्या स्थितीत नाहीत. हिंदूंच्या धार्मिक परंपरा बुरसटलेल्या आहेत, मागास आहेत, ब्राह्मणांनी त्यांच्या लाभासाठी त्या लादलेल्या आहेत, हे सिद्ध करण्याच्या इरेला ते पेटले आहेत. त्यांच्या या तीव्र अहंकारामुळे ते समजून घेण्याच्या स्थितीला येऊ शकत नसल्याने त्यांचे सूत्र ते घटनेचा आधार घेऊन रेटत आहेत. आपल्या इतिहासात खर्‍या भक्तांना देवतांनी त्यांच्या ठिकाणी येऊन दर्शन दिल्याची उदाहरणे आहेत. खरा भक्त कधीच देवळाच्या गाभार्‍यात जायला मिळावे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावे, यासाठी हेका धरत नाही. तो त्याच्या भक्तीद्वारे देवाशीच एकरूप झाल्याने देवच त्याला भेटायला येतो.
पात्रे दानम् !

केरळच्या भाविकांनी अर्पण न करण्याचे अस्त्र उगारले आहे, त्याचे अनुकरण इतरही ठिकाणी व्हायला हवे. नाहीतरी देवळांत दिलेल्या अर्पणावर सरकारची अधाशी नजर आहेच, तसेच अनेक ठिकाणी अपप्रकार झालेलेही आढळत आहेत. भक्तांनी पर्याय म्हणून राष्ट्र आणि धर्म यासांठी कार्य करणार्‍या संघटना, धर्मशिक्षण देणारे आश्रम, मठ यांना किंवा अशा कार्यासाठी त्यांचे धनरूपातील अर्पण द्यावे. अशा अनेक धर्मादाय संस्था आहेत, ज्या निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. अशा संघटनांना दिलेले अर्पणही देवाच्या चरणांशीच पोहोचेल, यात शंका नाही !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel