इवल्याइवल्याशा
टिकल्याटिकल्यांचे
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी!
निळीनिळी वाट
निळेनिळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्यानिळ्या डोंगरात निळीनिळी दरी!
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी!
देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.