समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य होय. स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या सावित्रीबाई यांची आज 177 वी जयंती त्यानिमित्ताने त्यांना ही शब्दसुमने....
अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. दीडशे वर्षापूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारुन तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली, तर ती फुले दांम्पत्याने. बालविवाहाला विरोध करुन ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडलं. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दांम्पत्यांना यश येऊन त्यास 1856 मध्ये मान्यता मिळाली.
शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातलं स्त्रीदास्यत्व मिटविण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरुन स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या खर्या शक्तीची ओळख होऊन पुरुषप्रधान समाजाची गुलामगिरी पत्करण्याची वेळ येणार नाही, असं ठाम मत त्यांनी स्त्रियांपुढे मांडलं.
अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी पुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली. ही शाळा पुढे भारतातली पहिली मुलींची शाळा म्हणून गणली गेली. ज्योतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांची त्या शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. ज्योतीरावांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले आणि तिच्यात शिक्षिका होण्याची गुणवत्ता निर्माण केली. त्या पहिल्या भारतीय शिक्षिका म्हटल्या गेल्या.
फुले दांम्पत्यांनी त्यानंतर नेटिव्ह फिमेल स्कूल, दि सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन या संस्था स्थापन केल्या. पाहाता-पाहाता फुलेंनी पुणे शहर व परिसरात 20 शैक्षणिक संस्थांचं जाळं पसरवलं. इतकेच नव्हे तर, शाळेतील मुलांची गळती थांबविण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना 'प्रोत्साहन भत्ता' तसेच 'आवडेल ते शिक्षण' देण्यावर भर दिला. 19व्या शतकात स्त्री शिक्षणात त्यांनी केलेली कामगिरी अद्वितीय ठरली.
अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे. त्यामुळे फुले दांम्पत्यांच्या शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा 10 पटीने वाढली. इतकेच नव्हे तर, फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतल्या मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. परिणामी फुले दांम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली.
शैक्षणिक क्षेत्रातल्या मौलिक कार्याबद्दल 1852 मध्ये इंग्रज प्रशासनाने फुले दांम्पत्याचा समारंभपूर्वक सत्कार केला. याप्रसंगी मेजर कँडी यांनी इंग्रज सरकारचे निवेदन वाचून दाखवून या दाम्पत्याचा देऊन गौरव केला. ज्योतीरावांच्या समता, सत्यपरायणता, मानवतावाद या तत्त्वांचा अंगिकार करुन त्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं सारं जीवन व्यतित केलं.